Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘बी. ए.’च्या अभ्यासक्रमात सत्र पद्धती लागू होणार
चालू शैक्षणिक वर्षापासून सुरुवात
नांदेड, १६ जून / वार्ताहर

शैक्षणिक वर्ष २००९-१० पासून विद्यापीठ परिक्षेत्राच्या सर्व महाविद्यालयांतील बी. ए. (बॅचलर ऑफ आर्ट्स) या पदवी अभ्यासक्रमास सत्र पद्धतीने लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभाग व कला विद्याशाखेच्या बैठकीत

 

घेण्यात आला. सोमवारी येथे ही बैठक पार पडली.
राज्यपाल व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ास अनुसरून काल झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. तसेच सत्र पद्धती लागू करण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
वाणिज्य, विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता व अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी बी. कॉम., बी. एस्सी. या पदवी अभ्यासक्रमास सत्र पद्धती लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून बी. ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमास सत्र पद्धती लागू होणार आहे. तीन वर्षाचा हा पदवी अभ्यासक्रमामध्ये सहा सत्रांचा समावेश असणार आहे. बी. ए. प्रत्येक विषयाची परीक्षा ही लेखी ४० व प्रश्नत्यक्षिक १० असे एकूण ५० गुणांची असेल. विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत १४ तर प्रश्नत्यक्षित परीक्षेत किमान ४ गुण मिळवावे लागतील.
प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण असला तरी तो द्वितीय सत्रास पात्र राहील. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे. सत्र पद्धतीमुळे अनुत्तीर्णतेचे प्रमाण कमी होईल शिवाय छोटय़ा-छोटय़ा घटकांचा सखोल अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होईल, असे मानले जाते.