Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज ठाकरे यांचा अटकपूर्व जामीन रद्द
कल्याण रेल्वे कोर्टात हजर होण्याचा आदेश
मुंबई, १६ जून/प्रतिनिधी

 

कल्याण रेल्वे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात तेथील सत्र न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठ महिन्यांपूर्वी मंजूर केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केला व राज ठाकरे यांनी येत्या २९ जून रोजी सकाळी कल्याण रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर हावे, असा आदेश दिला.
कल्याणच्या दंडाधिकारी तसेच सत्र न्यायालयाने २२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशांविरुद्ध राज्य शासनाने केलेली फौजदारी रिट याचिका मंजूर करून न्या. श्रीमती आर पी.सोंदूर-बलदोटा यांनी हा आदेश दिला. या प्रकरणास आता बराच कालावधी उलटून गेला असल्याने राज ठाकरे यांना कोठडीत ठेवून त्यांचे जाबजबाब घेण्याने काहीच साध्य होणार नाही, असा अभिप्रायही न्यायमूर्तीनी नोंदविल्याने राज ठाकरे २९ रोजी कल्याण रेल्वे न्यायालयापुढे हजर होतील तेव्हा त्यांची लगेच जामिनावर सुटका होणे ही मात्र औपचारिकता असेल.
कल्याणच्या सत्र न्यायालयाने ठाकरे यांना २४ ऑक्टोबपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करणारा आदेश दिला तेव्हा ते आधीच कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा त्या न्यायालयाचा आदेश पूर्णपणे बेकायदा ठरतो, असे नमूद करून उच्च न्यायालयाने तो रद्द केला. त्याच दिवशी आधी सकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी सादर केलेल्या ‘ट्रान्फर वॉरन्ट’वर तेथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र नंतर त्याच दिवशी दुपारी सत्र न्यायालयाने या ‘ट्रान्फर वॉरन्ट’ला स्थगिती देऊन ठाकरे यांना अटकपूर्व जामीन दिल्याचे निदर्शनास आणल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आधीचा आपला आदेश रद्द केला होता. दंडाधिकाऱ्यांना अशाप्रकारे स्वत:चाच आदेश मागे घेण्याचा अधिकार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.