Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाढीव पाणीपुरवठा योजना व घरकुल योजना मार्गी लागल्याचे समाधान - देशमुख
परभणी, १६ जून / वार्ताहर

‘‘आगामी ५० वर्षाचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवून मार्गी लागलेली वाढीव पाणीपुरवठा योजना आणि एकात्मिक गृहनिर्माण विकास कार्यक्रमातून घरकुलाच्या योजनेला मिळालेली चालना या दोन महत्त्वपूर्ण बाबी आपल्या कारकिर्दीत घडल्या. सर्वाना सोबत घेऊन शहराचा विकास करणे हेच ध्येय आपल्यासमोर होते आणि आपण प्रश्नमाणिकपणे आपल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न

 

केला,’’ अशी भावना नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी व्यक्त केली.
आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा श्री. देशमुख यांनी आज पत्रकार बैठकीत सादर केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर, पालिकेचे उपाध्यक्ष अतुल सरोदे, अनिल मुदगलकर, व्यंकट डहाळे, पंजाब पतंगे, बाळासाहेब फुलारी, काँग्रेसचे नगरसेवक संजय देशमुख पांडुरंग देशमुख आदी उपस्थित होते.
शहरासाठी वाढीव पाणीपुरवठय़ाची योजना हे आपल्या कारकिर्दीतले महत्त्वाचे उद्दिष्ट होते. पूर्वी १३१ कोटी रुपयांची असलेली ही योजना आता २३६ कोटी रुपयांची झाली असून केंद्र शासनाने या योजनेसाठी १०४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी पालिकेला ४७ कोटी रुपये प्रश्नप्त होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या दोन ते तीन महिन्यांत योजनेचा शुभारंभ होईल, असे श्री. देशमुख म्हणाले. पुढील ५० वर्षाचे नियोजन करून ही योजना आखण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यानच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अनेक कामे आपल्याला गतीने पूर्ण करताना अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरी भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या दारिद्य््ररेषेखालील तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी राज्य व केंद्र शासनाने घरकुल योजना अस्तित्वात आणली. या योजनेसाठीही ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून सव्वा लाख रुपयांचे एक घरकुल आहे. यात केंद्र शासनाने ८० हजार रुपयांचा वाटा उचलला असून १० टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरायची आहे.
शहरातील सात वस्त्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही योजना सुरू होणार असून आनंदनगर येथे २८०, साखळा प्लॉट ७९०, अजमेर कॉलनी १२०, भीमनगर ५७६, इंदिरा गांधी नगर ९०, पाकिजा मोहल्ला २०३, सुभेदारनगर २६७, विकासनगर ४६६ अशी घरकुलांची संख्या आहे.
या योजनेसाठी केंद्र शासनाचे ३० कोटी १३ लाख, महाराष्ट्र शासनाचे १७ कोटी ५५ लाख, लाभार्थ्यांचे दोन कोटी ५१ लाख असे आर्थिक नियोजन आहे, अशी माहितीही नगराध्यक्षांनी दिली.
शहर विकासासाठी विविध विकासयोजनांना गती देण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन, घनकचऱ्यापासून खतनिर्मिती, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण असे विविध उपक्रम पालिकेने राबविले असून स्थानिक विकास निधी, मराठवाडा विकासाचा कालबद्ध कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून उपलब्ध निधीद्वारे शहरात विकासकामे करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.
काँग्रेस पक्षाचे पालिकेतील गटनेते संजय देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका पार पाडीत असताना शहर विकासासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. यावेळी श्री. मुदगलकर, श्री. सरोदे यांनीही गेल्या अडीच वर्षात शहर विकासाच्या मुद्दय़ावर आम्ही एकत्र होतो, असे सांगितले.