Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नळदुर्गच्या नगराध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’च्या निर्मला गायकवाड
नळदुर्ग, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला गायकवाड यांची व उपनगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा नय्यर जहागिरदार यांची निवड झाली.

 

या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेवकांनी बहिष्कार टाकला.
नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने निर्मला गायकवाड यांची बिनविरोध निवड यापूर्वीच निश्चित झाली होती. पीठासीन अधिकारी देवेंद्र कटके यांनी त्यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करून औपचारिकता पूर्ण केली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून जल्लोष केला.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. ऐन वेळी दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता झाला आणि हे पद प्रत्येकी सव्वा वर्षासाठी वाटून घेण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य नितिन कासार यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नय्यर जहागिरदार यांची दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या भा. ज. प.शी वाटाघाटी सुरू होत्या. त्या फिसकटल्याने भा. ज. प.चे दोन्ही सदस्य गैरहजर राहिले. काँग्रेसच्या सदस्य मुन्वर सुल्ताना कुरेशी याही गैरहजर होत्या. उपाध्यक्षपदाची अडीच वर्षापैकी सव्वा वर्षासाठी वाटणी करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रश्न. जावेद काझी यांनी सांगितले.