Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दोनच अर्जामुळे सोनपेठची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
सोनपेठ, १६ जून/वार्ताहर

सोनपेठचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, यासाठी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड व त्यांच्या पत्नी जिजाबाई राठोड या दोघांचेच अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने सुरू केलेले ‘महिला राज’

 

सोनपेठमध्येही अवतरणार का, एवढीच उत्सुकता आहे. १८ जूनला वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १९ जूनला उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस असून २० जूनला नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार सोनपेठ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेमध्ये अध्यक्षांची निवड होणार आहे.
नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले आहेत, तर त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड या नागरिकांच्या मागास प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. याशिवाय या प्रवर्गातून विजयी झालेले दोन नगरसेवक काँग्रेस पक्षाकडे आहेत, तर विरोधी राष्ट्रवादीकडेही एक उमेदवार आहे. मात्र सोनपेठ नगरपालिकेच्या १७ पैकी ११ जागा काँग्रेसकडे, ३ जागा राष्ट्रवादीला तर २ जागा शिवसेनेकडे आहेत. भाजपाच्या एकमेव सदस्य रंजना जहागिरदार यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात येणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसकडे निर्विवाद बहुमत असल्यामुळे याच पक्षाचा नगराध्यक्ष होणार, तेही राठोड दाम्पत्यातूनच होणार, हे पक्के आहे.
१९ जूनला श्रीमती राठोड यांचा अर्ज मागे घेतला जाऊन विद्यमान नगराध्यक्षच कायम राहण्याची शक्यता नगर परिषदेमध्ये व्यक्त होत होती.