Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।
श्रद्धा आणि बुद्धी ही मानवजातीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. श्रद्धा आणि विश्वास हा मानवी जीवनाचा पाया असून, ज्ञानलालसा हे ध्येय असलं पाहिजे, असं सर्व संतांना वाटतं. ईश्वराच्या सगुण-निर्गुण अस्तित्वाविषयीच्या शंका-कुशंकांना संतांच्या जीवनात स्थान नाही. ‘रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ।। ही संतांची सुखानुभूती आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी असं ज्ञानदेव निक्षून सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ।। अशी तुकोबांची अनुभूती आहे.

मोफत प्रवास योजना मंजूर; पण पीएमपीची नकारघंटाच!
पुणे, १६ जून / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास योजनेचा ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबरोबरच या योजनेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज एकमताने घेतला. मात्र त्यानंतरही ही योजना लगेच सुरू करता येणार नाही, असा पवित्रा पीएमपीने घेतल्यामुळे उद्या (बुधवार) पासून ‘विद्यार्थ्यांबरोबर मोफत प्रवास’ असे आंदोलन सुरू करण्याची घोषणा भाजपा, शिवसेना आणि मनसेने केली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या सदस्याची अव्वल कारकुनाला मारहाण
भोर तालुक्यातील प्रकार; कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

पुणे, १६ जून / खास प्रतिनिधी

जमिनीच्या नोंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी आज भोर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मनोज गायकवाड यांना बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर भोरच्या महसूल कर्मचाऱ्यांनी काम थांबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराचे पडसाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमटून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. कारकुनाला मारहाण करणाऱ्या बाठे यांना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

मोबाईल कंपन्यांचे अनधिकृत टॉवर काढण्याचे पिंपरी पालिका आयुक्तांचे आदेश
लोकसत्ता इफेक्ट

पिंपरी, १६ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा प्रमाणात उभारण्यात आलेले मोबाईल कंपन्यांचे अनधिकृत टॉवर काढून टाकण्याचे आदेश पालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रशासनास दिले आहेत. मोबाईल कंपन्यांचे लाड केल्याने पालिकेला लाखो रुपयांचा खड्डा बसत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. स्थायी समितीच्या सभेत रामदास कुंभार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला.

पोलिसांनी दखल न घेतल्याचा नातू यांचा आरोप
पुणे, १६ जून / प्रतिनिधी

‘मी (यशवंत नातू), माझी पत्नी (सुलभा) आणि मुलगा धनंजय घरात झोपलेलो असताना रात्री अंदाजे साडेबारा वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणावर दारूच्या बाटल्या आमच्या घराच्या खिडक्यांवर फोडल्या तसेच दगडफेक केली. ते लोक शिव्या देऊन आम्हास धमकावत होते. अशा परिस्थितीत बाहेर पडणे शक्य नसल्याने पत्नीने १०० क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. पोलीस काही वेळाने आले. नंतर त्यांनी दगडफेक करणाऱ्या व दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या दहा ते बारा गुंडांना पकडून फडगेट चौकीवर नेले व आम्हासही येण्यास सांगितले.

शिक्षणप्रमुख तांबे यांना मनसेने कोंडले
पुणे, १६ जून/प्रतिनिधी

शिक्षण मंडळाची एक शाळा एका खासगी कंपनीला इंग्रजी माध्यमासाठी चालविण्यास दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिक्षणप्रमुख सुधाकर तांबे यांना आज त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले. संबंधित संस्थेला ही शाळा चालविण्यास प्रतिबंध करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तांबे यांनी दिल्यानंतरच तांबे यांची सुटका करण्यात आली. बोपोडी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद प्रशालेमध्ये शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. मंडळाने एका खासगी कंपनीने प्रश्नयोजित केलेल्या फाउंडेशनला ही शाळा चालविण्यास दिली आहे. मात्र, याबाबत मंडळ व फाउंडेशन यांच्यात अद्यापही करार झालेला नाही. ही सर्व प्रक्रिया शिक्षण मंडळाला अंधारात ठेवून झाली असून परस्परच संस्थेला शाळा चालविण्यास देण्यात आल्याचा आक्षेप मनसेच्या विद्यार्थी सेनेने घेतला आहे. ही शाळा मंडळानेच चालवली पाहिजे, या मागणीसाठी मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, तसेच बाळा शेडगे, प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी शिक्षणप्रमुख तांबे यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

जकातचोरी विरुद्धच्या मोहिमेत उच्चांकी तीन कोटी दंडाची वसुली
पुणे, १६ जून/प्रतिनिधी

शहरातील सराईत जकातचोरांविरुद्ध महापालिकेच्या जकात विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे जकातचोरी मोठय़ा प्रमाणावर उघडकीस येत असून गेल्या तीन महिन्यांत चकातचोरांकडून तीन कोटी रुपये एवढा उच्चांकी दंड वसूल करण्यात आला. जकात विभाग प्रमुख राजेंद्र मुठे यांनी आज ही माहिती दिली. जकातचोरी विरोधात धडक मोहीम उघडल्यामुळे दंडापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचे मुठे यांनी सांगितले.

आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
पिंपरी, १६ जून / प्रतिनिधी

भोसरी गवळीनगर येथे राहणाऱ्या तरुणाने मंगळवारी सकाळी घरामध्ये आजारपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. आत्माराम विठ्ठल गावडे (वय ३८, रा. जाधव चाळ, गवळीनगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गावडे यांना गेल्या काही महिन्यांपासून असाध्य रोगाचा त्रास सुरु होता. त्याला कंटाळून त्यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

पिंपरी पालिकेत ५६ जणांना ‘ब्लॅकबेरी’ मोबाईल
वेगवान कामकाज करण्याचा दावा
पिंपरी, १६ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, महापौर यांच्यासह तब्बल ५६ जणांना आज महागडे ब्लॅकबेरी (८३१० मॉडेल) मोबाईल देण्यात आले. वेगवान कामकाज करण्याचा दावा करीत पालिकेने ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. स्थायी समितीच्या मागील महिन्यात झालेल्या बैठकीत प्रत्येकी २२ हजार ५३३रुपये खर्चाचे ५६ मोबाईल घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यासाठी सुमारे १३ लाख रुपये खर्चास मान्यताही देण्यात आली होती. त्यानुसार, आज या मोबाईलचे वाटप करण्यात आले. महापौर व आयुक्तांशिवाय अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, सहशहर अभियंता, विकास शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता, अधीक्षक अभियंता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ, शिक्षणाधिकारी, संगणक अधिकारी, मुख्य लेखापाल, उपसंचालक नगररचना, जनता संपर्क अधिकारी, उद्यान अधीक्षक, नगरसचिव आदींना हे मोबाईल देण्यात आले आहेत.

‘लिटिल चॅम्पस्’ नृत्य स्पर्धाचे िपपरीत आयोजन
पिंपरी,, १६ जून / प्रतिनिधी

दिवंगत राजेश बहल स्पोर्ट्स अॅन्ड सोशल फाऊंडेशनच्या वतीने िपपरी-चिंचवड शहरात ‘लिटिल चॅम्पस् २००९’ या वैयक्तिक नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मायला खत्री यांनी दिली. मागील वर्षी लिटिल चॅम्पस्च्या स्पर्धेस मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे यंदाही या स्पर्धासाठी आकर्षक बक्षिसे ठेवतानाच विनामूल्य प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात २१ जूनला सकाळी दहा वाजता या स्पर्धासाठी ऑडिशन घेण्यात येणार आहे. त्यातून दहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी दहा हजार, द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनामूल्य प्रवेशिका मिळू शकणार आहेत. त्यासाठी सुनील तांबे (९८६०७३२५९२), मायला खत्री (९८२३३८३०८६), संभाजी पार्टे (९९६०२६१६३०), प्रदीप पवार (९८५०९४९०१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सुरक्षारक्षकांचे किमान वेतन पुनर्निर्धारित करा - महेंद्र गरुड
पिंपरी, १६ जून / प्रतिनिधी

पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांचे वेतन पुनर्निर्धारित करावे, अशी मागणी भारतीय सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष व अपर कामगार आयुक्त डी. जी. पगार यांच्याकडे नुकतीच करण्यात आली आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गरुड यांनी पुणे जिल्ह्य़ातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन पगार यांना दिले. या वेळी सरचिटणीस राजन कोळगे, पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सुनील शिंदे, चंद्रशेखर पात्रे, प्रमोद कांबळे, पंडित ठाकरे, बाळासाहेब ससाणे, येशूदास मायकल,शेखनूर पठाण, बाबासाहेब माने, विष्णू थोरात, नरुला सय्यद, सीताराम माजी, देवीदास उढाणे, बाळाजी डांगे, आनंदा पाटील भगवान महाडिक, रवींद्र कदम, रवींद्र ढेरे, नवनाथ मोकाशी आदी उपस्थित होते.