Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हवामानातील बदलांचा कोकणालाही झटका
रत्नागिरी, १६ जून/खास प्रतिनिधी

 

मान्सूनचा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून जागतिक पातळीवर चर्चा होणाऱ्या हवामानबदलाचा झटका निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणालाही यंदा प्रथमच जाणवला आहे. गेल्या काही वर्षांंत हवामानामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होत असून त्याची गंभीर दखल देशोदेशीच्या हवामानतज्ज्ञांनी घेतली आहे, पण त्याबाबत आपल्या देशात आणि विशेषत: कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात फारशी जाणीव अजून झालेली नाही. कारण जगात अन्यत्र हवामानामध्ये चढ-उतार बदल होत असले तरी कोकणावर वरुणराजाची आणि एकूणच ऋतुचक्राची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यातच दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचा पाऊस सुमारे एक आठवडा आधीच दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे येथील शेतकरी मनोमन सुखावला होता. प्रत्यक्षात मात्र हे आगमन अंदाजापेक्षा सुमारे दोन आठवडे लांबले. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मात्र (६ जून) रत्नागिरीपासून खेडपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कोकणवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण त्यांचे हे समाधान अल्पकाळच टिकले. कारण ७ जूनच्या दुपारनंतर पावसाने मारलेली दडी आजतागायत कायम आहे आणि त्यामुळेच जागतिक पातळीवर चर्चिल्या जाणाऱ्या हवामानबदलाचाच हा कोकणी अवतार असल्याच्या निष्कर्षांप्रत जाणकार मंडळी येऊ लागली आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये मे च्या शेवटच्या आठवडय़ात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनची अपेक्षित आगेकूच रोखली गेल्याचा निष्कर्ष हवामानतज्ज्ञांनी काढला. मात्र त्यानंतर गेल्या १५ दिवसांत मान्सून थबकण्यामागील स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. कोकणामध्ये अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर (२५ मे) पेरण्या केल्या जातात, तर काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले की, शेतीच्या कामांना वेग येतो, पण यंदा या दोन्ही प्रकारे पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर सध्या केवळ आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आलेली नाही, तर येत्या चार दिवसात दमदार पावसाला सुरुवात न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याचा धोका निर्माण होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २००४ ते २००८ या गेल्या पाच वर्षांंतील पावसाचे वेळापत्रक आणि प्रमाण पाहिले तर असे दिसून येते की, २००४ मध्ये ८ जूनपासून चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली आणि महिनाअखेपर्यंत एकूण सरासरीच्या सुमारे २५ टक्के (९५४.३ मिलीमीटर) सरासरी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. २००५ मध्ये एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहिले. मान्सूनच्या पावसाला सुरुवातही काहीशी उशिरा १८ जूनपासून झाली, पण महिनाअखेरीपर्यंत त्यावर्षीच्या सरासरी पावसाच्या (३००९.६ मिमी) सुमारे २५ टक्के पावसाची नोंद (७८६.२ मिमी) रत्नागिरी जिल्ह्यात झाली. २००६ मध्ये मात्र २ जूनपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आणि महिनाअखेपर्यंत तब्बल ९०० मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. २००७ मध्ये १६ जूनपासून जिल्ह्यात विस्तृत प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि महिनाअखेपर्यंत त्यावर्षीच्या एकूण सरासरी पावसाच्या (३४२१.९ मिमी) एकतृतीयांशपेक्षा जास्त पाऊस (१,२९९ मिलीमीटर) या पहिल्याच महिन्यात पडला. गेल्याही वर्षी मान्सूनच्या पावसाने कोकणवासीयांना फार काळ वाट बघायला लावले नाही. ८ जूनच्या सुमारास या पावसाचे सर्वदूर आगमन झाले आणि महिनाअखेपर्यंत त्यावर्षीच्या एकूण सरासरी पावसाच्या (३४२१ मिमी) सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. या पाच वर्षांंत २००४ साली सर्वांत जास्त सरासरी पाऊस (४८३.६ मिलीमीटर) पडला असून पुढच्याच वर्षी २००५ मध्ये सर्वात कमी सरासरी पावसाची (३००९.६ मिमी) नोंद झाली आहे. उरलेली तीन वर्षे हे प्रमाण सुमारे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर राहिले आहे.
वरकरणी ही आकडेवारी समाधानकारक असली तरी गेल्या दोन्ही वर्षी दोन मोठय़ा पावसांमध्ये पडणारा खंड आणि भातपिकाच्या दृष्टीने आवश्यक वेळी पाऊस न पडणे या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेच्या बाबी ठरल्या आहेत. यंदाच्या अभूतपूर्व काळापर्यंत लांबलेल्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यामध्ये फक्त ९०.२ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला असून गेल्यावर्षी या काळापर्यंत तब्बल सुमारे ६१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही चिपळूण, संगमेश्वर व रत्नागिरी हे तीन तालुके वगळता उरलेल्या सहा तालुक्यांमध्ये अजून १०० मिलीमीटरही पाऊस पडलेला नाही. खेड व मंडणगड तालुक्यात तर हे प्रमाण ३०-३२ मिलीमीटर एवढेच नगण्य आहे.कोकणात गेल्या ३० वर्षांंमध्ये पावसाचे २० जूननंतर आगमन होण्याच्या घटना २-३ वेळा घडल्याची नोंद आहे, पण तशा परिस्थितीत भातपिकाचे उत्पन्नही सुमारे २५ ते ३० टक्के घटू शकते, अशी भीती कृषीतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास हवामानबदलाचा हा झटका येथील शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचेच प्रश्नचिन्ह उभे करण्याची शक्यता आहे.