Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

व्यापार-उद्योग

सारस्वत बँकेने एकंदर व्यवसायात २१ हजार कोटींचा टप्पा गाठला
व्यापार प्रतिनिधी: नागरी सहकारी बँकांत देशात आघाडीवर असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात चमकदार कामगिरी करताना एकंदर

 

व्यवसायात २१,००० कोटींचा टप्पा पार केला आहे. करापोटी तसेच अपावादात्मक खर्चापोटी रु. १०४.८२ कोटी खर्च करूनही बँकेने रु. २१०.७९ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. गतवर्षी बँकेचा निव्वळ नफा रु. २०२.२६ कोटी होता. सारस्वत बँकेचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी या कामगिरीविषयी बोलताना सांगितले की, बँक नफाक्षमता कायम राखण्यात सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत यशस्वी झाली आहे. चालू वर्षात आणखी दोन नागरी सहकारी बँकांचे सारस्वत बँकेत विलिनीकरण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेचा करपूर्व नफा २००७-०८ च्या तुलनेत ३६.१३ टक्क्यांनी वाढून रु. ३१५.६१ कोटींवर गेला. मात्र यंदा करापोटी गेल्या वर्षाच्या तुलनेत दीड पटीने अधिक म्हणजे एकंदर रु. ७४.३२ कोटींचा खर्च आला. तर बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या जाहिराती व समारंभानिमित्त तसेच स्वेच्छानिवृत्ती योजनेवर रु. ३०.५० कोटींचा खर्च झाला. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण वाढले आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी आणि कर्ज व्यवसायात अनुक्रमे १३.०२ टक्के आणि ८.८९ टक्के वाढ होऊन, त्या अनुक्रमे रु. १२,९१८.८५ कोटी आणि रु. ८,११०.४१ कोटी झाल्या. गेल्या वर्षातील रु. १८,८७९.१३ कोटींच्या तुलनेत एकंदर व्यवसाय ११.३९ टक्क्यांनी वाढून तो मार्च २००९ अखेर रु. २१,०२९ कोटींवर पोहचला आहे. सहकार क्षेत्रात असून सारस्वत बँकेने अग्रगण्य सरकारी तसेच खासगी वाणिज्य बँकांच्या सडेतोड कामगिरी केली असून सारस्वत बँकेचा १.४६ टक्के असलेला मालमत्तेवरील सरासरी परतावा (रिटर्न ऑन अ‍ॅसेट्स) आणि एकुण व्यवसायाच्या तुलनेत नफ्याचे प्रमाण पाहता लक्षात येईल, असेही ठाकूर यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचे वैशिष्टय़ विशद करताना सांगितले. बँकेने आपल्या जुन्या आणि निष्ठावंत ठेवीदारांबाबत बांधिलकी दाखविताना अशा ५० हजार ठेवीदारांना बँकेचे सभासदत्व अर्थात भागधारक करून घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

माझ्या खासदार निधीतील पै अन् पैसा वापराला गेला आहे - ठाकूर
माझ्या सहा वर्षाच्या कारकीर्दीत खासदार निधी म्हणून उपलब्ध झालेल्या रु. १२ कोटींपेक्षा अधिक खर्चाची मी कामे केली असून, त्यातील जी कामे पूर्ण होऊन निधी खर्च झाला तेवढाच उल्लेख ‘कॅग’च्या अहवालात असून, कार्यवाहीतील व पूर्णत्वाला न गेलेल्या कामांचा खर्च मंजूर न झाल्याने उल्लेख नाही. त्यातून खासदार निधी वापरलाच गेला नाही, असा अतिरंजित निष्कर्ष काढणे निराधार आहे, असा खुलासा राज्यसभेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी केला. अत्यंत तांत्रिक स्वरूपाची ही चूक असून त्यातून खासदारांची नाहक बदनामी होणे टाळले जावे, असे सुचविणारे निवेदन लवकरच ‘कॅग’च्या प्रमुखांना भेटून आपण सादर करणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भविष्यात असे काही घडू नये म्हणून काही शिफारशी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना निवेदन सादर करून आपण करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

ग्रामीण युवकांमध्ये रोजगारक्षम आणि उद्यमशील कौशल्य घडविण्याचा ध्यास
दरवर्षी लाखो भारतीय युवक शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात आणि बेरोजगारांच्याच यादीत त्यांची भरती होते, त्यांच्याकडे आजच्या कॉर्पोरेट भारतातील कंपन्यांना आवश्यक ते कौशल्य नसते. त्यामुळे मग कित्येकजण अगदीच फुटकळ आणि त्यांच्या प्रतिभा व क्षमतेपेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे काम करतात. ही जी दरी आहे ती भरून काढण्यासाठी ‘कोलॅब्रन्ट ग्रुप’ आणि ‘स्ट्राईव्ह’ (आयएफएमआर ट्रस्टची संस्था) यांच्यातील संयुक्त भागीदारी उपक्रम असलेल्या ‘व्होकशनल अ‍ॅकॅडमी इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेड’ने एप्रिल २००९ मध्ये आपल्या सेवा दाखल केल्या आहेत. ‘व्होकॅड- व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’ या नावाने या सेवा दाखल झाल्या आहेत.
‘व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’चा उद्देश हा ग्रामीण आणि निमशहरी युवकांना आवश्यक ते कौशल्य प्रश्नप्त करून, आजच्या आधुनिक ‘इंडिया’कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करून देण्याची कुवत त्यांच्याच निर्माण करणे हा आहे. त्या माध्यातून तळागाळातच संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मागणीकेंद्री दृष्टिकोन ठेवत विस्तृत कार्यक्रम सादर करण्यावर भर दिला जाणार असून, त्यातून रोजगारशक्ती, करिअर संधी आणि उद्यमशील कौशल्य या गोष्टी निर्माण केल्या जाणार आहेत.
‘व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’चे व्यवस्थापकीय संचालक श्रीवत्सन म्हणाले, ‘‘व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’ ही ग्रामीण आणि निमशहरी भारतातील युवकांच्या स्वप्नांना दृश्य स्वरूप देण्यासाठी एक चळवळ उभी करीत आहोत. देश झपाटय़ाने प्रगती करीत असताना सर्व राज्यांमधील तसेच ग्रामीण भागातील आणि जिल्हा पातळीवरील युवकांना त्यात सामील करणे अनिवार्य आहे आणि त्यातूनच ‘भारत इन्क’ समर्थपणे उभा राहू शकतो. हे युवा भारतीयांना देशाच्या यशात सामील व्हायचे आहे आणि त्यांनाही सर्वच क्षेत्रातील विकासामध्ये हक्काचा वाटा उचलायचा आहे. व्होकॅड हे या युवकांमधील प्रतिभेला वाव देणारे व्यासपीठ असून, त्या माध्यमातून त्यांना देशाच्या वृद्धिपथावरील अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याची संधी मिळणार आहे.’’ हीच गोष्ट ध्यानात घेऊन ‘व्होकेशनल ट्रेनिंग नेटवर्क एन्टरप्रश्नइज (व्हीटीएनई)’ या आयएफएमआर ट्रस्टच्या संस्थेने २७.५ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक ‘व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’मध्ये केली आहे. शिक्षण हे क्षेत्र आज कित्येक खासगी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र ठरत आहे. एनईएफने व्हीटीएनईच्या माध्यमातून यापूर्वीही व्होकेशनल शिक्षा स्रोत कंपनी, ‘स्ट्राईव्हमध्ये’ गुंतवणूक केली आहे. ती ग्रामीण/ निमशहरी विद्यार्थ्यांना चाचणी, सल्ला, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण, नोकरी आणि प्रमाणपत्र देऊ करते. ‘व्होकेशनल अ‍ॅकॅडमी’ने हा निधी बाजारपेठेतील आपला वाटा वाढविण्यासाठी वापरावा अशी अपेक्षा असून, त्यासाठी २०१० पर्यंत ५० केंद्रे दाखल केली जाणार आहेत आणि २०१७ पर्यंत देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती अस्तित्वात असेल. ‘व्होकॅड’ सध्या आठ ठिकाणी सुरू झाले असून, भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

शालिवाहन ग्रीन एनर्जीत नवी भांडवली गुंतवणूक
व्यापार प्रतिनिधी: अ‍ॅक्सिस प्रश्नयव्हेट इक्विटी लिमिटेड (अ‍ॅक्सिस पीई) व आयएल अँड एफएस फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (आयएफआयएन) यांनी शालिवाहन ग्रीन एनर्जी लिमिटेड (एसजीईएल) या हरितवीज निर्मिती क्षेत्रातील कंपनीत रु. ९० कोटी खासगी गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. एसजीईएल कंपनीमध्ये अ‍ॅक्सिस पीई कंपनीने रु. ५४ कोटी तर आयएफआयएन कंपनीने रु. ३६ कोटी गुंतवणूक केली आहे. एसजीईएल ही बायोमास व छोटे जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेली अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. सध्या या कंपनीचे एकूण ३५ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचे चार प्रकल्प कार्यान्वित आहेत. तसेच संपूर्ण देशात विविध ठिकाणी कंपनीचे अनेक बायोमास व छोटे जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. नवे भांडवल प्रश्नप्त झाल्यामुळे एसजीईएल कंपनी आपली वीज निर्मिती क्षमता २५० मेगावॉटपर्यंत वाढवू शकणार आहे.
अ‍ॅक्सिस पीईची ही पाचवी खासगी गुंतवणूक आहे. यापूर्वी कंपनीने पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना, तेल व वायू पाईपलाईन प्रकल्प, रेल्वे ईपीसी प्रकल्प आणि हॉटेलसारखे आदरातिथ्य प्रकल्प यात एकूण रु. ३२० कोटी गुंतवणूक केली आहे.