Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मनासारख्या बदल्या झाल्यामुळे शिक्षकवर्ग समाधानी
गेवराई, १६ जून/वार्ताहर

कोणाच्या मागे न फिरता, कोणाला पैसे न देता सोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्यामुळे शिक्षकवर्गात सध्या समाधानाचे वातावरण आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी ‘ऑन लाईन’ बदल्यांचा प्रथमच निर्णय घेतला. यामुळे लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे पुढारी व बदल्यांचे दलाल नाराज झाले असले तरी इच्छितस्थळी बदल्या झालेले शिक्षक खूश आहेत. तालुक्यातील

 

२८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी या वर्षी ‘ऑनलाईन’ बदल्या करण्याचा निर्णय घेतला. कोणाचाही हस्तक्षेप न होऊ देता संपूर्ण पारदर्शकता ठेवून बदली प्रक्रिया राबवण्यात आली. गेवराई तालुक्यातील एकूण २८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदलीस पात्र शिक्षकांची यादी प्रथम लावण्यात आली होती. नंतर शिक्षकांकडून बदलीच्या ठिकाणाचे तीन पर्याय मागविण्यात आले. प्रत्यक्ष बदलीच्या दिवशी बदलीपात्र शिक्षकांना बोलावून त्यांना रिक्त जागांची ठिकाणे दाखवण्यात आली. दिलेल्या पर्यायाचे ठिकाण रिक्त असल्यास लगेच गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने बदली आदेश दिला जात होता. बाजूला बसलेला लिपिक तेथेच त्या शिक्षकांना कार्यमुक्तही करत होता. ही सर्व प्रक्रिया इतक्या सहजासहजी होताना पाहून आश्चर्यचकित होणारे ‘गुरुजी’ गालातल्या गालात हसताना दिसत होते.
अपेक्षित पर्यायी शाळेवर जागा रिक्त नसलेल्या शिक्षकांना आहे तेथेच राहावे लागले. गेवराई तालुक्यातील २९ शिक्षक इतर तालुक्यात गेले तर बाहेरील १४ शिक्षक तालुक्यात आले आहेत. तालुकाअंतर्गत बदल्यांमध्ये दोन मुख्याध्यापक, १ प्रश्नथमिक पदवीधर तर २५ सहशिक्षकांचा समावेश आहे. बदलीनंतर गेवराई तालुक्यात मुख्याध्यापक १२, पदवीधर ५२ तर सहशिक्षकांची ७५ पदे रिक्त राहणार आहेत.
जिल्हास्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांनी बदली प्रक्रिया राबवली, तर गेवराईत गटविकास अधिकारी बी. एस. फुंडे, गटशिक्षणाधिकारी गाढे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एन. राठोड, प्रवीण काळम यांनी बदली प्रक्रिया पूर्ण केली. लिपिक भारत येडे व एकनाथ तळेकर यांनी सहाय्य केले.