Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मध्य रेल्वेची नवी ओळख : १०० टक्के वक्तशीर!
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

 

मेन, हार्बर व ठाणे-वाशी असे तीन उपनगरी कॉरिडॉर, ३१५ किमी लांबीचे रेल्वेमार्ग, ७६ स्थानके, लोकलच्या १४१० फेऱ्या, बाहेरगावी ये-जा करणाऱ्या सुमारे १६० मेल-एक्स्प्रेस व माल गाडय़ांची वाहतूक, तब्बल ३५ लाख दैनंदिन प्रवासी..असे जगातील सर्वात गजबजलेले उपनगरी रेल्वेचे जाळे असलेल्या मध्य रेल्वेसाठी सोमवारचा दिवस अत्यंत खास ठरला. सदैव बेभरवशाची सेवा म्हणून संभावना केल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेने त्या दिवशी १०० टक्के वक्तशीरपणाचे लक्ष्य गाठून सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
या पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेने ९९ टक्के वक्तशीरपणाचे लक्ष्य गाठले होते. मात्र शतप्रतिशत वक्तशीरपणाचे उदिष्टय़ साध्य करण्याची ही गेल्या कित्येक वर्षांतील पहिलीच वेळ आहे.
एखाद्या प्रवाशाने गाडीतील आपत्कालीन सुरक्षा साखळी ओढली, बाहेरगावाहून येणारी एखादी गाडी उशिरा पोहोचली, एखादा सिग्नल अथवा पॉइंट नादुरुस्त झाला..तरीसुद्धा उपनगरी सेवेचे वेळापत्रक बिघडते. अशा संवेदनशील परिस्थितीत १०० टक्के वक्तशीरपणा साध्य करणे, हे एक मोठे आव्हान असते, अशा शब्दांत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी याबाबतचे महत्त्व विषद केले.
उपनगरी वाहतुकीचे जाळे सुधारण्यासाठी १९९० सालापासून सुरू असलेले प्रयत्न आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मेगा ब्लॉक, लोकलच्या देखभाल-दुरुस्तीच्या सुविधा, डीसी-एसी परिवर्तन, अत्याधुनिक डिजिटल अ‍ॅक्सेल काऊंटर सिग्नल, सुटसुटीत वेळापत्रक, लोकलचा प्रभावी वापर, तंत्रज्ञानाचा वापर आदी गोष्टींमुळे हे उदिष्टय़ साधता आल्याचे मध्य रेल्वेने नमूद केले आहे.