Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सोयाबीन अनुदान वाटपातील गोंधळ; तलाठी निलंबित
सोनपेठ, १६ जून/वार्ताहर

तालुक्यातील डिघोळ, गवळी पिंप्री व खपाट पिंप्री या गावांमध्ये सोयाबीन पिकांच्या अनुदान वाटपामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून या सज्जाचे तलाठी अनुप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी परभणीचे आमदार संजय जाधव यांनी

 

विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता.
गतवर्षी सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रश्नदुर्भाव होऊन शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणामध्ये नुकसान सहन करावे लागले होते. यामुळे परभणी जिल्ह्य़ातील सोयाबीन उत्पादकांना शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली होती. सोनपेठ तालुक्यामध्ये सोयाबीन अनुदान लाभार्थीच्या याद्या तयार करताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
अनेक ठिकाणी शेतामध्ये पीक नसताना लाभार्थीच्या यादीमध्ये नाव घालण्यात आले, तर काही ठिकाणी पात्र लाभार्थीना अनुदानापासून वंचित राहावे लागले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र शासकीय पातळीवर याची दखल घेण्यात आली नाही. गवळी पिंप्री, खपाट पिंप्री व डिघोळ या शिवारांमध्ये सुमारे२२४ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या तक्रारीची दखल घेऊन परभणीचे विधानसभा सदस्य आमदार संजय जाधव यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला व याप्रकरणी दोषी आढळलेल्या या गावचे तलाठी गायकवाड यांना तातडीने निलंबित करण्याची आल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. गायकवाड हे पालम येथून प्रतिनियुक्तीवर सोनपेठ येथे कार्यरत होते. पालम येथे ऊस अनुदान वाटपाच्या गोंधळामुळे त्यांची सोनपेठ येथे बदली करण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
सोयाबीन अनुदान प्रकरणामध्ये लाभार्थीच्या याद्या बनवताना तलाठय़ांबरोबर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, पोलीस पाटील व पंच असा मोठा लवाजमा होता व त्यांनी प्रत्यक्ष शेतावर जावून क्षेत्राची पाहणी केली होती. यामुळे हा घोटाळा पाहणी अहवालामध्ये आहे की नंतर ही यादी बदलण्यात आली याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच या प्रकरणामध्ये इतर दोषींवरही कारवाईबाबत मौन बाळगण्यात येत आहे.