Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

लोकमानस

खासगी साखर कारखाने हवेतच

 

कै. नरुभाऊ लिमये यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा गौरव पुरस्कार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना नुकताच देण्यात आला. या वेळी भाऊसाहेबांनी खासगी साखर कारखानदारीवर टीका केली.
वास्तविक सहकारी कारखानदारीवर झालेला प्रचंड खर्च, त्यातील भ्रष्टाचार हा संशोधनाचा विषय आहे. सहकारी कारखानदारी हा एक राजकीय दबाव गट झाला आहे व तो वाटेल त्या मागण्या मान्य करून घेत आहे. याला वेसण घालायची तर खासगी कारखानदारी हवीच. खासगी साखर कारखानदारीमुळे सहकारी साखर कारखानदारीला एक प्रकारचा निकोप स्पर्धक भेटला व त्यामुळे भ्रष्टाचाराला अंशत आळा बसला, कार्यक्षमतेत वाढ झाली.
केवळ राजकीय नेते तयार करणे हा उद्देश ठेवून भरमसाठ साखर कारखानदारी महाराष्ट्रात वाढली व अनेक साखर कारखाने आजारी पडले, बंद पडले, दिवाळखोरीत निघाले. साखर कारखानदारीमुळे साखरसम्राटांचा अतिश्रीमंत वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला, जो पैशाच्या जोरावर राजकारणात, समाजकारणात, शिक्षण क्षेत्रात शिरकाव करू शकला आणि अधिक श्रीमंत होऊ लागला व त्यांची राजकारणावरील पकड अधिक घट्ट होऊ लागली.
वास्तविक ऊस उत्पादकांना सर्व नफा वाटून देऊन ना नफा ना तोटा तत्त्वावर सहकारी साखर कारखानदारी चालविणे अपेक्षित होते. ते झाले नाहीच. आर्थिक उत्कर्षांचा फार थोडा हिस्सा शेतकऱ्यांकडे आला आणि मलिदा साखरसम्राट खाऊन बसले. म्हणूनच सहकारी साखर कारखानदारीला वेसण घालण्यासाठी खासगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
आजकाल सरकार सर्वच क्षेत्रांत बीओटी तत्वावर खासगी भांडवलदारांबरोबर करार करीत आहे. मूलभूत सुविधांमध्ये जर खासगी क्षेत्र आहे,तर साखर कारखानदारीत हे का शक्य होणार नाही? साखर उद्योग हा साखर उप-उत्पादन समजून इतर उत्पादनाला जेव्हा स्वीकारेल तेव्हा साखर कारखानदारी फायदेशीर होईल.
भास्करराव म्हस्के, पुणे

राष्ट्रवादीची मान्यता रद्द करा
‘पद्मसिंह सीबीआयच्या ताब्यात’ व ‘निगडीतील अस्तित्व मॉलचे कुलूप महिलांनी तोडले’, अशा दोन परस्परांशी वेगळ्या अर्थाने जोडणाऱ्या बातम्या (७ जून) वाचल्या. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला त्यातून जाणवणारा अर्थ असा- राष्ट्रवादी काँग्रेसने प्रारंभापासूनच गुंडगिरीला वरदहस्त दिलेला आहे. पद्मसिंह पाटील हे त्यापैकी केवळ एक नाव! खरे तर त्या पक्षाच्या सर्वच खासदार, आमदार व नगरसेवकांची पाळेमुळे खणून ती जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे.
मतदारांना धाकदपटशा दाखवूनच त्या पक्षाने मते मिळविली आहेत. त्यांच्या गुंडगिरीतून महाराष्ट्रातील महिला बचत गटही सुरक्षित राहू शकत नाहीत. हे बचत गट म्हणजे जणू आपल्याला मिळालेली जहागीर आहे, अशा थाटात राष्ट्रवादीचे राजकारण सुरू आहे. त्यातूनच बचत गटांमध्ये हेव्यादाव्याचे वाईट राजकारण सुरू होऊन ही मोठी चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर चालली आहे. पद्मसिंह पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यताच रद्द करण्याची मागणी विरोधकांनी राष्ट्रपती व निवडणूक आयोग यांच्याकडे करायला पाहिजे. तसे झाले तरच महाराष्ट्रातील जनतेला सुटकेचा निश्वास टाकता येईल.
सदानंद भोसले, पुणे

सार्वजनिक वाहतूक सुधारण्याची गरज
‘सावध.. ओळखा पुढला धोका!’ हा अतिशय तळमळीने लिहिलेला भारतीय मोटर वाहन धोरणविषयक लेख (११ जून) विचारांचे कल्लोळ उठविणारा आहे. आज जगात ९० कोटी मोटर वाहने आहेत, त्यातली भारतात किती आहेत, याचे उत्तर सर्वानाच माहीत आहे. मोटारींमुळे निर्माण होणारा प्रश्न, पर्यावरण असमतोल हा निश्चितरूपाने विकसित देशांनी निर्माण केलेला आहे. पण त्यावर उपाय म्हणून विकसनशील देशातील मध्यमवर्गीयाने मोटर वापरू नये असे म्हणणे कितपत योग्य आहे?
पाश्चिमात्य देशात मंदी आली तरी तिथली मोटारींची संख्या दर हजारी दहा होण्याची शक्यता दूरदूरवर नाही. विकसनशील देशांनी मात्र भविष्यातील धोका ओळखून, स्वत:वर मर्यादा घालण्याचा सल्ला अन्यायकारक आहे. अर्थात याचा अर्थ भारताचे मोटर वाहन धोरण आहे तसेच राहावे असा नसून त्यात बदल नक्कीच झाले पाहिजेत. प्रत्येक २+२ कुटुंबाला एकच मोटर व १८ वर्षीय व्यक्तीस एक दुचाकी बाळगण्याचा अधिकार असावा. प्रत्येक लायसन्सवर त्याच्याकडील स्वत:च्या मालकीच्या वाहनाची नोंद असावी. मोटार उद्योगांवर वार्षिक उत्पादनाबाबत बंधन असावे व स्वत:च्या देशात मागणी नाही म्हणून इथे मुक्काम टाकून बसलेल्या ऑटोमोबाइल कंपन्यांकडून अधिकच कर वसूल केला जावा.
भारतात आजही सार्वजनिक वाहनांनी प्रवास हा जिकिरीचाच आहे आणि त्यामुळेच किमान कुटुंबासोबत प्रवास करताना मोटार हवीशी वाटणे वाजवी आहे. जर खरोखरच खासगी वाहनांवर अंकुश ठेवायचा असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करणे सर्वात पहिली गरज आहे. ती झाल्यावरच भारतीयांना मोटारींचा मोह त्यागण्याचे आवाहन करण्यात हशील आहे.
माया भाटकर, चारकोप, मुंबई

‘ये ज़िंदगी’ची आणखी एक बाजू
‘नवी कथा ‘ये जिंदगी उसी की है’च्या संगीतरचनेची’ हे पत्र (९ जून) वाचले. १९७६ साली ‘रसरंग’ या सिनेसाप्ताहिकाने लता मंगेशकर विशेषांक काढला होता. यासाठी रसिकांकडून लता मंगेशकर यांची सवरेत्कृष्ट दहा गाणी कळविण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रसिकांच्या दृष्टीने या अलौकिक गायिकेने गायलेल्या हजारो गाण्यांतून फक्त दहा गाणी निवडायची हे मोठे अवघड काम होते. यामध्ये निवडलेल्या गाण्यांमध्ये सर्वाधिक पसंती ‘ये जिंदगी उसीकी है’ या गाण्याला मिळाली. १९८९ मध्ये लता मंगेशकर यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त एका मराठी दैनिकाने याच प्रकारची वाचकांची पसंती जाणून घेतली. १३ वर्षांनंतरही रसिकांनी पुन्हा ‘ये जिंदगी उसी की है’या गाण्यालाच भरभरून पसंती दिली. या गाण्याबद्दल काही नवीन गोष्टीही ऐकायला मिळाल्या. उदा. या गाण्याचे रेकॉर्डिग सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते. मात्र त्या वेळी ही चाल ७५ टक्के रोशनची, हा गौप्यस्फोट ऐकिवात आला नाही. १९७६ च्या त्या रसरंगमध्ये वसंत भालेकर यांचा लेख आहे व त्यामध्ये सी. रामचंद्र यांनी मत व्यक्त केले की, ‘ये जिंदगी उसीकी है’, आणि ‘धीरे से आजा रीे’ (अलबेला) ही दोन्ही गाणी अत्यंत कमी वेळात चाल लावून तयार झालेली आहेत. या मुलाखतीत अण्णा म्हणतात, ‘गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेल्या या दोन्ही गाण्यांच्या चाली दादर ते गोरेगाव या मोटारप्रवासात झाल्या. इतक्या कमी वेळात क्वचित गाणे झाले असेल आणि सर्वाधिक लोकप्रियता लाभली याच गाण्यांना!’
श्रीकांत देशपांडे, फलटण

असा केक कापायला नको होता!
ल्ल नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा दहावा वर्धापनदिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमधील एक कार्यक्रम म्हणजे ‘वर्धापनदिनाचा केक कापणे’! सुंदर केकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले घडय़ाळ पक्षाच्याच तिरंगी ध्वजाच्या पाश्र्वभूमीवर साकारण्यात आले होते आणि हाच केक अजित पवार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत, टाळ्यांच्या गजरात व पक्षाच्या जयघोषात कापला ही बाब मात्र मनाला खटकली. वाढदिवसानिमित्त यंदा ‘दख्खनच्या राणी’च्या प्रतिकृतीचा केक कापला नाही, ही बाब मनाला समाधान देऊन गेली. परंतु याच दिवशी ए. आर. रहमान यांनी एका वाद्याच्या प्रतिकृतीचा केक कापला, हे मनाला रुचले नाही. हे पाश्चात्त्यांचे अनुकरण आहे. ज्या कार्याचे सुयश चिंतन करायचे त्याच्याच प्रतिकृतीचा केक कापणे अयोग्य आहे.
राम तोरकडी, पुणे