Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

राज्य

पाऊस लांबल्याने आंबोलीला येणारे पर्यटकही थांबले!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, १६ जून

पाऊस लांबला आणि त्याबरोबर आंबोलीचे प्रवाहित होणारे धबधबेही थांबले. पर्यटकांची वाढती रीघ पाहून कायमस्वरुपी धबधबे प्रवाहित व्हावेत, म्हणून ‘कोकण पॅकेज’मधून प्रकल्प निर्माण करण्याच्या राजकीय गप्पाही थांबल्या. पर्यटकांसाठी ‘कोकण पॅकेज’मधून ज्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, त्यांचेही तीनतेरा वाजले.

दाभोळ किनारपट्टीवरील मच्छिमारी धोक्यात
चिपळूण, १६ जून/वार्ताहर

मासळीचा दुष्काळ, दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण आणि त्यातच अलीकडच्या काळात डिझेलच्या दरवाढीमुळे दाभोळ किनारपट्टीचा मच्छिमार समाज संकटात सापडला आहे. याचा सर्वाधिक परिणाम बोटींच्या डागडुजीकरणावर होत आहे. दरम्यान, लोटे येथील सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाला बंदची नोटीस प्रदूषण महामंडळाने बजावल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही वर्षांपासून समुद्रात विशेषत: दाभोळ खाडी परिसरात मासळीचा दुष्काळ निर्माण झाला आहे.

तीन नगराध्यक्षपदांसाठी आज निवडणूक
नांदेड, १६ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातील उमरी, हदगाव नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड एकतर्फी होईल, हे स्पष्ट असले तरी धर्माबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केल्याचे सांगण्यात आले. उमरी, हदगाव व धर्माबाद नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी उद्या (बुधवारी) निवडणूक होत आहे. हदगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून नगराध्यक्ष शिवा चंदेल व बांधकाम समितीचे सभापती मुन्ना ऊ र्फ जीवन देशमुख यांनी तर काँग्रेसतर्फे बालाजी राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ
मालेगाव, १६ जून / वार्ताहर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवेत असलेल्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जून २००९ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आल्याची माहिती जलसेवा कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष टी. जी. पिंजन यांनी दिली. प्राधिकरणाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने सेवेत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू न करण्याची भूमिका घेण्यात आली होती.

भाजपच्या अधिकृत उमेदवाराला सेनेच्या बंडखोर उमेदवाराचे आव्हान
उरण, १६ जून/वार्ताहर

उरण नगर परिषदेत सेना-भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा कलगीतुरा आता चांगलाच रंगला आहे. सामंजस्य कराराप्रमाणे पुढील अडीच वर्षांंचा नगराध्यक्षपदाचा हक्क भाजपचा असतानाही सेनेच्या बंडखोर गटाच्या महिला उमेदवार वैशाली बंडा यांनी पक्षादेश धुडकावून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडखोर सेनाविरुद्ध अधिकृत सेना-भाजप अशी लढत येत्या १९ जून रोजी रंगणार आहे.

मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाबाबत जनतेमध्ये आश्चर्य
नाशिक, १६ जून / प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुमारे दीडशे वर्षांपासून दर्शनी भागात कार्यरत असलेले मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी तातडीने स्थलांतरीत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अत्यंत अल्प मुदतीत हे कार्यालय एकाएकी स्थलांतरीत करण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत असून नवी जागा नोंदणीधारकांसाठी तुलनेने गैरसोयिची असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रस्तुत कार्यालयात १८६२ पासूनचे तब्बल दीड लाख दस्तावेज आहेत. मूळ कार्यालयाची जागा दस्तावेजांच्या साठवणीसाठी तसेच रक्षणासाठी मजबूत आणि सोयिची असताना अपुऱ्या, खिडक्या तुटलेल्या, काचा फुटलेल्या जागेत ते स्थलांतरीत केल्याने या दस्तावेजांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या परिस्थित काही दस्तावेज गहाळ झाल्यास अथवा खराब झाल्यास नागरिकांना त्याच्या नकला मिळू शकणार नाहीत. परिणामी, या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी केली आहे.

भुसावळ नगराध्यक्षपदासाठी १० अर्ज दाखल
भुसावळ, १६ जून / वार्ताहर

शहर बचाव आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार महिला सदस्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण दहा अर्ज आज मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांच्याकडे दाखल केले. महिला नगराध्यक्षा माधुरी फालक यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपत असल्याने नवीन नगराध्यक्षांची निवड २० जून रोजी होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांनी चार तर नगरसेविका मीना लोणारी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. शहर बचाव आघाडीतर्फे संगीता बियानी यांनी देखील चार अर्ज तर शारदा धांडे यांनी एक अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत चार महिलांनी दहा अर्ज भरले असून अर्ज मागे घेण्याची मुदत १७ जून रोजी चार वाजेपर्यंत आहे.

मांडवणे- कराळेवाडी पूल तुटल्यामुळे गावांशी संपर्क खंडित
कर्जत, १६ जून/वार्ताहर

मांडवणे- कराळेवाडी रस्त्यावरील पूल तुटल्यामुळे परिसराशी संपर्क तुटला असून, गेले वर्षभर पुलाचे काम झालेले नाही. या रस्त्यावरून साधी सायकलही जाण्याची सोय नाही. त्यामुळे मांडवणे गावाची सर्व रहदारी कडाव- कर्जतला जाण्यासाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या ‘टाटा रोड- वैजनाथ मांडवणे’ या छोटय़ा साकवावरून सुरू आहे. मात्र हा छोटा साकवही डांबर व सिमेंट उखडल्यामुळे धोकादायक झाला आहे. या साकवाला लागून असलेल्या रस्त्यावर मोठा व अवघड असा चढ असल्याने आजपर्यंत चढावावर रिक्षा व इतर वाहनांचे अपघात झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मांडवणे गावाचा संपर्क तुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. सदर साकवाला दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या अ‍ॅप्रोच रोडचे कामही गेले चार वर्षे न केल्याने या पावसाळ्यात साकव वाहून जाण्याची शक्यता आहे.

राम मेस्त्री यांच्या पुस्तकांचे रविवारी प्रकाशन
सावंतवाडी, १६ जून/वार्ताहर

अप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट व कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक, कथाकार राम मेस्त्री यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा २१ जून रोजी दुपारी ३.३० वा. महाराजा मंगल कार्यालय हॉल येथे आयोजित केला आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. ‘अश्विनीस्पर्श’ कादंबरी कर्णिक यांच्या हस्ते, ‘मिटलेली कवाडे’ ललित लेख पत्रकार शशी तायशेटे यांच्या हस्ते, ‘पैलतीर’ कथासंग्रह दै. सिंधुदुर्ग समाचार संपादक प्रा. मुकुंदराव कदम यांच्या हस्ते, ‘हिरवा शालू तांबडा थल’ वैचारिक लेख साहित्यिक प्रा. जी. ए. सावंत यांच्या हस्ते, तर ‘तांबडी माती रूपेरी आकाश’ यशोगाथा विचारवंत भाई खोत यांच्या हस्ते प्रकाशित होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा प्रकल्प संचालक पी. बी. पाटील असतील. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, साहित्यिक डॉ. महेश केळुसकर, बाबुराव शिरसाट, दादा मडकईकर, मधुसूदन नानिवडेकर, कृष्णा देवळी, आ. सो. शेवडे, सफरअली गव्हाणे, बाळ पोतदार आदी उपस्थित राहणार आहेत.

वीज बिलविषयी आज व्याख्यान
नाशिक, १६ जून / प्रतिनिधी

येथील लघु उद्योग भारतीच्या शाखेतर्फे ‘वीज बिल समजून घ्या व कमी करा’ या विषयावर सातपूर येथील नाईस हॉलमध्ये बुधवारी सायंकाळी पाचला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योजकांनी वीज बिलात कपात कशी करावी, बिलाची संकल्पना, विविध दरातील बदल, सद्यस्थितीतील सवलत योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उपशाखा प्रमुखावर गोळीबार करणाऱ्यास पोलीस कोठडी
बेलापूर, १६ जून/वार्ताहर
ऐरोली येथील उपशाखा प्रमुख कृष्णा नाडर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करणाऱ्या एकास सोमवारी सांगलीतून अटक करण्यात आली. वाशी दिवाणी न्यायालयाने आरोपी कमलेश धनावडे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.