Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

आघाडीची बिघाडी!
गणेश कस्तुरे

आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत विविध विकास कामांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षेएवढे मताधिक्य न मिळाल्याने भाजप नेत्यांच्या अपेक्षा बळावल्या आहेत.आंध्र प्रदेश राज्याच्या तसेच राज्यातील विदर्भाच्या सीमेवर असलेला किनवट तालुका. आदिवासी, लमाणी समाजाचे प्राबल्य असलेला हा भाग राज्यात नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.

कोमेजत चालले ‘कमळ’!
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपतील अंतर्गत कलहाने उसळी मारलेली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपला फटकारले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयाबाबत धरसोड करणाऱ्या भाजपने आता हिंदुत्वाला ‘रामराम’ करावा, असे बौद्धिक रा. स्व. संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी घेतले आहे. हिंदुत्वाचा खरा अर्थ जनतेपर्यंत पोहोचविण्यात भाजपला पूर्ण अपयश आले आहे. हिंदुत्वाची लाइन ठेवली तर आपल्याला सत्ता काबीज करता येणार नाही असा भाजपवाल्यांचा समज झाला असावा व तसे असल्यास त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेलेच बरे, असा टोलाही वैद्य यांनी लगावला आहे.

प्रधान समितीचा विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यावर ठपका - तावडे
मुंबई, १७ जून/प्रतिनिधी

राम प्रधान समितीचा अहवाल विधिमंडळात ठेवला असता तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या पदावर टाच आली असती, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील दोषी ठरले असते आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याला मदत करण्याकरिता बिल्डर चतुर्वेदीला अटक करणारे अनामी रॉय अडकले असते, असा आरोप भाजपचे सरचिटणीस व विधान परिषदेचे निलंबित सदस्य विनोद तावडे यांनी केला.

स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी स्थिती अनुकूल -देशमुख
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसला अनुकूल स्थिती असल्याचा दावा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे. ‘मला पक्षाची नव्हे तर, कार्यकर्त्यांची चिंता आहे; त्यांनी आणखी किती दिवस आमचा प्रचार करायचा’ असा सवालही विलासरावांनी केला. अकोल्याहून त्यांचे खाजगी विमानाने आज येथे आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना विलासराव देशमुख यांनी स्वबळावर लढण्याबाबत मांडलेल्या भूमिकेला उपस्थित समर्थकांनी दाद दिली.

‘हर्षवर्धन पाटील यांच्या भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात दाद मागणार’
मुंबई, १७ जून/प्रतिनिधी

महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री असताना हर्षवर्धन पाटील यांनी बालकाश्रम, अनाथाश्रम यांच्या वाटपात केलेल्या भ्रष्टाचाराचा विषय विधानसभेत उपस्थित करूनही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशी समिती नियुक्त केली नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी जाहीर केले.
बालकाश्रम, अनाथालय यांच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित केले तेव्हा विद्यमान मंत्री मदन पाटील यांनी हे प्रकरण आपण या खात्याचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीचे आहे, असे कबुल केले होते. तोच धागा पकडून कदम म्हणाले की, राज्य शासनातील एखादा मंत्री बालकाश्रम, बालसदन यामध्ये भ्रष्टाचार कसा करू शकतो. हा प्रश्न विरोधी पक्षाने चव्हाटय़ावर आणूनही सरकारने दखल घेतली नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या गैरव्यवहाराबाबत सरकारने समिती नियुक्त करायला हवी होती, असे भाजपचे गटनेते एकनाथ खडसे म्हणाले.