Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

१०१ मजली इमारतीसाठी देशी-विदेशी कंपन्याची झुंबड
विकास महाडिक
मुंबई १६ जून

 

एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘बीओटी’ तत्वावर वडाळा येथे बांधण्यात येणाऱ्या १०१ मजल्यांच्या देशातील सर्वात उंच इमारतींच्या उभारणीसाठी देश-विदेशातील सात बडय़ा विकासकांनी व २३ सल्लागार कंपन्यांनी रस दाखवला आहे. जागतिक मंदीच्या सावटातही विकासकांच्या या अनपेक्षित प्रतिसादामुळे एमएमआरडीला सुखद धक्का बसला आहे.
वडाळा येथे ११५ हेक्टर जागेवर एमएमआरडीएकडून अद्ययावत ट्रक टर्मिनल व अांतरराज्यीय बस टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. त्यापैकी बस टर्मिनलच्या जागेवर जगातील सर्वाधिक उंच १० इमारतींमध्ये स्थान मिळवू शकेल, अशी १०१ मजली उंच ‘आयकॉनिक’ टॉवर बांधण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच सल्लागार व विकासकांकडून जागतिक निविदा मागविल्या होत्या. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि आधुनिक वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना ठरणाऱ्या या ४०० मीटरहून अधिक उंचीच्या या इमारतीच्या बांधणी व संकल्पना चित्र बनवण्यासाठी देश-विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांनी रस दाखवला आहे. त्यामध्ये इंग्लड, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी देशांतील लुईस अ‍ॅण्ड बर्जर ग्रुप, आर. एम. जेम हॉगकाँग लिमिटेड, पेडल थ्रोप, आयकॉन, टी. सी कन्सल्टन्सी, हॅलक्रो, सी. एफ. एस कंपनी, कपूर असोसिएटस्, स्पार्क, क्रिसिल अशा एकूण २३ सल्लागार कंपन्यांनी निविदा अर्ज घेतले आहेत.
याखेरीज इमारत उभारणीसाठी आकृती सिटी लिमिटेड, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (अनिल अंबानी ग्रुप ) इंडिया बूल, आय. एल. अ‍ॅण्ड एफ. एस. ट्रान्सपोर्टेशन, टॉप व्हॅल्यू, शापूरजी पालमजी कंपनी आणि प्रतिभा इंडस्ट्रिज या सात विकासकांनी निविदा अर्ज खरेदी करून, ही इमारती उभारण्याचे आव्हान पेलण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलेले आहे. १५ जुलैपयर्ंत ही निविदा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. मात्र आर्थिक मंदीतही इतक्या मोठय़ा संख्येने अर्ज खरेदी करुन विकासक व सल्लागारांनी दिलेला प्रतिसादामुळे एमएमआरडीए सुखावून गेली आहे. आर्थिक मंदी असताना या कंपन्यांनी रस दाखवणे, ही बाब उत्साहवर्धक असल्याचे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पात अनेक व्यावसायिक गाळे बांधले जाणार आहेत. परदेशातील बस स्थानकांप्रमाणे या ठिकाणी आतंरराष्ट्रीय सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रवाशी, बस चालक, वाहतूक बदलाची सहज सुविद्या अशा अनेक अद्यावयात सुविधांचा त्यामध्ये समावेश असेल. दरम्यान, या महत्वाकांक्षी प्रकल्पात आणखी चुरस निर्माण व्हावी यासाठी निविदा दाखल करण्याच्या तारखेत आणखी वाढ केली जाणार असल्याचे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.