Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
विश्व ब्रह्मचि ठेले

 

उपनिषदांचा काय किंवा आपल्या वेदांचा काय, एक महत्त्वाचा सिद्धान्त असा आहे, जीव मूलत: आत्मस्वरूप आहे. असे असूनही जिवाच्या ठायी ऐश्वर्य का दिसत नाही? याचे कारण ऋषी देतात. जीव आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो. जिवाच्या ठिकाणी असलेली अविद्या त्याला निजरूप विसरायला भाग पाडते. ‘स्व’त स्वत:त छान रमावे हा जो आत्म्याचा गुण तो देहाच्या लक्षात राहात नाही. तो जड वस्तूत रमण्याची धडपड करतो. जड वस्तू अनंत असल्याने तो त्या वस्तूत वाटला जातो. उणा पडतो. त्याला मोठय़ा खोलीतला समईचा प्रकाश मंद दिसतो. पण देवघरातली समई तीव्र वाटते. अनंत वस्तूत वाटले गेलेले प्रेम क्षीण होते. तेच प्रेम एका भगवंतावर केले की प्रखर होते. ऋषींच्या मते साधना ही अशी असते. विचाराने विवेकावर लक्ष केंद्रित करावे. म्हणजे साधना पूर्णतेकडे जाते. कदाचित मनात प्रश्न यावा. ‘संसारात पुष्कळ प्रेम आहे. भगवंतावर कमी प्रेम आहे. कसे काय करावे?’ याला गु. बाबासाहेब बेलसरे यांनी छान उत्तर दिले आहे. ‘संसारातले प्रेम राहू द्यावे. फक्त त्या प्रेमामध्ये भगवंत मिसळावा.’ आपल्या आनंददायी संसारावर प्रेम करताना एवढे कृपया म्हणावे, ‘हे सारे भगवंताचे आहे. खरी मालकी त्याची असून, मी त्याचा विश्वस्त आहे,’ अशी भावना मनात आली पाहिजे नि प्रपंचात तसे राहिले पाहिजे, अशी वृत्ती निर्माण झाली की शांतीचा आणि समाधानाचा अनुभव येतो. एका साधकाने प्रश्न विचारला, ‘ब्रह्मविद्येच्या योगाने आम्ही हे सर्व होऊ असे जे समजतात ते ब्रह्म काय आहे?’ याला उत्तर देताना ऋषी म्हणतात, ‘आतून जाणीवपूर्वक व्यापक होणे म्हणजे ब्रह्म आहे. जे जे ज्ञानसंपन्न आहे ते ते सारे ब्रह्मरूप आहे.’ याचा अर्थ आपले सर्वव्यापित्व अनुभवास येणे हा ब्रह्मसाक्षात्कार आहे. रामा जनार्दनी संत ज्ञानदेवांच्या आरतीत म्हणतात, ‘प्रकट गृहय़ बोले। विश्व ब्रह्मचि ठेले।।’
यशवंत पाठक

कु तू ह ल
वैषुविकवृत्त
वैषुविकवृत्त हे काय आहे? त्याचं महत्त्व काय आहे?
पृथ्वी स्वत:भोवती ज्या अक्षात फिरते, त्याच अक्षाभोवती आकाशाचा गोलही फिरत असलेला आपल्याला भासतो. हा अक्ष उत्तर ध्रुवबिंदू आणि दक्षिण ध्रुवबिंदू या दोन काल्पनिक बिंदूंत खगोलाला छेदतो. त्यातल्या उत्तरेकडील ध्रुवबिंदूचं स्थान हे उत्तर क्षितिजाच्या वर असून त्याच्या जवळच ध्रुवतारा वसला आहे. दक्षिणेकडील ध्रुवबिंदूचं स्थान मात्र क्षितिजाखालील आकाशात असतं. आपला डावा हात ध्रुव ताऱ्याकडे रोखा आणि उजवा हात हा डाव्या हाताशी नव्वद अंशाचा कोन करून क्षितिजावरील पूर्वबिंदूपासून पश्चिमबिंदूपर्यंत आकाशातून फिरवा. आकाशाच्या पाश्र्वभूमीवर एक वर्तुळ आखलं जाईल. खगोलाच्या अक्षाला नव्वद अंशांचा कोन करणाऱ्या या काल्पनिक वर्तुळाला वैषुविकवृत्त म्हणतात. दिवसभरात ध्रुवबिंदूभोवती समान अंतरावरून वर्तुळाकार मार्गाने फिरताना, या ताऱ्यांनी वैषुविकवृत्ताशीही सतत समान अंतर राखलेलं असतं. विषुववृत्त जसं पृथ्वीला भौगोलिकरीत्या दोन गोलार्धात विभागतं, तसं वैषुविकवृत्त हे आकाशाला खगोलशास्त्रीयदृष्टय़ा दोन गोलार्धात विभागतं.
उत्तर गोलार्धातील निरीक्षकाच्या दृष्टीने वैषुविकवृत्ताच्या उत्तरेकडचे तारे हे बारा तासांहून अधिक काळ क्षितिजाच्या वर असतात, तर वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेकडचे तारे हे बारा तासांहून अधिक काळ क्षितिजाच्या खाली असतात. (दक्षिण गोलार्धातील परिस्थिती याउलट असते). वैषुविकवृत्ताची स्थिती ही निरीक्षणाच्या स्थानावर अवलंबून असते. पृथ्वीवरील विषुववृत्तावर आकाशातील उत्तर ध्रुवबिंदू हा क्षितिजावरील उत्तरबिंदूवर असतो. ध्रुवबिंदूशी नव्वद अंशांचा कोन करणारं वैषुविकवृत्त या ठिकाणी थेट निरीक्षकाच्या डोक्यावरून जातं. जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसा खगोलीय ध्रुवबिंदू हा वर सरकत जातो. परिणामी, वैषुविकवृत्त हे दक्षिणेकडे अधिकाधिक झुकायला लागतं. उत्तर ध्रुवावर खगोलीय ध्रुवबिंदू हा अगदी डोक्यावर असतो. त्यामुळे इथे नव्वद अंशांचा कोन करणारं वैषुविकवृत्त हे क्षितिजाशी एकरूप झालेलं असतं.
राजीव चिटणीस
दुरुस्ती- सोमवार(दि. १५. ६. ०९)च्या उत्तरातील दुसऱ्या वाक्यात ‘पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे’ असे लिहिले आहे. त्याऐवजी ‘पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्यामुळे’ असे वाचावे.
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
एडवर्ड पहिला
इंग्लंडचा राजा तिसऱ्या हेन्रीचा मोठा मुलगा एडवर्ड पहिला याचा जन्म लंडन येथे १७ जून १२३९ रोजी झाला. त्याच्या वडिलांचा स्वभाव उधळय़ा होता. राज्यकारभारातही त्यांचे लक्ष नव्हते. तेव्हा इंग्लंडच्या सरदार, उमरावांनी हेन्रीचा पराभव करून कैदेत टाकले. एडवर्डने मोठय़ा शिताफीने उमरावाचा पराभव करून आपल्या वडिलांची सुटका केली. हेन्रीच्या मृत्यूनंतर १२७४च्या सुमारास ते इंग्लंडच्या गादीवर आला. राज्यकारभार हाती घेतल्यावर त्यांनी सरंजामशाही निकालात काढली. लोकशाही स्थापण्यासाठी कायद्यात बदल केले. मॉर्टमेनचा कायदा करून जमीन विक्रीत सुधारणा केली. सैन्य दलातही सुधारणा घडवून आणल्या. या सुधारणा कायद्यामुळे त्यांना न्यायप्रवीण इंग्रज ही उपाधी मिळाली. एकाच वेळेस त्यांनी फ्रान्स, वेल्स व स्कॉटलंड या तिन्ही देशांशी युद्ध पुकारले. युद्धात जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सामान्य लोकांपासून ते उमराव, बडे लोक यांचे प्रतिनिधी बोलावून एक मॉडेल पार्लमेंट स्थापन केले. या युद्धात त्याने वेल्सच्या राजाला ठार मारून तो प्रदेश कायमचा इंग्लंडला जोडला. वेल्सचा राजा मारला गेल्याने तेथील प्रजा नाराज होती. तेव्हा मुत्सद्देगिरी दाखवून आपल्या मोठय़ा मुलाची तेथे राजा म्हणून नेमणूक केली. त्या वेळेपासून इंग्लंडच्या राजाच्या मोठय़ा मुलाला प्रिन्स ऑफ वेल्स अशी म्हणण्याची प्रथा पडली. यानंतर फ्रान्सबरोबरही शांततेचा तह करून इंग्लंडला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. दरम्यानच्या काळात इंग्लंडच्या असंतुष्ट उमरावांना शांत करण्यासाठी द ग्रेट चार्टरला मान्यता दिली. याच काळात स्कॉटलंडमध्ये पुन्हा उठाव झाला. उठावाचे नेतृत्व रॉबर्ट ब्रूसकडे होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते चालले असताना वाटेतच दगदगीमुळे ७ जुलै १३०७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
संकल्पा व यमुआजी
संकल्पा शाळेतून आली. पाहते तर आई जरा वैतागलेली दिसली. संकल्पा घरात आली. तिने आईने टेबलावर ठेवलेले दूध पिऊन टाकले. बिस्किटे खाल्ली. ती नेहमीप्रमाणे यमुआजीच्या खोलीत डोकावली. कारण नेहमी ती शाळेतून आली की यमुआजी तिची वाट बघत बसलेली असायची. स्वत:च्या उशीखालून एक स्क्वेअर चॉकलेट संकल्पाला देऊन ती म्हणायची, ‘आज काय काय घडलं म्हणे आमच्या राणीच्या शाळेत?’ आणि मग संकल्पा शाळेत घडलेल्या सगळय़ा गोष्टी यमुआजीला सांगायची. अगदी शास्त्राच्या प्रयोगशाळेत केलेले प्रयोगसुद्धा ती समजावून सांगायची. यमुआजीला ’, Hcl, H2O2...वगैरे काही कळायचं नाही. तरीसुद्धा नातीचं सगळं सगळं ती खूप कौतुकाने ऐकायची. प्रश्न विचारायची. तिची पाठ थोपटायची. वाहवा करायची.
शाळेतून येऊन दूध पिऊन झाल्यावर आईनं संकल्पाला विचारलं, ‘अगं संकल्पा, आजीची जेवणाची पांढरी थाळी कुठे सापडत नाहीये. त्यामुळे आज जेवण नाही देता आलं. तू पाहिलीस का कुठं?’ यमुआजीसाठी राहायला अंधारी एक खोली होती आणि तिला काचेच्या डिशमध्ये जेवता येणार नाही. सेटमधली डिश फोडेल म्हणून आईने तिच्यासाठी पांढरी एनामल्ड थाळी आणली होती. संकल्पाला त्या थाळीत आजी जेवताना पाहून नेहमी फारच वाईट वाटायचे. तिचा मित्र अक्षय एकदा तिला म्हणाला, ‘तुझी आजी ज्या ताटात जेवते तशाच ताटात आमचा टॉमी खातो. अगं, ती कुत्र्यांची डिश असते.’ संकल्पाला फार रडायला आले होते. पण आईचा कडक स्वभाव होता. संकल्पाच नाही तर बाबासुद्धा घाबरायचे आईला काही सांगायला. आई यमुआजीशी कधी फारशी बोलायची नाही. बोलली तर धमकी दिल्यासारखी बोले. बिचारी यमुआजी कधी कसली तक्रार करायची नाही की कधी काही मागायची नाही.
आई थाळी शोधतेय हे पाहून संकल्पा म्हणाली, ‘अगं आई, मीच ती थाळी माळय़ावर ठेवून दिली काल.’ ‘का?’ आईने आश्चर्याने विचारले, ‘अगं, तू म्हातारी झालीस यमुआजीसारखी की तुला त्यात जेवण देता येईल. तूसुद्धा फोडशीलच ना डिनर डिश दिल्यावर.’ संकल्पा म्हणाली. त्या रात्री आईने यमुआजीला सर्वाबरोबर डिनर सेटच्या डिशमध्ये जेवण दिले.
मोठय़ा माणसांचे वागणे नेहमीच बरोबर असते असे नाही. काही वेळा त्यांचेही काही बाबतीत चुकते. उद्धटपणा न करता नम्रपणे त्यांची चूक आपण लक्षात आणून देणे चुकीचे नाही.
आजचा संकल्प- मला एखादी गोष्ट अयोग्य वाटली तर मी ती लक्षात आणून देईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com