Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

पुन्हा एकदा ‘अक्कलपाडा’चे राजकारण
रोहिदास पाटलांच्या भूमिकेवर किरण पाटलांचे प्रश्नचिन्ह
वार्ताहर / धुळे
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून विकास कामांचा धडाका सुरू झाल्याचे चित्र रंगविण्यात येत असले तरी त्यांची ही बाजू किती फसवी आहे, हेही उघड होऊ लागले आहे. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाचे श्रेय घेणाऱ्या आ. रोहिदास पाटील यांना अखेर बोलण्यास भाग पाडणारे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांनी या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या निर्मितीसाठी केलेली धडपड पत्रकारांसमोर मांडली.

वेतन आयोगाच्या मागणीसाठी धुळे पालिका कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
वार्ताहर / धुळे

पाचवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांसह ११ जणांनी अंगावर घासलेट ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या सर्वासह एकूण ४१ निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळानंतर या सर्वाची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सेवानिवृत्तीनंतरही महापालिकेच्या सेवेत
वार्ताहर / जळगाव

अपहरण, गैरव्यवहारासारखे अनेक आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रभाग समिती प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या महापालिकेत सेवानिवृत्तीचे वय केव्हाच उलटून गेलेला कर्मचारीही अद्याप सेवेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून आयुक्तांच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वत्र संशयकल्लोळ उडाल्याचे दिसत आहे. महापालिकेतील उमाकांत चौधरी या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय केव्हाच उलटले. या कर्मचाऱ्याने पालिका सेवेत रुजू होताना व निवृत्तीचे वय आल्यावर दुसरेच असे वेगवेगळे जन्म दाखले सादर केल्याची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्य़ात सात हजार विहिरींचे पुनर्भरण
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ातील यावल, रावेर, चोपडा आणि पाचोरा या तालुक्यातीस सात हजार ६५० विहिरींचे पुनर्भरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जूनअखेर पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या सर्व अर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचेही कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

पवनऊर्जा कंपन्यांविरोधातील मोर्चाची प्रशासनाकडून दखल
सत्यशोधक सभेच्या बहुतेक मागण्यांना हिरवा कंदील
धुळे / वार्ताहर
वेगवेगळी कारणे पुढे करीत वनहक्क कायद्याची अमलबजावणी दिवसेंदिवस पुढे ढकलणाऱ्या जिल्हा प्रशासनाला अखेर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या सोमवारी येथे निघालेल्या अभूतपूर्व मोर्चाची दखल घेणे भाग पडले. प्रशासनाने जंगल खेडुतांच्या ६० टक्के मागण्यांना हिरवा कंदील दिला आहे.

सटाणा व ताहाराबाद येथे नव्या विद्युत केंद्रांना मंजुरी
सटाणा / वार्ताहर

शहरासाठी स्वतंत्र ३३/११ केव्ही उपकेंद्र व तालुक्यातील ताहाराबाद येथे १३२ केव्ही विद्युत केंद्रास ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी मंजुरी दिली आहे. या कामासाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मंत्र्यांनी विद्युत केंद्र निर्मितीसाठी मंजुरी दिली असली तरी तालुक्यात ४६ टक्के वीज चोरीच्या प्रकरणाबरोबरच कोटय़वधी रुपयांची कृषी पंपाची विद्युत बिले थकीत असल्याने बागलाणचा काळ्या यादीत समावेश झाला असून थकबाकीमुळे तालुका ‘ब’ वर्गातून ‘क’ वर्गात फेकला गेला आहे.

परीक्षेतील पारदर्शीपणामुळे गैरप्रकारांना आळा - पाटील
जळगाव / वार्ताहर
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रम न ठेवता बाहेरच्या जगात मागणी असलेल्या विषयाचे अभ्यासक्रम प्राधान्याने सुरू केल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी त्वरित प्राप्त होत आहेत, असे स्पष्ट करीत परीक्षा पद्धतीत पारदर्शीपणा आणल्याने येथे गैरप्रकारांचा धोका पूर्णपणे संपला असल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांनी दिली.

कर्जमाफीविषयी सकारात्मक प्रयत्नांचे स्वागत
धुळे / वार्ताहर

मौलाना आझाद आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाव्दारे वितरित झालेले कर्जही आता कर्जमाफीच्या उंबरठय़ावर आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याआधी केवळ महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्मोद्योग आदी आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या विविध जाती-जमातीच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत महामंडळाचे ३१ मार्च ०७ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.

तांदूळ न पोहोचल्याने पोषण आहारासाठी शिक्षकांची तारांबळ
हरसूल / वार्ताहर
शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हरसूल परिसरातील अनेक शाळांमध्ये मोफत वाटपासाठी साहित्य वेळेआधीच उपलब्ध झाल्याने समाधान एकीकडे व्यक्त केले जात असतानाच दुसरीकडे तांदूळ उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील शिक्षकांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी रेशन दुकानांबरोबरच अन्य घरांचे उंबरठे चढण्याची वेळ आली आहे.

चोरीच्या डाळिंब विक्री प्रकरणी अटक
देवळा / वार्ताहर

दुसऱ्याच्या शेतातील डाळिंबांची चोरी करून बाजारात विकणाऱ्या चोरटय़ास रंगेहात पकडण्यात आल्याची घटना तालुक्यातील खालप येथे घडली.खालपचे सरपंच नानाजी सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातून बाजारात विक्रीयोग्य असलेल्या डाळिंब फळांची गेल्या काही दिवसांपासून चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. खालप येथीलच सुनील बिरारी (३०) व त्याचा मेहुणा भरत अमृता या दोघांना सटाणा बाजारपेठेत डाळिंब विकतांना गावातीलच काही शेतकऱ्यांनी पाहिले.

महामार्ग ‘रास्ता रोको’ प्रकरणी
दंगलीचा गुन्हा दाखल
धुळे / वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावर तालुक्यातील पुरमेपाडा गावाजवळ उड्डाणपूल बांधावा, या मागणीसाठी झाडाची फांदी आडवी टाकून रास्ता रोको करून आत्महत्येची धमकी देणाऱ्या भगवान अहिरे यांच्यासह सुमारे २०० जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वावर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचाही ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे.

मनसे महिला आघाडीचा मोर्चा
धुळे / वार्ताहर

आधार नसलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे महिला आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात संजय गांधी योजनेतील मानधन दरमहा मिळावे आणि त्याची रक्कम हजार रूपये करण्यात यावी, परित्यक्ता, विधवा, वृध्द महिलांना अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट लागु करून हक्क व संरक्षण द्यावे, संजय गांधी निराधार योजनेची दरमहा बैठक घेऊन लाभार्थी बाबत आढावा घेण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. महिला आघाडीच्या शारदा पाटील यांच्यासह शेकडो निराधार महिला उपस्थित होत्या.

पदाधिकारी निवड; युवक काँग्रेसच्या मेळाव्यात चर्चा
नंदुरबार / वार्ताहर
तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला काँग्रेसमध्ये ताकद दिली जाईल, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजीव सातव यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले. येथील विश्रामगृहाच्या आवारात पदाधिकारी निवडीसंदर्भात नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचा मेळावा झाला. खा. माणिकराव गावित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पदाधिकारी किरण रेड्डी, प्रीतम देशमुख, सना देशमुख, गौतम जैन, रमेश गावित, जहीर शेख, दिलीप गावित उपस्थित होते. जो कार्यकर्ता काम करतो त्याला त्याच्या कामात सहाय्य करण्यात येईल. अंतर्गत गटबाजी पक्षाला मारक ठरते. आपल्या जिल्ह्य़ात अंतर्गत गटबाजी होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे, आघाडीच्या घटकपक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी धर्म न पाळता पाठीत खंजीर खुपसला. त्यांचा लवकरच समाचार घेण्यात येईल, असा इशाराही सातव यांनी दिला. शासकीय लाभ एकाच पक्षाच्या पदरात पडत असल्याच्या तक्रारीकडेही युवक काँग्रेस पक्ष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. गावित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे, असे आवाहन केले. निंबा माळी यांनी सूत्रसंचालन केले.

नवीन विक्री तंत्राविषयी परिसंवाद
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे मंदीच्या पाश्र्वभूमीवर नवीन विक्री तंत्र तसेच रचना कौशल्याविषयी २७ जून रोजी येथे परिसंवाद आयोजन करण्यात आला आहे.
चेंबरच्या बाबुभाई राठी सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता परिसंवाद होणार आहे. उदात्तीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या युगाबरोबर जागतिक आर्थिक मंदीमुळे प्रचंड मोठे आव्हान उपलब्ध झाले आहे. संस्थेसाठी उत्पन्न जमा करणाऱ्या विक्रेत्यांसमोर आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या आहेत. विक्री सुधारण्यासाठी एका नवीन विक्री तंत्राच्या शोधात सर्वजण आहेत. या पाश्र्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या परिसंवादामध्ये जनकौशल्य, भावनिक व्यवस्थापन कौशल्य, रचना कौशल्य, प्रो-अ‍ॅक्टिव्ह विक्री तंत्र, वेळेचे नियोजन आणि निगोसिएशन स्किल आदींच्या मूलभूत प्रगती पद्धतीचा अंतर्भाव होणार आहे. त्याचबरोबर या संदर्भातील उदाहरणे, खेळ व खेळातून परस्परांशी संवाद इत्यादींचा समावेश असणार आहे. या परिसंवादाचे संचालन चेंबरचे महासचिव सुधीर शहा करणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२५७७७०४, २५७५०५३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.