Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

वेस्ट इंडिज उपान्त्य फेरीत
इंग्लंडवर पाच विकेट्सनी मात; सरवान सामनावीर
लंडन, १६ जून/ पीटीआय
सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला असताना अनुभवी रामनरेश सरवानने काढलेल्या नाबाद १९ धावा व शिवनारायण चंदरपॉलने नाबाद १७ धावा फटकावल्यामुळे वेस्ट इंडिजने इंग्लंडला पाच विकेट्सने नमवून उपान्त्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. डकवर्थ-लुईस नियमांनुसार पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजपुढे ९ षटकांमध्ये ८० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य वेस्ट इंडिजने चार चेंडू आणि पाच विकेट्स राखत पूर्ण केले. जलदगतीने ९ चेंडूत १९ धावा फटकाविणाऱ्या सरवान सामनावीर ठरला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज अवघ्या १६ धावांवर बाद झाले होते.

पराभवासाठी आयपीएलचे कारण देणाऱ्या
कर्स्टनना माजी क्रिकेटपटूंची चपराक
मुंबई, १६ जून/ क्री. प्र.
इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पराभवासाठी आय.पी.एल.चे कारण देणाऱ्या प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना संदीप पाटील, चंदू बोर्डे आणि लालचंद रजपूत या माजी क्रिकेटपटूंनी चांगलेच फटकारले आहे. भारतीय पराभवासाठी कर्स्टन यांनी आय.पी.एल.चे कारण दिल्याने आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचे संदीप पाटील यांनी म्हटले आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तर ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या तयारीसाठी आपल्याला आय.पी.एल. स्पर्धेचा चांगला उपयोग झाल्याचे म्हटले असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

आयपीएलमध्ये खेळण्याची सक्ती नव्हती - बीसीसीआय
नवी दिल्ली, १६ जून / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट मंडळाने कोणत्याच खेळाडूला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्यासाठी सक्ती केली नव्हती असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रसारमाध्यमविषयक समितीचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी केला आहे. खेळाडूंना जर आपली दमणूक झाली आहे असे वाटत होते तर या स्पर्धेत भाग न घेता ते विश्रांती घेण्यास मोकळे होते,

टीम इंडियाच्या पोरी हुश्शार!
भारतीय महिला संघ उपान्त्य फेरीत दाखल

टॉन्टन, १६ जून/ पीटीआय

एकिकडे गतविजेती धोनी ब्रिगेड ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘सुपर एट’ फेरीतच नापास झालेली असली तरी विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत प्रवेश करून टीम इंडियाच्या महिला संघाने मात्र आपण हुशार असल्याचे सिद्ध केले आहे. ‘ब’ गटातील एका साखळी सामन्यात श्रीलंकेवर पाच विकेट्सने विजय मिळवित भारतीय संघाने ‘सेमी फायनल’चे तिकीट बूक केले आहे. भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर पुनम राऊत आणि अनुभवी मिताली राज या फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सचिन वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकण्याची शक्यता
सेहवागसह इरफानही दौऱ्याला मुकण्याची शक्यता
नॉटिंगहॅम, १६ जून / पीटीआय
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजूनही पूर्णपणे फिट नसल्याने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याला बहुतेक न जाण्याचीच चिन्हे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सध्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरत असून त्याने निवड समिती सदस्यांशी चर्चा केल्यानंतर स्वत: पूर्णपणे फिट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्याला न जाण्याचाच निर्णय तो बहुतेक घेईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चार एकदिवसीय सामन्यांची मालिका २६ जूनपासून सुरू होत आहे.

फुटबॉल सोडल्याचा मला फायदाच झाला - सुरंजॉय
नवी दिल्ली, १६ जून/पीटीआय

राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळण्यासाठी मी उत्सुक होतो. मात्र तेथे चांगली संधी मिळाली नाही म्हणून मुष्टियुद्धाकडे वळलो. हा माझ्यासाठी कलाटणी देणारा निर्णय ठरला असे आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सुरंजॉय सिंग याने सांगितले. या स्पर्धेत तब्बल १५ वर्षांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम सुरंजॉयने केला.

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा; सुखेन डे याने इतिहास घडविला
नवी दिल्ली १६ जून/पीटीआय

राष्ट्रीय विक्रमवीर सुखेन डे याने कु मारांच्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकाविले. जागतिक स्तरावर पुरुष गटात पदक मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. बुखारेस्ट (रुमानिया) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सुखेन याने ५६ किलो गटातीस स्नॅचमध्ये ब्रॉंझपदक मिळविले. स्नॅच व क्लीन-जर्कमध्ये त्याला चौथे स्थान मिळाले असले तरी त्याने स्नॅचमध्ये तिसरे स्थान घेत पदकाची कमाई केली.

गिरीश जावळे यांची क्रिकेट तंत्रवृद्धी योजना कौतुकास्पद - हिरामण भोर
मुंबई, १६ जून/क्री.प्र.

शिवाजी पार्कच्या भारत क्रिकेट क्लब संचालित अप्पा बाबरेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट प्रशिक्षक गिरीश जावळे यांनी अलिकडेच परंपरागत इंग्लिश व ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षण पद्धतीचा अभ्यास करून भारतीय क्रिकेटसाठी योग्य अशी खास क्रिकेट तंत्रवृद्धी योजना अंमलात आणली. आय.इ.एस., मरोळ, अंधेरी (पूर्व) या शाळेच्या १८ मुलांची निवड करून सहा आठवडय़ांच्या या योजनेचा प्रारंभ त्यांनी केला होता.

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा; सुखेन डे याने इतिहास घडविला
नवी दिल्ली १६ जून/पीटीआय

राष्ट्रीय विक्रमवीर सुखेन डे याने कु मारांच्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकाविले. जागतिक स्तरावर पुरुष गटात पदक मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. बुखारेस्ट (रुमानिया) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सुखेन याने ५६ किलो गटातीस स्नॅचमध्ये ब्रॉंझपदक मिळविले. स्नॅच व क्लीन-जर्कमध्ये त्याला चौथे स्थान मिळाले असले तरी त्याने स्नॅचमध्ये तिसरे स्थान घेत पदकाची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये १०९ किलो वजन उचलले. एकूण त्याने २४१ किलो वजन उचलले.

मेंडिस चमकला; श्रीलंकेची किवींवर मात
नॉटिंगहॅम, १६ जून / वृत्तसंस्था

अजंता मेंडिसने तीन षटकांत अवघ्या ९ धावा देत घेतलेल्या तीन बळींमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या अखेरच्या लढतीत न्यूझीलंडवर ४८ धावांनी मात करीत सहा गुणांसह उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या गटात पाकिस्तानने पहिले स्थान मिळविले होते. पण आता गुणसंख्या वाढल्यामुळे श्रीलंका पहिल्या स्थानावर आली आहे. उपान्त्य फेरीत श्रीलंकेची गाठ वेस्ट इंडिजशी पडणार आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या. त्यात स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या दिलशानच्या ४८ व संगकारा (३१) व जयवर्धने (नाबाद ४१) यांच्या चमकदार कामगिरीचा समावेश होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीला धावगती राखण्याचा प्रयत्न केला. मात्र मॅकक्युलम (१०), रेडमण्ड (२३) व गुप्तिल (४३) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी न्यूझीलंडला संघ ११० धावांवर गारद झाला. मेंडिसने रॉस टेलर, स्टायरिस, मॅकग्लॅशन यांना माघारी पाठवून न्यूझीलंडला हादरविले.

आनंद म्हणतो ‘बॅड लक टीम इंडिया’
नवी दिल्ली, १६ जून / पीटीआय

विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ उपान्त्य फेरीपूर्वीच गारद झाल्यानंतर सर्व स्तरातून संघाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले जात असताना भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने मात्र संघाला नशिबाची साथ न लाभल्याने तो पराभूत झाल्याची प्रतिक्रिया दिली.आनंद म्हणाला की, भारतीय क्रिकेटपटूंना नशिबाने साथ दिली नाही. भारताला या स्पर्धेत चांगली संधी होती, पण तुम्हाला त्याबरोबरच नशिबाचीही साथ असावी लागते. आनंदने असेही सांगितले की, स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धा सुरू असतानाही भारतीय संघाबाबत खूप काही लिहून आले, अनेक अपेक्षा बाळगल्या गेल्या. त्याच्या दबावामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला.आनंदने सांगितले की, मुख्य कारण असते ते दबाव. म्हणूनच मी स्वत: अनेक गोष्टींपासून दूर राहतो. एखाद्या स्पर्धेपूर्वी मी महिना-दीडमहिना बुद्धिबळापासून अलिप्त राहतो.

पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने अमिरातीत
प्रस्ताव आयसीसीच्या विचाराधीन
लंडन, १६ जून / पीटीआय
२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे सामने अबु धाबी व दुबई येथे खेळविण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रस्तावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विचार करीत आहे.एप्रिल-मे या कालावधीत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे लॉर्ड्स येथे आयसीसी व विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या चार यजमान राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या चर्चेत या दोन शहरांत पाकिस्तानचे सामने आयोजित करण्याची शक्यता फेटाळून लावण्यात आलेली नाही.आयसीसीचे प्रमुख डेव्हिड मॉर्गन यांनी सांगितले की, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानात होणारे सामने भारत, श्रीलंका व बांगलादेशात विभागून देण्याचा पर्याय आहेच, पण पाकिस्तानातील काही सामने पाचव्या देशातही आयोजित केले जाऊ शकतात.

हॉकी प्रशासक मुथण्णा यांचे निधन
मुंबई, १६ जून/ क्री.प्र.

मुंबई हॉकी संघटनेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे भूतपूर्व सदस्य आणि भारताचे माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पियन एमएम सोमय्या यांचे वडील एम.पी. मुथण्णा यांचे आज मुंबईमध्ये पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. मुंबई हॉकीच्या व्यवस्थापकीय मंडळावर त्यांनी अडीच दशके काम केले. त्याशिवाय संघटनेच्या अंपायर्स बोर्डाचे अध्यक्षपदही त्यांनी दशकभर सांभाळले. देशातील हॉकी सुवर्णयुग अनुभवत असता त्यांनी मुंबई हॉकीच्या इतिहासामध्ये ज्यांना दिग्गज मानले जाते त्या जॉस गोन्साल्विस (सचिव) आणि चरणजीत राय (अध्यक्ष) यांच्यासमवेत त्यांनी अनेक वर्षे खेळाच्या विकासामध्ये अनमोल योगदान दिले. पेशाने इंजिनियर असलेल्या मुथण्णा यांनी १९६० च्या दशकामध्ये आपली भारतीय वायूदलातील नोकरी सोडून राज्य शासनाची नोकरी पत्करली. त्या काळात ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गावोगावी पंचायत कार्यालयांमध्ये रेडिओ संच बसविण्याचे काम पाहत असता त्यांनी राज्यभर भ्रमंती केली.

हॉकी इंडियाला आंतरराष्ट्रीय फेडरेशनची मान्यता
नवी दिल्ली, १६ जून / पीटीआय
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघटनांच्या एकत्रित हॉकी इंडियाला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने अखेर आपले सदस्य व भारतातील हॉकीचे नियंत्रण करणारी एकमेव संघटना म्हणून मान्यता दिली आहे. हॉकी इंडियाचे सचिव मोहम्मद अस्लम यांना आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनेचे महासचिव पीटर कोहेन यांनी लिहिलेल्या पत्रात हॉकी इंडियाला मान्यता दिल्याचे म्हटले आहे. अस्लम यांनी म्हटले आहे की, इंडियन हॉकी कॉन्फेडरेशनऐवजी आता हॉकी इंडियाला सदस्यत्व
देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही हॉकी इंडिया आपले सदस्य असल्याचे मान्य केले आहे. भारतातील पुरुष व महिला हॉकीची एकमेव संघटना म्हणून हॉकी इंडियाचा स्वीकार केल्याचे आयओएने म्हटले आहे.

सुखेनची कामगिरी गौरवास्पद - गुलाटी
पुणे १६ जून/प्रतिनिधी

भारताने वेटलिफ्टींग स्पर्धेत आजपर्यंत महिलांनी पदकाची कमाई केली आहे. मात्र पुरुष गटात सुखेन याने प्रथमच देशास पदक मिळवून दिले आहे. त्याचे हे यश देशासाठी अभिमानास्पद आहे असे भारतीय वेटलिफ्टींग महासंघाचे चिटणीस बलदेव राज गुलाटी यांनी येथे सांगितले. ते म्हणाले, एकूणातही त्याला पदक मिळाले असते मात्र दुर्दैवाने तो पदक मिळवू शकला नाही. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याच्याकडून भारताला पदकाची खात्री आहे.