Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कळंबच्या नगराध्यक्षपदी किरण हौसलमाल
उपाध्यक्षपदी सुभाष चोंदे
कळंब, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदी ‘शिवसेना-पुरस्कृत शहर विकास आघाडी’चे किरण हौसलमल हे निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवार वनमाला वाघमारे यांना आठ तर किरण हौसलमल यांना नऊ मते मिळाली.

 

उपाध्यक्षपदी सेनेचे सुभाष चोंदे यांची निवड करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार मधुकर खोसे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या सदस्यांनी भाग घेतला नाही.
कळंब नगरपालिका ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, परंतु कराराप्रमाणे काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत करणे गरजेचे असताना स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी एक स्वतंत्र आघाडी करण्याचा निर्णय घेतला. पक्षादेश डावलून राष्ट्रवादीचे पाच व सेनेचे दोन, काँग्रेसचे दोन असे एकूण नऊ जणांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पक्षादेश पाळून या निवडणुकीत भाग घेतला. तर काँग्रेसच्या बाजूने पक्षादेश पाळून राष्ट्रवादीचे सलीम मिर्झा, मधुकर खोसे यांनी कौल दिला. काँग्रेसच्या वतीने वनमाला वाघमारे तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मधुकर खोसे यांना संधी दिलीहोती. राष्ट्रवादीचे किरण हौसलमल, संजय मुंदडा, आतिया सलीम शेख, आशा सुधीर भवर, विक्रम पानढवळे यांनी सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांना पत्र पाठवून सत्तेच्या हव्यासापोटी दोन्ही काँग्रेसने करारनाम्याचा भंग केल्यामुळे या दोन्ही काँग्रेसचा निषेध करून पक्षत्याग करीत असल्याचे कळवल्याने सेनेच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. या निवडीच्या वेळी शहरात तणावाचे वातावरण होते. सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या छायाताई कुंभार, भारत करंजकर यांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मुगले यांनी काम पाहिले. नूतन नगराध्यक्ष किरण हौसल मल, उपाध्यक्ष सुभाष चोंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.