Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भीषण टंचाईमुळे नांदेड शहरास २३० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
नांदेड, १६ जून /वार्ताहर

तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ व मृग नक्षत्रात पावसाने मारलेली दडी या पाश्र्वभूमीवर वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाने काही भागातील टँकरची संख्या वाढविली आहे. आजमितीस २३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या प्रकल्पातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. अनेक नद्या-नाले तसेच विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. जिल्ह्य़ात काही भागात जानेवारीपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. यंदा जिल्ह्य़ात बेमोसमी पाऊस झाला नाही शिवाय तापमानातही प्रचंड वाढ होती. त्यामुळे पावसाळा वेळेवर सुरू होईल, असे वाटत होते; परंतु पावसाने अद्यापि हजेरी न लावल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आजमितीस जिल्ह्य़ात २३० टँकरद्वारे १५८ गावांत व १४० वाडी-तांडय़ांना पाणीपुरवठा होत आहे. ७८ शासकीय टँकर व १५२ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना संबंधितांचीही चांगलीच दमछाक होत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्य़ातल्या १६ तालुक्यांतील ४९० विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे ३५२ गावे व ७९ तांडय़ांना पिण्याचे पाणी दिले जात आहे. कंधार, मुखेड, नायगाव, लोहा या तालुक्यांत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. कंधारमध्ये ३२ तर लोह्य़ामध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही तर पिण्याच्या पाण्याची टंचाई आणखी तीव्र होऊ शकते, असे मानले जाते.