Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

विविध

अजित जोशींच्या पुढाकारामुळे झाले कोसीपीडित मुसहेरीचे पुनर्वसन
नवी दिल्ली, १६ जून/खास प्रतिनिधी

संकटकाळी माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळेच जाती, पाती आणि प्रांताच्या अस्मितेपलीकडे माणुसकीचे धागे असतात. कोसी नदीच्या प्रलयात उद्ध्वस्त झालेल्या मुसहेरी गावाचे पुनर्वसन करताना अजित जोशी यांच्यासारख्या तरुण मराठी अधिकाऱ्याने दाखविलेली संवेदनशीलता आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी सोमवारी मुसहेरीच्या लोकार्पण समारंभात बोलताना काढले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार होते.

भाजपला हिंदुत्वाचा त्याग करण्याची गरज नाही : डॉ. जोशी
अलाहाबाद, १६ जून / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊन भाजपने हिंदुत्वाचा त्याग करू नये तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले नातेही तोडू नये, असे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या मुरली मनोहर जोशींनी पक्षातील अंतर्गत कलहावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.

लष्कराला ऑर्कुट आणि फेसबुकवर माहिती देण्यास बंदी
नवी दिल्ली, १६ जून / वृत्तसंस्था

लष्कराच्या सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या कामासंदर्भातील आणि कार्यालयाबाबतची कोणतीही माहिती ऑर्कुट आणि फेसबुकवर देता येणार नाही. या संदर्भातील स्पष्ट आदेश लष्करातर्फे देण्यात आले आहेत. लष्करातील कोणतीही व्यक्ती आपले पोस्टिंग, पद आदी माहिती सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर देऊ शकणार नाही असे सैन्यदलाने नुकताच जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

अरुण जेटली यांचा भाजप सरचिटणीसपदाचा राजीनामा
नवी दिल्ली, १६ जून/खास प्रतिनिधी

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. जेटली सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून त्यांनी एक व्यक्ती, एक पद या भाजपमध्ये सामान्यपणे पाळल्या जाणाऱ्या तत्त्वाला अनुसरून सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. जेटली यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. पण या राजीनाम्याची वाच्यता आज झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह आणि यशवंत सिन्हा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय पदांवर केलेल्या नियुक्त्यांवर आक्षेप घेतल्यानंतर हा राजीनाम्याचे वृत्त बाहेर पडल्यामुळे भाजपमध्ये सुरु असलेल्या धुमश्चक्रीशी या राजीनाम्याचा संबंध जोडला जात आहे. पण एक नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा हा सामान्य प्रकार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे.

इंग्रजीमधील दहा लाखाव्या शब्दाला भाषाशास्त्रज्ञांचा आक्षेप
न्यूयॉर्क, १६ जून/पीटीआय

इंग्रजी भाषेमध्ये web 2.o. चा दहा लाखावा शब्द म्हणून समावेश करण्यात आल्याचे अमेरिकेतील टेक्सास येथील ग्लोबल टेक्सास लँग्वेज मॉनिटर या संस्थेने जाहीर केले होते. जय हो, स्लमडॉग या हिंग्लिश शब्दांचाही इंग्रजी शब्दभांडारामध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अर्थाबाबत वाद असलेल्या तसेच निर्थक शब्दांचा इंग्रजी शब्दभांडारामध्ये समावेश करण्यास भाषाशास्त्रज्ञांनी विरोध दर्शविला आहे.कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इन्फर्मेशनमधील भाषाशास्त्रज्ञ जेफ्री न्यूनबर्ग यांनी म्हटले आहे की, असे शब्द समाविष्ट करणे ही शुद्ध फसवणूक आहे.वर्ल्डलिंक डॉट कॉम या इंटरनेटवरील शब्दकोशाचे संकलक व लेक्झिकोग्राफर ग्रँट बर्नेट यांनी सांगितले की, निर्थक शब्द भाषेमध्ये समाविष्ट करणे हे अयोग्य आहे. या शब्दांमुळे भाषेचा कधीही विकास होत नाही.भाषाशास्त्रज्ञांनी केलेल्या विरोधामुळे आता निर्थक शब्द इंग्रजी शब्दभांडारामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया तसेच मागणीवर काही प्रमाणात अंकुश बसेल अशी आशा आहे.

गुजरातमध्ये कुटुंबाला संपवून कर्जबाजारी इसमाची आत्महत्या
अहमदाबाद, १६ जून/पी.टी.आय.

झालेले कर्ज फेडता न आल्याने वैतागलेल्या अविनाश विनोदभाई पटेल (४२) या इसमाने आपली माता, पत्नी आणि मुलाला प्रथम ठार केले आणि त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. कर्ज फेडणे शक्य नसल्याने आपण सर्व कुटुंबाला संपविण्याचा निर्णय घेतला असे पटेल याने आत्महत्येच्या ठिकाणी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. येथील पालडी भागात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल याने प्रथम आपली माता हंसाबेन (६५) यांना त्यांच्या मनगटावरील नस तोडून ठार मारले. पटेल राहात असलेल्या अजितनाथ अपार्टमेंटजवळील एका सोसायटीमध्ये हंसाबेन राहात होत्या.
त्यानंतर पटेल आपल्या घरी गेला व त्याने आपली पत्नी मोना (३३) व मुलगा श्यामल (१३) अशा दोघांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून घेऊन त्याने आत्महत्या केली. या चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

वादळ व गारपिटीने राजस्थानात नऊ ठार
जयपूर, १६ जून/पी.टी.आय.
पश्चिम राजस्थानमध्ये आज जोरदार वादळाने व त्यापाठोपाठ आलेल्या गारांच्या पावसाने नऊजणांचे बळी घेतले. मृतांमध्ये काही बालकांचा समावेश असून किमान वीसजण जखमी झाले आहेत. जोधपूर विभागातील मावली या गावात जोरदार वादळाने एका घराचे दगडी छत कोसळून हरिश व रवीना ही दोन मुले गाडली गेली. अन्य एका घटनेत जोधपूरच्या मंदोर या भागात एका घराची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला. मथानिया या गावात एक झाड कोसळून मुन्नीदेवी ही बालिका मृत्युमुखी पडली. वादळ व गारांच्या पावसाने वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जयपूर शहरालाही या वादळाचा तडाखा बसला.

मणिपूरमध्ये नऊ दहशतवाद्यांना अटक
इम्फाळ, १६ जून/पी.टी.आय.
मणिपूर राज्यातील विविध भागांतून पोलीस आणि सुरक्षा सैनिकांनी नऊ दहशतवाद्यांना अटक केल्याचे अधिकृत सूत्रांनी जाहीर केले. थौबल जिल्हा पोलिसांच्या कमांडोनी बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स रिव्हॉल्युशनरी पार्टी ऑफ कंग्लैपक या दहशतवादी संघटनेच्या दोघा जणांना अटक केली. एक ग्रेनेड, बंदुकीच्या गोळ्यांचे सहा पट्टे या दोघांकडून हस्तगत करण्यात आले आहेत.