Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

व्यक्तिवेध

हिना रब्बानी खार या ३२ वर्षांच्या महिलेने १३ जून २००९ रोजी पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये इतिहास घडवला. पाकिस्तानच्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणारी ती पहिला महिला मंत्री. इस्लामी राष्ट्र म्हणून निर्मिती झालेल्या पाकिस्तानच्या समाजाप्रमाणेच राजकारणातही महिलांचा पुढाकार ही गोष्ट तिथल्या समाजाच्या आणि राजकारण्यांच्या पचनी सहजी न पडणारी. म्हणूनच या सामाजिक-धार्मिक परंपरांचे अडसर दूर करीत ज्या ज्यावेळी महिला समाजात नेतृत्व करायला पुढे येतात, त्या त्यावेळी ते निश्चितच अप्रूप ठरते. अर्थात हिना रब्बानी खार यांना राजकारणात मुरलेल्या कुटुंबाचे तसेच उच्च शिक्षणाचे संस्कार लाभले

 

आहेत. या उच्चभ्रू वातावरणातली जडणघडण ही त्यांच्या कर्तृत्वाचा मार्ग प्रशस्त करणारी ठरली आहे. मुलतानमध्ये १९७७ मध्ये जन्मलेल्या हिनाने लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समधून १९९९मध्ये अर्थशास्त्रात बी.एस्सी.ची पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेत मॅसेच्युसेट्स विद्यापीठातून २००१ मध्ये एम.बी.ए. केले. वडील गुलाम नूर रब्बानी खार तसेच चुलते गुलाम मुस्तफा खार हे दोघे राजकारणी. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर सुरू करणाऱ्या हिना घरातल्या या प्रोत्साहनाने राजकारणाकडे वळल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर त्या पश्चिम पंजाबच्या मुझफ्फरगढमधून पाकिस्तानी संसदेवर निवडून गेल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टीप्रणीत आघाडीच्या सरकारमध्ये सध्या त्या अर्थखात्याच्या राज्यमंत्री आहेत. प्रधानमंत्री यूसुफ रझा गिलानी यांच्या अखत्यारीत अर्थखात्यात आंतरराष्ट्रीय बहुपक्षीय आणि द्विपक्षीय कर्जाचा विभाग त्या सांभाळत आहेत. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार वास्तविक यूसुफ रझा गिलानी यांचे आर्थिक सल्लागार शौकत तरीन यांचा. परंतु ते संसदेवर निवडून आलेले सदस्य नाहीत. त्यामुळे निवडून आलेल्या व अर्थखात्याच्या राज्यमंत्री असलेल्या हिना रब्बानी खार यांना अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. ‘बेनज्मीर भुत्तो १९८८ मध्ये मुस्लिम जगतातल्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या आणि २००८ मध्ये फहमीदा मिर्झा या पाकिस्तानच्या संसदेवर पहिल्या महिला स्पीकर म्हणून निवडून आल्या, त्यानंतरचा, पाकिस्तानी महिला सक्षमीकरणातील आणि स्त्री-पुरुष समानतेच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा होय’ अशी नोंद हिना यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हिना रब्बानी यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले. उर्दूतून अर्थसंकल्प सादर करताना त्यांना काहीसे अडखळायलाही होत होते. परंतु ६५ मिनिटांच्या त्यांच्या या भाषणात तालिबानी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या वेतनवृद्धीची तरतूद सुचविली गेली तेव्हा संसद सदस्यांनी बाके वाजवून तिचे स्वागत केले. गेल्या दशकभरात पाकिस्तानी समाजाचे बऱ्याच अंशी आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यीकरण झाले आहे, असे हिना यांचे म्हणणे आहे. वैचारिक आधुनिकीकरणाचे त्या स्वागत करतात, पण आपल्या संस्कृतीला विसरून पाश्चात्यांचे अनुकरण करणे त्यांना पसंत नाही, असे त्या म्हणतात. गिरीभ्रमण हा त्यांचा एक छंद आहे आणि लाहोर विद्यापीठात शिकत असताना नंगा पर्बत आणि के-टू वर गिर्यारोहणाच्या मोहिमेतही त्यांनी भाग घेतला होता. या भटकंतीत देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात, तिथल्या लोकांत मिसळताना आपला समाज खूप खुल्या विचारांचा आहे, आतिथ्यशील आहे, अशी निरीक्षणे त्यांनी नोंदली. पाकिस्तानच्या प्रगतीसाठी काही योजना लोकप्रिय होणाऱ्या नसल्या तरी राबवायला हव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. उदा. बँकिंग आणि दूरसंचार क्षेत्रांत! त्याचवेळी राजकीय क्षेत्रात संधी असल्या तरी भरवसा कोणत्याच गोष्टीचा नाही, इथे सर्व काळ टिकून राहता येईल आणि योजना दीर्घकाळासाठी राबवता येतीलच याची शाश्वती नाही, अशी कबुलीही त्या देतात. आणि सध्याचे प्रधानमंत्री गिलानी आणि अध्यक्ष झरदारी यांच्यासमवेत काम करण्याची संधी ही आपल्या राजकीय करिअरमधली सर्वात अभिमानास्पद अशी गोष्ट होय, असेही त्या म्हणतात.