Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

‘गुन्हेगारांना राजकीय संरक्षण’
बाळासाहेब विखे यांचा रोख वळसेंवर

नगर, १६ जून/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील वीज, पाणी, शेती या प्रश्नांसंबंधीचे निवेदन माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुन्हेगारांना जिल्ह्य़ात राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप करीत विखे यांनी त्यासाठी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री दिलीप वळसे यांना जबाबदार धरले.

‘जिल्ह्य़ासाठी केंद्राकडून भरीव निधी मिळवू’
खासदार गांधी, वाकचौरे यांची ग्वाही
नगर, १६ जून/प्रतिनिधी

निवडणूक झाली, राजकारण संपले! आता जिल्ह्य़ाच्या प्रलंबित विकासाला चालना देण्यासाठी जे काही करावे लागेल ते सारे करू, अशी ग्वाही दिलीप गांधी व भाऊसाहेब वाकचौरे या खासदारद्वयीने आज पत्रकारांशी बोलताना दिली. आमचे पक्ष केंद्रात सत्तेत नसले, तरी जिल्ह्य़ातील योजनांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच दोन्ही खासदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

अनेक योजनांवरील खर्चाला यंदा कात्री
जि. प. सुधारित अंदाजपत्रक उद्या
नगर, १६ जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे सुधारित व पुरवणी अंदाजपत्रक गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाईल. जिल्हा परिषदेचे उत्पन्न, विषय समित्यांनी प्रस्तावित केलेल्या मागण्या व मागील दायित्व याचा ताळमेळ न जुळल्याने प्रशासनाने अंदाजपत्रकात कपात प्रस्तावित केल्याचे समजले. सन २००९-१०च्या सुधारित अंदाजपत्रकासह लोकसभा निवडणूक आचारसंहिताकाळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केलेले सन २००८-०९ काळातील अंतरिम अंदाजपत्रक अवलोकनासाठी सभेपुढे सादर केले जाईल. जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होईल.

बनावट पावत्यांच्या आधारे लिलाव नसताना वाळूउपसा!
सीनेकाठचे शेतकरी हैराण

मिरजगाव, १६ जून/वार्ताहर

महसूल खात्याच्या कृपाछत्राखाली कर्जत तालुक्यात सीना नदीतून वाळूचा बेकायदा उपसा मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. लिलाव नसताना, तसेच बनावट पावत्यांचा वापर करून वाळू व्यावसायिकांनी वाळूची अर्निबध उचलेगिरी केली. वाळूउपसा करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचीही चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी संबंधित रहिवाशांमधून केली जात आहे.

बाजार समितीच्या १६ संचालकांचे सभापती पवार यांच्याविरोधात बंड
श्रीरामपूर, १६ जून/प्रतिनिधी
बाजार समितीच्या १६ संचालकांनी सभापती नानासाहेब पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारले असून, त्यांच्या विविध निर्णयांना सामूहिक विरोध सुरू केला आहे.समितीत माजी खासदार बाळासाहेब विखे व आमदार जयंत ससाणे यांच्या गटाची सत्ता आहे. सभापती निवडीच्या वेळी पवार यांच्या नावास विरोध करण्यात आला होता. ससाणेसमर्थकांचा त्यांना विरोध असून, त्यांच्या दबावामुळे पवार यांना एक वर्षांची संधी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतरही पवार यांनी राजीनामा दिला नाही.

कर्जाची परतफेड करूनही सावकारी तगादा सुरूच!
शेतकऱ्यांचे पोलीस निरीक्षकांकडे गाऱ्हाणे
श्रीरामपूर, १६ जून/प्रतिनिधी
दूध धंद्यासाठी कर्ज दिले. शेतकऱ्यांनी परतफेडही केली. परंतु त्याच्या पावत्या दिल्या नाहीत. आता सावकारी पद्धतीने तगादा लावला. दमबाजी क रूनही त्यांचे भागले नाही. उलट न्यायालयात खेटे घालायला लावले. गोंडेगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची ही स्थिती आहे.

लोणी शिवारातील अपघातात
एकजण ठार; एक जखमी
राहाता, १६ जून/वार्ताहर

भरधाव वेगाने जाणारी मोटरसायकल स्कूल बसवर आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. हा अपघात आज सकाळी आठच्या सुमारास लोणी-तळेगाव रस्त्यावर लोणी शिवारात झाला.सोमनाथ पंढरीनाथ आहेर (वय २५, राहणार पिंपळगाव, तालुका सिन्नर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात विलास गणेश गोत्राळे (वय २१, राहणार कोपरगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कूल बस (एमएच १७ टी ७४७३) लोणी-तळेगाव रस्त्याने जात होती. तर मोटरसायकल (एमएच १५ बीवाय ४४६४) ही तळेगावकडून लोणीकडे येत होती. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकल स्कूल बसवर आदळल्याने हा अपघात झाला. स्कूल बसचालक बाबासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी मोटरसायकलस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

नाटय़गृहाबाबतच्या आशा दुणावल्या!
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना पत्र
नगर, १६ जून/प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्य सचिवांना ‘जिल्हा तिथे नाटय़गृह’ योजनेत नगरचा समावेश करावा, असे लेखी दिल्यामुळे या योजनेतून नगरमध्ये उभ्या राहणाऱ्या नियोजित नाटय़गृहाबाबत थोडी आशा निर्माण झाली आहे. अन्य कसली तांत्रिक अडचण आली नाही, तर येत्या दोन-तीन दिवसांत त्या योजनेत नगरचे नाव असल्याबाबतचे लेखी पत्र मनपा प्रशासनाला मिळेल, अशी चिन्हे आहेत.

राहुरीच्या नगराध्यक्षपदी डॉ. उषा तनपुरे
राहुरी, १६ जून/वार्ताहर
नगराध्यक्षपदी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. उषाताई तनपुरे यांची निवड निश्चित झाली असून, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे.नगराध्यक्षपदासाठी जनसेवा मंडळाकडून डॉ. उषाताई तनपुरे व शहर विकास आघाडीकडून आशा माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आशा माळी यांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी डॉ. तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. जनसेवा मंडळाच्या नगरसेवकांसह समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी २००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. नगराध्यक्ष म्हणून डॉ. तनपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा दि. १९ला होईल.

किराणा दुकानातून गावठी दारूचे साहित्य जप्त, महिलेस अटक
श्रीगोंदे, १६ जून/वार्ताहर

श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना परिसरात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ व इतर ४८ हजारांचा माल एका किराणा दुकानातून पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दुकानचालक महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वाल्मिक पारधी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. आज सकाळी कारखाना परिसरातील व्यापारी पेठेतील लिंगाळेश्वर किराणा स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी खबरीवरून छापा टाकला. त्या वेळी दुकानातून ३६ गोण्या काळा गूळ पावडर (रक्कम २९ हजार ७०० रुपये), ४८ ढेपा तयार गूळ (१२ हजार ९६०), ९ बॉक्स नवसागर (२ हजार ७००), ३४ नगर बेकरीस्ट पावडर (१ हजार ३६०) व १५ किलो तुरटी (१२ हजार) असे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी मीना विष्णू बांगर या महिलेला अटक केली. यापूर्वीही तेथे असा छापा टाकण्यात आला होता. त्याच दुकानाशेजारी असणाऱ्या दुकानातून देशी दारूच्या दोन बाटल्याही जप्त करण्यात आल्या.

बंगल्याच्या आवारातून मारुती मोटार लांबविली
नगर, १६ जून/प्रतिनिधी

बंगल्याच्या आवारातून मारुती व्ॉगन आर मोटार चोरीस गेली. रविवारी रात्री ही चोरी झाली. सोमवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अविनाश किसनराव पडवळ (वय ५४, रा. संकल्प सोसायटी, शिलाविहार अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. पडवळ यांनी बंगल्याच्या आवारात मोटार उभी केली होती. ते परगावी गेल्याचे पाहून चोरटय़ाने गेटचे कुलूप तोडून मोटार लांबविली. तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे हवालदार शेंडे करीत आहेत.

खरीप हंगामासाठी स्टेट बँकेतर्फे कर्ज
नगर, १६ जून/प्रतिनिधी
सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही हे कर्ज मिळू शकेल, असे बँकेचे उपमहाप्रबंधक राकेश पुरी (पुणे) यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील बँकेच्या सर्व शाखाधिकाऱ्यांची नुकतीच येथे बैठक झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना पुरी बोलत होते. बँकेचे अधिकारी नवलकिशोर शर्मा, शंतनू पेंडसे, वेणूनाथ बिदे या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना बँकेच्या कर्ज योजनांची माहिती देण्याची सूचना पुरी यांनी या वेळी केली.

दुष्काळी तालुक्यांतील कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी
नगर, १६ जून/प्रतिनिधी
कर्जतसह इतर दुष्काळी तालुक्यातील विहिरींवरील वीजपंपाचे बिल माफ करण्याची मागणी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली.
कर्जत, हंडाळवाडी, मलठण, नांदगाव, दिघी, कुंभेफळ, शिंदे, खातगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिके येत नाहीत. विहिरींनाही कमी पाणी असते. पीक-पाणी नसले, तरीही वीजपंपांची बिले मात्र नियमित येतात. उत्पादन नसल्याने शेतकऱ्यास बिले भरणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी वीजबिले माफ करावीत, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर गोदड राऊत, लाला खुडे, छबू पवार, केशव तोरडमल, बलभीम देवकर, तुकाराम क्षीरसागर, अशोक चव्हाण, इलियास पठाण आदी ४२ शेतकऱ्यांच्या सह्य़ा आहेत.

आपेगावातील अवैध धंदे बंद न केल्यास आंदोलन
नगर, १६ जून/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आपेगाव येथे अवैध धंदे, तसेच गुंडगिरीही वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह आपेगावच्या महिलांनी दिला.
या महिलांनी काल पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. शेवगावपासून १२ किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात दारूअड्डे आहेत. त्यामुळे व्यसनी लोकांचे प्रमाणही खूप आहे. त्यांच्यामुळे गावाची शांतता भंग पावली आहे. विरोध केला, तर अवैध धंदेवाले तलवारीचा धाक दाखवून दमदाटी करतात. महिलांची छेड काढतात, असे निवेदनात म्हटले आहे.

पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ;११४ गावे, ३०० वाडय़ांना टँकर
नगर, १६ जून/प्रतिनिधी
पाऊस ताण देत असल्याने जिल्ह्य़ातील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाडय़ांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सध्या ११४ गावे व ३०० वाडय़ांना ८७ टँकरद्वारे पिण्याचे पाणी दिले जात आहे. जूनच्या सुरुवातीला पडल्यानंतर जवळपास जिल्ह्य़ातून पाऊस गायब झाला आहे. एप्रिल-मेसारखे कडक ऊन रोज पडत आहे. त्यामुळे पाणीसाठेही कमी होत चालले आहेत. त्याशिवाय हवेत दिवसा व रात्रीही बराच उष्मा असतो. पावसाळी वाऱ्यांचा तर पत्ताच नाही.संगमनेर, अकोले, नगर, पाथर्डी, पारनेर, शेवगाव तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या रोज वाढत आहे. संगमनेरमध्ये १४ गावे ५७ वाडय़ा, अकोल्यात २१ गावे, ५९ वाडय़ा, नगर तालुक्यात १६ गावे १४ वाडय़ा, पारनेर व शेवगाव येथे अनुक्रमे १३ व १२ गावे, तसेच ३१ व ३२ वाडय़ांमध्ये पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जात आहे.

रोटरी क्लब सेंट्रलला ६ राज्यस्तरीय पुरस्कार
नगर, १६ जून/प्रतिनिधी
सोलापूर येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल ३१३०मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलला ६ विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.राज्यस्तरीय सवरेत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार (राजेश परदेशी), सवरेत्कृष्ट बुलेटिन (सेंट्रल पोस्ट वार्तापत्र), समाजप्रबोधनाबद्दल प्रेसिडेंट सायटेशन अ‍ॅवार्ड, समाजकार्याबद्दल कम्युनिटी सव्‍‌र्हिस पुरस्कार, पल्स पोलिओ मोहिमेबद्दल अ‍ॅप्रिसिएशन व डॉ. एस. व्ही. जोशी यांना वैयक्तिक असे एकूण ६ पुरस्कार नगर शाखेला मिळाले.प्रांतपाल झुबेन आमरिया यांच्या हस्ते राजेश परदेशी, नीलम परदेशी, निर्मल गांधी, डॉ. जोशी, अमृत कटारिया, व सुरेश मेंड यांनी हे पुरस्कार स्वीकारले. समारंभात राज्यातील ६५ क्लबचा सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरात रोटरीने अकोळनेर गाव दत्तक घेणे, संजयनगर झोपडपट्टीतील बालकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम, कष्टकरी बलुतेदारांचा सत्कार, मूकबधिर विद्यालयात कार्यक्रम, महिला आरोग्य चळवळ असे अनेक उपक्रम राबविले.

साईधाम मंदिराचा दहावा वर्धापनदिन उत्साहात
कोपरगाव, १६ जून/वार्ताहर
साईनामाचा गजर व सुरेल भक्तिगीते गात भक्तिमय वातावरणात साईधाम मंदिराचा दहावा वर्धापनदिन साजरा झाला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. साईधाम ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिकानगर भागात १ कोटी रुपये खर्चून साईमंदिराची उभारणी केली. धोंडीरामबाबा हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. यानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील भक्तांनी यावेळी येथे हजेरी लावली. साईबाबांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साईबाबांच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती.

निवृत्तीनाथ पालखीचे श्रीरामपूरमध्ये स्वागत
श्रीरामपूर, १६ जून/प्रतिनिधी
‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, निवृत्तीमहाराज की जय’ या घोषात त्र्यंबकेश्वरहून आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथांच्या पालखी व दिंडीचे येथील संगमनेर नाक्यावर स्वागत करण्यात आले.नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक दिलीप नागरे, राजेश अलघ, लक्ष्मण कुमावत, मोहम्मद शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोकडीया, सदस्य मोहनलाल कुकरेजा, सुधिर डंबीर, बाजार समितीचे संचालक संजय कोठारी, हरिभाऊ आजगे आदींनी स्वागत केले. पालखी सोहळ्याचे निवृत्तीमहाराज संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, मोहनमहाराज बेलापूरकर, ज्ञानेश्वर गोसावी या वेळी उपस्थित होते. दिंडीत सुमारे १० हजार भाविक होते. रस्त्याने अनेक मंडळांनी वारकऱ्यांना खाद्य पुरविले. पालखी येथून बेलापूरकडे रवाना झाली.

श्रीचैतन्य कानिफनाथ दिंडीचे निघोजहून प्रस्थान
निघोज, १६ जून/वार्ताहर
पंढरपूर वारीतून समाजसुधारण्याचे कार्य होते. म्हणूनच दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तिमार्ग साधण्यासाठी एकदा तरी पंढरपूर वारी करावी, असे आवाहन अंजना मेडिकल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केले.येथील चैतन्य कानिफनाथमहाराज दिंडी सोहळ्याचे पंढरपूर वारीसाठी देहूला प्रस्थान झाले. या वेळी कोरडे यांच्या हस्ते वीणापूजन करून दिंडीला निरोप देण्यात आला. दिंडीचालक गोरख ढवण, रंगनाथ ढवण, दिलीप ढवण, भाऊसाहेब कोल्हे, दत्ता घोगरे, गौतम तनपुरे, अंकुश लोखंडे, बाबाजी गारूडकर, नीलेश वराळ उपस्थित होते.कोरडे म्हणाले की, पंढरपूर वारीची बऱ्याच वर्षांची परंपरा अनेक गावांमध्ये जतन केली आहे. भक्तिमार्गाचे महत्त्व समाजातील लहान-थोरांना समजते. वारीमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचा एकमेकांशी संवाद होतो. यातूनच आपल्या राज्याच्या जडणघडणीची माहिती मिळते. पंढरपूर वारी हा आपल्या आयुष्यातील सर्वात मौलीक ठेवा आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी
कोपरगाव, १६ जून/वार्ताहर
करंजी येथे रस्त्याच्या कडेला उघडय़ावर शौचास बसलेल्या पाच वर्षांच्या मुलावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. मात्र, एका युवकाने प्रसंगावधान राखून या मुलाचे प्राण वाचविले.गौरव बाळासाहेब भातकुडव हा वैजापूर रस्त्याच्या कडेला शौचास बसलेला असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. संदीप शिंदे या युवकाने कुत्र्याला लाथा-बुक्क्य़ांनी मारून हाकलून लावले.

कोल्हारमध्ये आज ‘बंद’ व ‘रास्ता रोको’
कोल्हार, १६ जून/वार्ताहर
येथील कोल्हार-भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या प्रशासकीय मंडळाच्या निवडीच्या निषेधार्थ उद्या (बुधवारी) सकाळी ८ वाजता माधवराव खर्डे चौकात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या गाव बंद, तसेच नगर-मनमाड मार्गावर ‘रास्ता रोको’ही करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आज दुपारी ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आले. तशा आशयाचे फलक गावात लावले आहेत.

नेवासे ही कर्मभूमी - वाकचौरे
नेवासे, १६ जून/वार्ताहर
नेवासे तालुका ही माझी कर्मभूमी आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी अधिकाधिक विकासकामे करणार आहे. तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.रस्तापूर येथे मनसुखलाल गांधी चौक नामकरण फलकाचे अनावरण श्री. वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे हरिभाऊ शेळके, श्रीकांत साठे, विजया अंबाडे, दिनकरराव गर्जे, विठ्ठलराव लंघे, सुंदरदास हारकळ, आसाराम मचे, बाबासाहेब भाकड, सुरेश अंबाडे, रामभाऊ खंडागळे उपस्थित होते.

हृदयविकाराच्या झटक्याने मालमोटारचालकाचा मृत्यू
नगर, १६ जून/प्रतिनिधी
मालमोटारचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. काल सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना नगर-सोलापूर रस्त्यावरील रूईछत्तीशी शिवारात घडली. गणेशन आरस्वामी कोडरम (५० वर्षे, रा. दक्षिण तोटम, नव्हीपारायण, तामिळनाडू) असे मृताचे नाव आहे. गणेशन मालमोटार घेऊन नगरकडे येत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याच्या सहकाऱ्याने मालमोटार थांबवून गणेशनला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारापूर्वीच तो मरण पावला. घटनेचा तपास हवालदार खैरे करीत आहेत.

नवोदय विद्यालयासाठी प्रतीक नागरगोजे याची निवड
नगर, १६ जून/प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालय प्रवेशासाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षेत शेवगाव येथील रेसिडेन्सिअल विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक भास्कर नागरगोजे याची निवड झाली. त्यास बी. बी. कातकडे, श्रीमती आय. एस. धनवट या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल प्राचार्य वांढेकर, उपमुख्याध्यापक काळे, पर्यवेक्षक चव्हाण आदींनी प्रतीकचे अभिनंदन केले.

विजय कुलांगे यांची तहसीलदारपदी निवड
नगर, १६ जून/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा (२००६) परीक्षेत यश मिळविणाऱ्या येथील विक्रीकर निरीक्षक विजय अमृत कुलांगे यांची तहसीलदार पदासाठी निवड झाली. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा या गावचे ते रहिवासी आहेत.