Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

मत्स्य विज्ञान विद्यापीठात धुमाकूळ
विदर्भ प्रदेश विकास परिषदेने कुलगुरूंचा कार्यक्रम उधळला

नागपूर, १६ जून/ प्रतिनिधी

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या विद्यार्थी समितीच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. कार्यकर्त्यांनी कुंडय़ा व काचा फोडून विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. विद्यापीठातील संशोधन आणि विकास तसेच विद्यापीठाच्या विरोधात बाहेरच्या लोकांकडून होणाऱ्या आंदोलनासंदर्भात कुलगुरू डॉ. अरुण निनावे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

विकास आराखडे कागदोपत्रीच अंमलबजावणीचा टक्का नापास
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

शहराच्या आणि गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी आराखडे तयार करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात लेआऊट्सना मंजुरी देताना आणि बांधकाम करताना हे आराखडे कागदांवरच राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आराखडय़ांची अंमलबजाणी अल्पांशाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा भुतकाळात झालेला विकास आणि लोकसंख्येच्या आधारावर भविष्यात होणारा विकास लक्षात घेऊन विकास आराखडा तयार केला जातो.

एम्प्रेस मिलच्या जागेवर निवासी संकुल म्हाडाला मुहूर्त सापडला
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

आग्याराम देवी मंदिर चौकातील एम्प्रेस मिलच्या जागेवर गेल्या एक तपापासून प्रलंबित असलेले निवासी संकुल बांधण्यास म्हाडाला मुहूर्त मिळाला असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काम प्रश्नरंभ करण्यात येणार आहे. आर्थिक मंदीचा फटका म्हाडाच्या या योजनेलाही बसला. परिणामी व्यापारी संकुलाऐवजी निवासी सदनिकांकडे वळण्याचा मार्ग म्हाडाने पत्करला. यामुळे सध्या फक्त निवासी संकुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष गौतम चटर्जी यांनी निवासी संकुलाच्या योजनेस संमती दिली आहे.

खैरलांजी हत्याकांड; सुनावणी ३० जूनपर्यंत पुढे ढकलली
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीसाठी सी.बी.आय.ने केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. खैरलांजीच्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, तिची मुलगी प्रियंका भोतमांगे आणि मुलगे सुधीर व रोशन यांचा खून केल्याच्या आरोपाखाली भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी सकरू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मंडलेकर व प्रभाकर मंडलेकर या सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

जलाशयांमध्ये ३ टक्केच साठा
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

नागपूर विभागातील ५ मोठे व १३ मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित मोठय़ा प्रकल्पांमध्ये फक्त ३ टक्के तर मध्यम प्रकल्पात फक्त ५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतांश लहान जलायशेही कोरडी पडली असून उर्वरित जलाशयांतही फक्त ३ टक्के पाणीसाठा उरला आहे. येत्या आठ दिवसात मृगाचा पाऊस आला नाही तर विभागात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता आहे. विभागात एकूण १४ मोठे प्रकल्प असून त्यातील नागपूर जिल्ह्य़ातील लोअर (नांद) व कामठी (खैरी), गोंदिया जिल्ह्य़ातील पुजारीटोला व कालीसरार तसेच गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्प कोरडे पडले आहेत.

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आज येणार
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख उद्या, बुधवारी सकाळी नागपूरच्या विमानतळावर येणार असून तेथेच ५० मिनिटे थांबणार आहेत. अकोल्याहून सकाळी साडे आठ वाजता विशेष विमानाने त्यांचे येथे आगमन होईल. यानंतर ९ वाजून २० मिनिटांनी ते दिल्लीला रवाना होतील.
केंद्रीय मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विलासराव देशमुख पहिल्यांदाच त्यांच्या ‘ड्रिम सिटी’त येत आहेत. शहरात त्यांचा कोणताही कार्यक्रम नसल्याने ते विमानतळाबाहेर येणार नाही. पण, शहरातील नेते आणि समर्थकांना ते भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘स्टार’ प्रचारकाची भूमिका वठवली. विदर्भात जोरदार प्रचार करताना नागपुरात त्यांनी तीन दिवस ठाण मांडले होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी आज मुंबईत बैठक
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची प्रलंबित वेतन कराराची मुदत संपून एक वर्ष लोटूनही नवा करार झाला नाही. त्यासाठी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वात १७ जूनला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईला बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतन करार करण्याची मागणी लावून धरणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस दादाराव डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच एमआरपीयुटी अ‍ॅक्ट रद्द करणे किंवा त्यात दुरुस्त्या करण्यासाठी संशोधन करणे, कनिष्ठ वेतन श्रेणीच्या कामगारांना समान काम-समान दाम देणे, समय वेतन श्रेणीकरिता कायद्याप्रमाणे कालमर्यादा निश्चित करणे, सरकारकडे असलेले व मान्य केलेले ४६५ कोटी रुपये एसटी महामंडळाला अदा करणे, करापोटी जास्त गेलेले २८३ कोटी रुपये त्वरित परत करणे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अवैध प्रवासी वाहतूक बंद करणे, प्रवासी कर कमी करणे, चालक वाहकांकरिता अद्ययावत विश्रामगृह बांधणे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे लावून धरल्या जाणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष अशोक गोमासे, कोषाध्यक्ष बाबा डहारे, संजय श्रीवास्कर, मनोहर पवनीकर, काशिनाथ गोमासे, दिनेश भुसारी, अशोक कोल्हे उपस्थित होते.

अफुमच्या रसिकांनी घेतला फ्रेंच वृत्तपटाचा अनुभव
नागपूर, १६ जून/प्रतिनिधी

‘दी मार्च ऑफ दी पेंग्विन्स’ या फ्रेंच डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन नुकतेच अफुमच्या रसिकांसमोर करण्यात आले. फ्रेंच वैज्ञानिकांच्या चमुने ते कशाप्रकारे चित्रित केले, हेही यावेळी दाखविण्यात आले. या डाक्युमेंट्रीकरिता वैज्ञानिक कित्येक मैल पायी फिरले, एका बलुनला कॅमेरा बांधून पेंग्विन्सच्या सर्व हालचाली आकाशातून व बर्फाळ पाण्याच्या आतून कशा टिपल्या हे यावेळी दाखवण्यात आले. उन्हाळा संपला की, समुद्रापासून सुमारे शंभर मैल दूर असलेल्या प्रदेशात पेंग्विन ब्रिडींगच्या जागेकरता वाटचाल करतात. ब्रिडींगकरता सहचर शोधण्याची प्रक्रिया व त्यांचा प्रणय अत्यंत मोहकपणे या वैज्ञानिकांच्या चमुने टिपला आहे.
प्रश्न. प्रदीप नवघरे यांनी फोटोग्राफी किती व कशी सुंदर असू शकते याचे विवेचन केले. पेंग्विनच्या जीवनाचे उत्तम भावपूर्ण काव्य या चित्रफितीमुळे रसिकांना अनुभवता आल्याची प्रतिक्रिया सुधीर देव, शिरीष दारव्हेकरांनी दिली. पुढील महिन्याच्या पहिल्या रविवारी आंद्रे रिवू यांची आर्केस्ट्रावरील चित्रफित दाखविण्यात येणार आहे. याप्रसंगी चित्रपट निर्मात्या माधुरी अशीरगडे यांनी त्यांचे चित्रीकरणासंबंधीचे अनुभव चर्चेच्या माध्यमातून रसिकांना सांगितले.

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसाठी ‘होंडा सिटी’
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात प्रत्येकवेळी भाडय़ाने कार घेण्यामुळे त्रस्त झालेल्या जिल्हा प्रशासनाला यातून मुक्ती मिळाली आहे. या दोघाही मान्यवरांना आता संत्रानगरीत फिरण्यासाठी दोन नव्या ‘होंडा सिटी’ कार उपलब्ध झाल्या असून नागपुरातील ‘डीव्ही’ कारच्या ताफ्यात त्या सहभागी झाल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच नागपुरातील ‘डीव्ही’ कारला चौकोनी लाल दिवे आहेत. एरवी गोल दिवा असायचा. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन कॉन्टेसा कार होत्या. पण, कालांतराने त्या कालबाह्य़ झाल्यामुळे अलीकडच्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कार भाडय़ाने घेण्यात येऊ लागल्या. या कार सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभ्या असून लवकरच राजभवनात ठेवण्यात येणार आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असल्याने अन्य कोणत्याही मंत्र्याला या कार उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने मुंबईत खरेदी केलेल्या या कार नागपूरला पाठवल्या आहेत. नागपूरसह विदर्भातील मंत्री व अनेक बडय़ा नेत्यांकडे आलीशान कार आहेत. मात्र, शासनाने त्यांच्या सोयीसाठी खरेदी केलेल्या या पहिल्याच होंडा सिटी कार आहेत.

जेर आवारी यांना श्रद्धांजली अर्पण करताना गेव्ह आवारी व इतर.
प्रश्न. जेर मंचरशा आवारी यांच्या स्मृतिदिनी निराधारांना भोजनदान
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

समाजसेविका प्रश्न. जेर मंचरशा आवारी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त उंटखाना परिसरातील होम फॉर एजेड अ‍ॅण्ड हँडिकॅपमधील निराधारांना माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या हस्ते भोजनदान करण्यात आले. यावेळी त्यांनी जेर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी जस्मीन आवारी, प्रश्न. अनाहिता रांदेलिया, दिलनार रांदेलिया, सिस्टर मर्लिन, सिस्टर आयरीन, ज्ञानेश्वर चामट, रमेश गिरडकर, श्याम हटवार, असित लिहीतकर, कमलाकर मस्के, मनीष त्रिवेदी, सुशांत दंडेवार, राजेश कांबळे, भाऊराव कोकणे आणि प्रशांत दंडेवार प्रश्नमुख्याने उपस्थित होते.

भारतीय सेवा मंडळाच्या कार्यालयास आमदार देवेंद्र फडणवीसांची भेट
नागपूर, १६ जून/प्रतिनिधी

भारतीय सेवा मंडळ या सामाजिक संस्थेच्या नरेंद्रनगर येथील केंद्रीय कार्यालयास आमदार देवेंद्र फडणवीस व नगरसेवक संदीप जोशी, प्रश्न. प्रभू देशपांडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. भारतीय सेवा मंडळ ही सामाजिक सेवाभावी संस्था नागपूर तसेच, विदर्भात अनेक वर्षापासून नि:स्वार्थपणे गोरगरीब व उपेक्षितांसाठी कार्य करत आहे. तसेच, मागील तीन वर्षापासून माहितीचा अधिकार कायद्याविषयी मार्गदर्शन, जाहीर कार्यक्रम व शिबिराच्या माध्यमातून सातत्याने राम आखरे कार्य करीत आहेत, ही नागपूरकरांसाठी कौतुकास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया या भेटीदरम्यान आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन भारतीय सेवा मंडळाचे संस्थापक राम आखरे यांनी केले. कृ.द. दाभोळकर यांनी आभार मानले.

वेकोलि मुख्यालयात एनसीडब्ल्यूए उपसमितीची बैठक
नागपूर, १६ जून/प्रतिनिधी

जेबीसीसीआय एनसीडब्ल्यूएच्या उपसमितीची पहिली बैठक १३ जूनला वेकोलि मुख्यालयात पार पडली. बैठकीत कोळसा कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळात त्यांना पदोन्नतीच्या संधी, वेतनवृद्धीच्या तारखेत एकरुपता, सेवेशी संबंधित पदोन्नती, पगारवाढ आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीला वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग, संचालक ओ.पी. मिगलानी, संचालक आर.मोहन दास, संचालक टी.के. चाँद, संचालक आर.एस. सिंह, संचालक ए.के. सिन्हा, मुख्य महाव्यवस्थापक जी. रेड्डी, मुख्य महासंचालक ए.के. वर्मा आदी उपस्थित होते.

महाविद्यालयांनी गुणवत्तेला प्रश्नधान्य द्यावे -मनविसे
नागपूर, १६ जून/प्रतिनिधी

महाविद्यालयांनी आरक्षणापेक्षा टक्केवारीस व गुणवत्तेला प्रश्नधान्य दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थन करेल मात्र, कमी गुण असूनही पैशाच्या जोरावर एखाद्याला कोणत्याही महाविद्यालयाने प्रवेश दिला तर मनविसेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात येईल, असा इशारा मनविसेचे शहरप्रवक्ता महेंद्र कठाणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेच्या वेळी सरकारी व खासकरून खासगी महाविद्यालयांनी पैशाची लुटमार करू नये. आरक्षण तसेच, पैशाच्या अरेरावीमुळे इतर मागासवर्गीयांमधील गुणवंत विद्यार्थी मागे पडत आहेत. नागपुरात सरकारी महाविद्यालयांसह खासगी महाविद्यालये मोठय़ा प्रमाणावर आहेत. या खासगी महाविद्यालयांमध्ये पैशाचा आधारावर प्रवेश देण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय बाहेर राज्यातून आलेल्या मुलांना प्रश्नधान्य देऊ नये अन्यथा मनविसेतर्फे आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही कठाणे यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला मनविसेचे शहरप्रमुख सुदर्शन वैद्य, मनविसेचे शहरसचिव शशिकांत चमके, आलोक भगत, किरण सुरसे, नितेश मेहर, कमलेश यादव, रवी कुडे, गुड्ड यादव, मिथुन करेटी, सागर चरडे आदी उपस्थित होते.

बालगृहाच्या वर्धापनदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

मातोश्री पार्वतीबाई दुल्लरवार मतिमंद मुलींच्या बालगृहाचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी प्रश्नदेशिक मनोरुग्णालयाचे डॉ. सुलेमान विरोनी, महिला व बालकल्याण विभागाचे परिवीक्षा अधिकारी एम.डी. हजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पुरी, संस्थेचे सचिव गुलाब दुल्लरवार, सहसचिव प्रेरणा दुल्लरवार, अधीक्षिका ईशा वैद्य, मुख्याध्यापिका मोनाली दुल्लरवार, अधीक्षक अमित कल्लमवार उपस्थित होते. मतिमंद मुलींचे पालनपोषण आणि सांभाळ करणे कठीण असले तरी, सर्व कर्मचाऱ्यांनी ते व्यवस्थित पार पाडले, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चतुर्थश्रेणी कर्मचारी किशोर बर्वे, राजू गिरडे, उर्मीला करोसिया यांना उत्कृष्ट कामगिरीकरता गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिन चहांदे यांनी केले. सुनिल बावणे यांनी आभार मानले.

सोहोळ्यात ११७ जोडप्यांचा विवाह
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

सर्वधर्मसमभाव एकता सामाजिक संस्थेच्यावतीने सर्वधर्मीय ११७ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहोळा रिंग रोडवरील जगत सेलिब्रेशन हॉल येथे नुकताच पार पडला. या सोहळ्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाजातील जोडपी सहभागी झाली होती. सोहळ्याला पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेंद्र कुमार, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश मंत्री, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा उपस्थित होते.

शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
नागपूर, १६ जून / प्रतिनिधी

पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप बिजवे हे पोलीस आयुक्तांचे वाचक राहतील. विद्यमान वाचक सुरेश चव्हाण यांची विशेष शाखेत तर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सवाई यांची जरिपटका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. जरिपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धोत्रे, गुन्हे शाखेचे रवींद्र पिसाळ आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक भलावी यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक अरुण सावंत यांची सीताबर्डी पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक जयदेव भिवगडे यांना लकडगंज पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक, लकडगंज पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक एन. एच. राठोड यांची नियंत्रण कक्षात, वाहतूक पश्चिमचे पोलीस निरीक्षक धोरण यांना विशेष शाखेत, वाहतूक उत्तरचे पोलीस निरीक्षक चौधर यांना वाडी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक, वाहतूक उत्तरचे पोलीस निरीक्षक सुरेश लांबट यांना गुन्हे शाखेत पाठवण्यात आले. विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक खुजे यांना प्रशासन विभागात सहायक पोलीस आयुक्तपदी पाठवण्यात आले आहे.