Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

वीज कडाडल्याने मुंबईकर त्रस्त!
मासिक बिलात २०० ते ४०० रुपयांनी वाढ होणार?
प्रतिनिधी
शहरात बेस्ट आणि उपनगरात रिलायन्स कंपनीला राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीस मान्यता दिल्यामुळे मुंबईकरांना मोठय़ा प्रमाणात दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांना या दरवाढीचा मोठय़ा प्रमाणात फटका बसणार आहे. मासिक बिलामध्ये सर्वसाधारणपणे २०० ते ४०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकर बेजार झाले आहेत.

भाषाप्रभूंच्या जन्मशताब्दीचा विसर!
सांस्कृतिक केंद्रात प्रशासकीय कार्यालये
भगवान मंडलिक
साहित्य वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक माहेरघर म्हणून गौरवलेल्या डोंबिवलीचे रहिवासी भाषाप्रभू पुरूषोत्तम भास्कर भावे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असूनही शहरवासीयांना त्याची गंधवार्ताही नाही. डोंबिवली पश्चिमेत महात्मा गांधी रस्त्यावर पु. भा. भावे यांच्या नावाने कल्याण डोंबिवली पालिकेचे ‘पु. भा. भावे सामाजिक व सांस्कृतिक केंद्र’ असून त्याची तर पार रया गेली आहे.

लालबागचा राजा प्रबोधिनीची शनिवारी मुहूर्तमेढ
प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण बनलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लालबागचा राजा प्रबोधिनी अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांची मुहूर्तमेढ २० जून रोजी रोवण्यात येणार आहे. लालबागचा राजा प्रबोधिनीच्या माध्यमातून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून त्यासाठी मंडळातर्फे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या सुविधा विनाशुल्क उपलब्ध करण्यात येणार आहेत.

‘अभ्युदय’ची वर्षपूर्ती
प्रतिनिधी

महापालिका शाळेतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, परंतु हुशार विद्यार्थ्यांचा फक्त अभ्यासच नव्हे, तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडावा यासाठी व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वत: झटत असतील, असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु ही बाब सत्यात उतरली आहे अंधेरी पश्चिम येथील भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च या महाविद्यालयाच्या ‘अभ्युदय’ या उपक्रमातून. व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आपला वेळ खर्ची घालून या गरीब व हुशार मुलांचा सर्वांगिण विकास कसा व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.

सुरक्षा संस्थांनी ‘कम्युनिकेशन जॅमर’चा वापर केला नाही
सागनिक चौधरी, श्वेता देसाई आणि शिशिर गुप्ता
‘ताज’, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमधील दहशतवाद्यांचे मोबाइलवरील संभाषण ‘टॅप’ करणाऱ्या सुरक्षा संस्था आणि गुप्तचर यंत्रणांनी ‘कम्युनिकेशन जॅमर’चा वापर केला नाही. दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील ‘कर्तेधर्ते’ दहशतवाद्यांना पोलीस आणि कमांडोंच्या हालचालीची, कारवाईची माहिती सतत पुरवीत होते हे लक्षात येऊनही या यंत्रणांनी ‘जॅमर’चा वापर केला नाही.२७ नोव्हेंबरच्या पहाटे ‘एनएसजी’ मुंबईत दाखल झाल्यानंतर ताबडतोब त्या दलाचे प्रमुख जे. के. दत्त यांनी हल्ल्याच्या तिन्ही ठिकाणची पाहणी केली.

अभिमत विद्यापीठांची फसवाफसवी
प्रतिनिधी

देशात उच्च शिक्षणाचा विस्तार करण्याबरोबरच संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्याच्या हेतूने केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम ३ नुसार उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची तरतूद आहे. परंतु, केंद्र सरकारच्या या हेतूला अनेक अभिमत विद्यापीठांनी हरताळ फासला आहे.
राज्यात सध्या २० अभिमत विद्यापीठे आहेत. यातील जेमतेम चार-पाच विद्यापीठांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नावलौकीक संपादन केला आहे.

महाराष्ट्र वैद्यक परिषदेची निवडणूक रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
महिला, दुर्बलांना प्रतिनिधित्व नाही
प्रतिनिधी
महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या नऊ जागांसाठी एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत महिला तसेच दुर्बल घटकांना प्राधान्य नसल्याने ही निवडणूकच अवैध ठरते, असे स्पष्ट करणारे लेखी पत्र या निवडणुकीत उभे राहिलेल्या ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज् कम्यून’ या संस्थेचे निमंत्रक डॉ. तुषार जगताप आणि डॉ. जितेंद्र जाधव यांनी शासनाला लिहिले असले तरी त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘इंद्रायणी’च्या पासधारकांचे खासदार परांजपेंना साकडे
प्रतिनिधी

अव्वाच्या सव्वा किंमत मोजून फर्स्ट क्लासचे पास खरेदी करायचे, पण बसायला जागा कधीच मिळत नाही. ही व्यथा आहे इंद्रायणीतून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांची. मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा येथून पुण्यापर्यंत दररोज उभ्याने प्रवास करणाऱ्या या त्रस्त प्रवाशांनी आज कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

शिरीष कणेकरांची अमेरिकेत ‘सेंच्युरी’
प्रतिनिधी
शिरीष कणेकर यांचे ‘माझी फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’ हे कार्यक्रम भारताप्रमाणेच अमेरिकेतही लोकप्रिय झाले असून या कार्यक्रमांचा अमेरिकेतील शंभरावा प्रयोग ४ ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्निया येथील इस्ट बे एरिया भागातील फ्रीमॉँट येथे सादर होणार आहे. या दोन कार्यक्रमांप्रमाणेच ‘या कातरवेळी’ या थोडय़ाशा गंभीर स्वरुपाच्या कार्यक्रमाचाही त्यात समावेश आहे. शिरीष कणेकर यांनी १९९२ साली अमेरिकेतील पहिला दौरा केला होता. यंदा हा त्यांचा नववा दौरा असणार आहे. त्यांच्या कार्यक्रमांना प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक उपस्थित असतात. २० वर्षांपूर्वीप्रमाणेच आजची तरूण पिढीही या कार्यक्रमांशी ‘कनेक्ट’ होते, असे कणेकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. ‘माझी फिल्लमबाजी’मध्ये गेल्या काही वर्षांतील चित्रपटांचे संदर्भ घेण्यात आले आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, गेल्या २० वर्षांचा आढावा घेतला तर ‘हम आप के हैं कौंन’ वगळता एकही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर ठसलेला नाही. या चित्रपटांतील संदर्भ दिले तर प्रेक्षकांच्या लक्षात येतील का, याविषयी शंका वाटते. त्यामुळे या कार्यक्रमात फारसा बदल केलेला नाही. ‘कणेकरी’मध्ये विषयांना बंधन नाही. हा कार्यक्रम म्हणजे विविध विषयांवर प्रेक्षकांशी मारलेल्या गप्पा आहेत. याचे स्वरूपही विनोदी ढंगाचे आहे. ‘या कातरवेळी’ या कार्यक्रमात ‘आयुष्य’, ‘तत्त्वज्ञान’, ‘मृत्यू’ इत्यादी विषयांवर शिरीष कणेकर विचार मांडतात. यात हसवणूक अपेक्षित नाही, असे कणेकरांनी सांगितले. या वर्षी अमेरिकेप्रमाणेच कॅनडामधील टोरंटो, ओट्टावा आणि व्हॅनकुव्हर येथेही शिरीष कणेकर यांच्या कार्यक्रमांचे प्रयोग होणार आहेत.