Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

अग्रलेख

झरदारींना तडाखा

 

भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर केला जाता कामा नये, हे तुम्हाला बजावण्यासाठी आमच्यामागे जनमत भक्कमपणे उभे आहे, हे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना स्वच्छ शब्दात सांगितले आहे. पत्रकारांसमोर त्यांनी ते सांगितल्याने झरदारींची अवस्था विचित्र झाली असणार, यात शंका नाही. मनमोहनसिंगांचा हा दणका जिव्हारी बसल्याने ‘पत्रकारांना इथून बाहेर जाऊ द्या, मग आपण बोलू’, असे सांगून झरदारींनी वेळ मारून नेली. मनमोहनसिंग यांनी झरदारी यांची रशियात येकतेरिनबर्ग येथे गाठ घेतल्यावर हस्तांदोलनात फारसा वेळ खर्च केला नाही. त्यांनी एकदम पाकिस्तानी कारवायांवरच थेट तोफ डागली. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना आपल्या मनातली खदखद समजावी या उद्देशाने तर ते बोललेच, पण दरवेळी पाकिस्तानला दरडावायचे नाटक करून त्यास पाठीशी घालणाऱ्या अमेरिकेसारख्या देशापर्यंत आपल्या भावना पोहोचाव्यात, या उद्देशानेही मनमोहनसिंगांनी ही तोफ डागली. अमेरिकन सीनेटने पाकिस्तानला दरवर्षी दीड अब्ज डॉलर मदत बिनशर्त द्यायचा ठराव अगदी कालच मंजूर केला, त्याचीही पाश्र्वभूमी त्यांच्या या संतापदग्ध उद्गारांना लाभलेली आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आजवर जो पाठिंबा दिला गेला, तो लक्षात घेता ही मदत देताना पाकिस्तानवर अटी लादण्यात याव्यात आणि त्या मान्य असतील, तरच त्यांना मदत देण्यात यावी, असे अमेरिकेच्या काही लोकप्रतिनिधींना आणि सीनेटरांना वाटत होते. या मदतीचा विनियोग कसा केला जाणार, याविषयी पाकिस्तानकडून लेखी आश्वासन घेतले जावे, असेही अमेरिकन राजकारण्यांना वाटत होते. अमेरिकेने तसे काहीच केले नाही. ‘दहशतवाद्यांना तुमच्याकडून होणारी मदत ही भारताच्या मुळावर उठणारी आहे,’ हे डॉ. सिंग यांना स्पष्ट करायचे होते, ते त्यांनी केले. जगभरातून आलेले पत्रकार तिथे आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे रोखलेले आहेत, हे माहीत नसल्याने मनमोहनसिंग यांनी अनवधानाने तसे म्हटले असेल, असे ज्यांना वाटते आहे, त्यांनी तसे खुशाल समजायला हरकत नाही. त्यांना मनमोहनसिंग कळलेच नाहीत, असे मग म्हणावे लागेल. डॉ. सिंग हे कमकुवत पंतप्रधान आहेत, असे सातत्याने प्रचारी बोलणाऱ्यांचा निकाल गेल्या महिन्यात कसा लागला, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना डॉ. सिंग यांच्या रशियातल्या कणखर भाष्याचे नवल वाटणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यात ते झरदारी यांना भेटले. पाकिस्तानबरोबर चर्चा करायला आपली ना नाही, शांततेसाठी अशी बोलणी आवश्यक आहेत, हे त्यांनी गेल्या आठवडय़ात संसदेत स्पष्ट केले होते. पाकिस्तानशी चर्चा, ही काही आपली कमजोरी नाही किंवा कुणाचे अशा चर्चेसाठी आपल्यावर दडपणही नाही आणि ते आल्यास आपण त्यास भीक घालणार नाही, हेही त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. झरदारींबरोबरची त्यांची ही चर्चा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतरची पहिलीच असल्याने अन्य कोणत्याही विषयापेक्षा दहशतवादाचाच मुद्दा प्रामुख्याने या चर्चेत उपस्थित होणे अपरिहार्य होते. मधल्या काळात पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी असंख्य कोलांटउडय़ा मारल्या. मुंबईच्या हल्ल्यात सहभागी असलेला आणि जिवंत पकडला गेलेला अजमल अमीर कसाब हा पाकिस्तानी नव्हेच, इथपासून अनेक बतावण्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी केल्या. मुंबईवर ज्यांनी हल्ला केला, त्यांच्या मागे असणाऱ्या लाहोरजवळच्या मुरिदके गावातल्या ‘जमात उद् दावा’ या संघटनेचा प्रमुख हाफिझ अल सईद याला पाकिस्तानने नाइलाजापोटी पकडले आणि लाहोर उच्च न्यायालयाने त्याला कोणताही पुरावा नसल्याचे कारण देऊन सोडूनही दिले. हाफिझ सईदला सोडल्याबद्दल अमेरिकेने प्रारंभी नाराजी व्यक्त केली आणि नंतर ‘हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला असल्या’चे सांगून कानावर हात ठेवले. अमेरिकेच्या ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’च्या तपासानंतरच झरार शाह, झकिउर रहमान लख्वी आणि हाफिझ सईद यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. ‘जमात उद् दावा’ या संघटनेविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाने र्निबध लागू केले असल्याने या संघटनेने आपले नावही ‘तहरिक ए हर्मत ए रसूल’ उर्फ ‘तहर’ असे ठेवले. आपली संघटना अमेरिकेविरुद्ध नाही, असे सांगून अमेरिकेचा रोष टाळायचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपण कुणाविरुद्ध आहोत, हे तेव्हाच स्पष्ट केले होते. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी त्या मुळेच या संघटनेला आजवर पाठीशी घातले आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबादजवळ खैरातीबाग येथे आणि लिपा खोऱ्यात भारताविरूद्ध कारवायात गुंतलेल्या दहशतवाद्यांचे आजही अड्डे आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या स्वात आणि वझिरीस्तान भागात ‘तहरिक ए तालिबान’ या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या संघटनेचा नेता बैतुल्ला महसूद हा कोणत्याही क्षणी पकडला वा मारला जाईल, असा निर्वाळा पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. बैतुल्ला महसूदचे अफगाण तालिबानांशी संबंध आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या अमेरिकन लष्कराविरुद्ध आणि अफगाणिस्तानच्या करझाई सरकारविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना पाठिंबा देणारा बैतुल्ला आता पाकिस्तानला डोईजड वाटतो आहे. यापूर्वी ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांपासून पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण बैतुल्लाच्या पायाशी बसून होते, तेव्हा कुणाला हे साटेलोटे खटकले नव्हते. अमेरिकेची ‘सीआयए’ ही गुप्तचर संघटनाही कधीकाळी त्याच्या पाठीशी होती. आज अमेरिकेलाही त्याला संपवायचे आहे. अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या अंतर्गत प्रदेशात शिरून बॉम्बफेक करून अफगाण तळांकडे निघून जातात, तेव्हा पाकिस्तानला मात्र त्याकडे पाहात राहण्यावाचून काही करता येत नाही. पाकिस्तानचा वापर यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ देणार नाही, असे पाकिस्तानी नेत्यांनी, अगदी झरदारींनीसुद्धा आधी अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना आणि आता अध्यक्ष बराक ओबामा यांना सांगितले आहे. तथापि या दहशतवादी टोळ्यांचा वापर भारताविरुद्ध होऊ दिला जाणार नाही, असे पाकिस्तानी नेते सांगू शकलेले नाहीत. अगदी परवाही जेव्हा झरदारी आणि डॉ. सिंग यांच्यातल्या चर्चेनंतर पाकिस्तानी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने कोणत्या दहशतवाद्यांना पाकिस्तान संपवू इच्छितो, ते स्पष्ट करायला नकार दिला. ‘एनडीटीव्ही’चे प्रणव रॉय यांनी खोदून विचारल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तानी जमिनीचा वापर करू देणार नाही, असे स्पष्ट शब्दात त्याने म्हटले नाही. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये परस्पर सहकार्य होत असते. ‘जमात उद् दावा’ही ‘लष्कर ए तैयबा’ची आघाडीची संघटना मानली जाते. ‘लष्कर ए तैयबा’ ही ‘अल काईदा’ या ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटनेला सर्वतोपरी मदत करत असते. लादेन हा आजही पाकिस्तानमध्येच दडलेला आहे. असे ‘सीआयए’ या गुप्तचर संघटनेने अगदी अलीकडेच पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तरीही अमेरिकेने पाकिस्तानवर मदतीसाठी अटी लादायला नकार दिला आहे. पाकिस्तानमध्ये स्थैर्य यावे, यासाठीही मदत आवश्यक आहे, असे ओबामांचे म्हणणे मान्य केले तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. स्थैर्यासाठी पाकिस्तानला भारताबरोबरचे संबंध सुधारावेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. झरदारींबरोबर डॉ. सिंग बोलले म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्यांना आरंभ नव्हे, असे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी स्पष्ट केले आहे. झरदारी डॉ. सिंग हे पुन्हा पुढल्या महिन्यांत इजिप्तमध्ये शर्म अल शेख मध्ये अलिप्त राष्ट्र परिषदेच्या निमित्ताने एकत्र येतील. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्येही पुढल्या महिन्यात चर्चा होईल, पण या दरम्यान पाकिस्तानी राज्यकर्ते भारताविरुद्ध कारवायांमध्ये गुंतलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध कोणते उपाय योजतात की ते अजिबातच त्याविषयी पावले उचलत नाहीत, ते बारकाईने पाहिले जाणार आहे. डॉ. सिंग यांनी झरदारींना लगावलेल्या तडाख्यााचा तोच नेमका अर्थ आहे.