Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

अनधिकृत बांधकामाला पालिका आयुक्तांचे अभय?
संजय बापट

शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही, असे म्हणणारे ठाणे महापालिका आयुक्तच अनधिकृत बांधकामास प्रोत्साहन देणारे नगरसेवक आणि त्यांना हातभार लावणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय देत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एकीकडे तक्रारीसाठी दक्ष नागरिकांनी पुढे यावे, असे म्हणणारे आयुक्तच एखाद्या जागरूक नागरिकाची आश्वासनांच्या फेऱ्यात कशी बोळवण करतात, हेही यावरून स्पष्ट होते.

ठाणे जकात विभागात साफसफाई
ठाणे/प्रतिनिधी

जकात विभागात माफिया घुसल्याने या विभागाला अवकळा आली असून, त्यामुळेच जकात उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी आता जकात विभागातील माफियाराज खालसा करण्यासाठी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या विभागात मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.

विकास साधायचा असेल तर शिक्षण घेणे गरजेचे- अझरुद्दीन
भिवंडी/वार्ताहर

१५ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रिजवान मिस्टर यांनी शहरातील रौबीनगर येथे एका विशाल विजयी महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व खासदार मोहम्मद अझरुद्दीन, भारतीय क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, गृहराज्यमंत्री अरिफ नसीम खान, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, भोजपुरी अभिनेत्री लवी रोहटकी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जातीचे दाखले मिळत नसल्याने शेकडो नागरिक ‘बेवारस’
कल्याण/प्रतिनिधी - तहसीलदार कार्यालय आणि कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे सध्या शहरातील विविध स्तरातील शेकडो नागरिक जातीचा दाखला नसल्याने ‘बेवारस’ म्हणून वावरत आहेत. सध्या ३०० नागरिक आपल्याला जातीचा दाखला मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत, पण त्यांची दखल घेतली जात नसल्याने या नागरिकांवर कायमस्वरूपी बेवारस म्हणून राहण्याची वेळ आली आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पोलीस जखमी
ठाणे/प्रतिनिधी

दरोडे घालण्यासाठी निघालेल्या चार दरोडेखोरांनी एका पोलिसावर हल्ला करून नाशिकच्या दिशेने पोबारा केला. पोलिसांच्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला असून पोलीस नाईक गणेश गीते यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ही घटना आज पहाटे सिद्धेश्वर तलावाजवळ घडली. हे गुंड शिकवलीकर टोळीतील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंत्रमाग कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवू - विलासराव
भिवंडी/वार्ताहर : सत्तेच्या खुर्चीमुळे माणसाला आनंद होतो. ती सोडतानासुद्धा आनंदाने त्या खुर्चीचा त्याग केला पाहिजे. जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर जनता तुमच्या कार्याची कदर करून महत्त्व देत असते. सत्तेवर असताना जनहिताचे व कल्याणाचे कार्य करावे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भिवंडीचे महापौर जावेद दळवी होय, असे
प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे केले.

नगरसेवक रवींद्र चव्हाण यांचे ‘संकेतस्थळ’
डोंबिवली/प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरातील नागरी विकासाच्या समस्या घरबसल्या सोडविण्यासाठी भाजपचे नगरसेवक व माजी सभापती रवींद्र चव्हाण यांनी एक ‘संकेतस्थळ’ सुरू केले आहे. या संकेतस्थळामुळे पालिकेत न जाता नागरिकांना आपल्या महावितरण, पालिका व अन्य शासकीय, अशासकीय कार्यालयांशी संबंधित नागरी समस्या सोडविणे शक्य होणार आहे. www.ravindrachavan.inया संकेतस्थळावर नागरिकांना आपल्या घरातील, कार्यालयातील, सायबर कॅफेमधील संगणकावरून नागरी समस्येविषयी तक्रार करता येणार आहे. तक्रारीसंदर्भात त्याला पोहच म्हणून मोबाईलवर एसएमएस किंवा मेल आयडीवर तक्रार मिळाल्याची प्रतिक्रिया मिळणार आहे. या तक्रारीची पुढील कार्यवाही चव्हाण यांच्या कार्यालयातील कर्मचारी घेतील. ज्या विषयाशी संबंधित ही तक्रार आहे, त्या अधिकाऱ्याशी चर्चा करून ती तक्रार किती दिवसात मार्गी लागेल याची माहिती तक्रारदाराला देण्यात येईल. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुपित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नागरी समस्येसंबंधीच्या तक्रारी या संकेतस्थळावर कराव्यात असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

एमएमआरडीए बांधणार बदलापूरचा पादचारी पूल
बदलापूर/वार्ताहर
गेल्या अनेक वर्षांंपासून रेंगाळलेल्या बदलापूर येथील पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या रेल्वे फाटकाजवळील पादचारी पुलाच्या वादाचा गुंता सुटला असून, महाराष्ट्र प्रादेशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएमार्फत हा पूल उभारला जाणार असल्याचे नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितले.यापूर्वी पूर्व-पश्चिम दिशांना जोडणारा उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाल्यानंतर रेल्वेने फाटक बंद केले. यामुळे शहरातील नागरिकांना जीव धोक्यात टाकून लोहमार्ग ओलांडून पूर्व-पश्चिम दिशांना जावे लागत होते. लोहमार्ग ओलांडताना अनेकदा अपघात होऊन अनेकजण मरण पावले आहेत. या ठिकाणी पादचारी पूल व्हावा यासाठी नगरपालिका प्रयत्नशील होती, तसेच पुलाच्या खर्चाची गरज असल्याने पालिकेकडे निधीची कमतरता भासत होती. एमएमआरडीएशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याने एमएमआरडीएने आर्थिक सहाय्यास मंजुरी दिली आहे.

आजीच्या नेत्रदानाने दोघांना मिळाली दृष्टी!
ठाणे/ प्रतिनिधी

येथील नौपाडा भास्कर कॉलनीत राहणाऱ्या सरस्वती गणेश जोशी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्याच्या संकल्पामुळे दोघांना दृष्टी लाभली आहे. सरस्वती जोशी धार्मिक आणि कर्मठ वृत्तीच्या असल्या तरी त्यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार त्यांचे पुत्र गोपाळ जोशी यांनी प्रयत्न केला, पण वेळेवर माहिती उपलब्ध न झाल्यामुळे देहदान करता आले नाही. आईची नेत्रदानाची इच्छा मात्र त्यांनी पूर्ण केली. एका नेत्रपेढीत वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंतचीच व्यक्ती नेत्रदान करू शकते असे त्यांना सांगण्यात आले. मात्र दुसऱ्या एका नेत्रपेढीने सरस्वती जोशी यांचे नेत्र घेऊन यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे दोन अंधांना दृष्टीही दिली. ठाण्यातील श्री. वि. आगाशे नेत्रदानविषयक सविस्तर माहिती, व्याख्याने आणि मार्गदर्शन करतात. संपर्क-२५८०५८००.