Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

बेलापूरवर भाजपचा दावा : सेना नेते अस्वस्थ
नवी मुंबई / प्रतिनिधी ठाणे लोकसभा मतदारसंघात पराभवाचे तोंड पहावे लागल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप हे दोन मित्रपक्ष बेलापूर मतदारसंघातील उमेदवारीवरून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाशी ते बेलापूर अशा उपनगरांच्या पट्टय़ात पसरलेला हा नवा मतदारसंघ सुशिक्षित तसेच बहुभाषिक नवी मुंबईचे प्रतीक मानला जातो. या मतदारसंघातून भाजपचे नवी मुंबई संघटक तसेच प्रसिद्ध विकासक सुरेश हावरे यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालविली असून हावरे यांचे तारू सध्या वेगाने सुटल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे.

सरकारी कार्यालयांना गरुडा फोन मोफत
पनवेल/प्रतिनिधी : आपत्कालीन परिस्थितीमध्ये दूरध्वनी सेवा कोलमडण्याची शक्यता असल्याने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडतर्फे पनवेलमधील तहसीलदार कार्यालय, शहर पोलीस ठाणे आणि वीज मंडळाच्या कार्यालयांना नुकतेच विशिष्ट कालावधीसाठी मोफत गरुडा फोनचे वितरण करण्यात आले. हे संच बिनतारी असल्याने आपत्कालीन स्थितीतही त्यांची सेवा अखंडित राहणे शक्य आहे. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका पनवेललाही मोठय़ा प्रमाणात बसला होता. त्यावेळी दूरध्वनी सेवा पूर्णपणे बंद पडल्याने नागरिकांची खूपच गैरसोय झाली होती.

२२ जून रोजी राज्यभर ‘रास्ता रोको’
उरण/वार्ताहर - राज्यातील निराधार व देवदासी महिलांच्या न्याय्यहक्कासाठी व विविध मागण्यांसाठी २२ जून रोजी महाराष्ट्र निराधार महिला व देवदासी महिला संघटनेच्या वतीने राज्यभर ‘रास्ता रोको’ केले जाणार आहे. लोकशाहीत उपेक्षित जीवन जगणाऱ्या समाजघटकांची काळजी घेऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविणे हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु सरकारला कर्तव्याचा विसर पडलेला दिसत असल्याचा या संघटनेचा आरोप आहे.

आगरी-कोळी समाजाने जागरूक राहावे - खासदार गजानन बाबर
उरण/वार्ताहर - मुंबईतून आगरी-कोळी समाज हद्दपार झाला असून तसा प्रकार रायगड जिल्ह्यात होऊ नये म्हणून सर्वानी जागरूक राहण्याचे आवाहन मावळचे नवनिर्वाचित खासदार गजानन बाबर यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केले. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी उरण येथील तेरापंथी सभागृहात शिवसेनेच्या वतीने जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेलमध्ये दोन गाडय़ा भस्मसात
पनवेल/प्रतिनिधी - पनवेलमध्ये मंगळवारी पहाटे दोन गाडय़ा जाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात गुन्हेगारांनी एका रात्रीत अनेक गाडय़ांची जाळपोळ केली होती. ती आठवण ताजी असतानाच पनवेलमध्येही काहीसा तसाच प्रकार घडल्याचे दिसत आहे. दांडेकर रुग्णालयाजवळ रस्त्यावर उभी करण्यात आलेली एक झेन आणि त्याच रस्त्यावर जय महाराष्ट्र व्यायामशाळेसमोर उभी करण्यात आलेली एक रिक्षा पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दोन्ही गाडय़ा भस्मसात झाल्या आहेत. झेनचे मालक संतोष म्हात्रे आणि रिक्षाचे मालक रवींद्र राऊत यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांनी या घटनेबाबत ‘गाडय़ांनी अकस्मात पेट घेतल्याची’ नोंद केली आहे. पोलीस हवालदार महाजन या प्रकरणाची चौकशी करीत असून, याविषयी अधिक सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. भविष्यात हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.