Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

मस्ती आणि गुर्मी सोडा
पदाधिकाऱ्यांना पवारांच्या कानपिचक्या
मुंबई, १७ जून / खास प्रतिनिधी
सहकार चळवळीतील नेत्यांची मस्ती आणि गुर्मी कमी झाली आणि पदाधिकाऱ्यांनी पुढील दोन-तीन महिन्यांत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला तरच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना आज दिल्या. ‘भाकरी फिरविली नाही करपते’, असे सूचक उद्गार काढत आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच काँग्रेसची इच्छा नसल्यास सर्व २८८ जागा लढविण्याची पक्षाची तयारी असल्याचेही पवार यांनी आज जाहीर केले.

तलाठय़ांच्या ‘सातबारा’च्या ‘अधिकारा’चे तीनतेरा !
धनंजय जाधव
पुणे, १७ जून

सातबारा उताऱ्यासाठी चिरीमिरी मागणाऱ्या तलाठय़ांपासून सामान्य जनतेची सुटका झाली असून, हस्तलिखित सातबारा उतारा देण्याचे तलाठय़ांचे अधिकार राज्य सरकारने गोठवले आहेत. महसुली गावांतील तलाठी कार्यालयात पहिल्या टप्प्यात याची अंमलबजावणी होणार आहे. या गावांत यापुढे संगणकीकृत सातबारा उतारे वितरित केले जाणार आहेत.
राज्यातील भूमिअभिलेखाचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. या प्रकल्पांतर्गत राज्यभरातील सुमारे २ कोटी ११ लाख सातबारा उताऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे.

मान्सून अजूनही दूरच
पुणे, १७ जून / खास प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे पावसाने तर दडी मारलेली आहेच, शिवाय त्याचाच परिणाम म्हणून राज्यभर उकाडय़ात प्रचंड वाढ झाली आहे. नागपूर येथे तर ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात तो ३७ अंशांवर स्थिर आहे. या आठवडय़ाच्या अखेपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नसल्याने उकाडा आणखी दोन-तीन दिवस तरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

सिद्धिविनायक मंदिराभोवतीची भिंत कायदेशीर
मुंबई, १७ जून/प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरास अतिरेकी हल्ल्यापासून धोका असल्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन मंदिराभोवती काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंदिराबाहेरच्या एस. के. बोले मार्ग या हमरस्त्याचा अर्धा भाग बंद करण्यास महापालिकेने दिलेली परवानगी कायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. मात्र मंदिरास असलेल्या धोक्याचा दरवर्षी आढावा घेतला जावा आणि जेव्हा हा धोका कमी होईल किंवा पूर्णपणे नाहीसा होईल तेव्हा संरक्षक भिंत हटवून रस्त्याचा बंद केलेला भाग पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्याचा महापालिकेने विचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.

सिद्धिविनायक मंदिरास असलेल्या धोक्याचा दरवर्षी आढावा
मुंबई, १७ जून/प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरास अतिरेकी हल्ल्यापासून धोका असल्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन मंदिराभोवती काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंदिराबाहेरच्या एस. के. बोले मार्ग या हमरस्त्याचा अर्धा भाग बंद करण्यास महापालिकेने दिलेली परवानगी कायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. मात्र मंदिरास असलेल्या धोक्याचा दरवर्षी आढावा घेतला जावा आणि जेव्हा हा धोका कमी होईल तेव्हा संरक्षक िभत हटवून रस्त्याचा बंद केलेला भाग पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्याचा महापालिकेने विचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.

कापसाच्या संशोधित स्वदेशी बियाण्याने शेतकऱ्यांना दिलासा !
समर खडस
मुंबई, १७ जून

भारतीय कृषी वैज्ञानिकांच्या संशोधनातून विकसित झालेले कापसाचे बिकानेरी नेर्मा बीटी आणि हायब्रिड एनएचएच- ४४ बीटी हे दोन अत्यंत स्वस्त बियाणे यंदाच्या खरीप हंगामासाठी तयार ठेवण्यात आली आहेत. पाच ते सात वर्षांपूर्वी मोन्सॅन्टो आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बीटी कापसाचे बियाणे बाजारात आणल्यावर ते देशातील कापूस उत्पादन क्षेत्रांतील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या कंपन्यांच्या बियाण्यांपेक्षा अवघ्या एक पंचमांश किंमतीला मिळणार असलेल्या अस्सल देशी बियाण्यांमुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

विंडीज दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’त नेहरा, नायर, मुरली विजय व बद्रीनाथ
नवी दिल्ली, १७ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न निवड समितीने केला असून सचिन, सेहवाग, झहीर यांच्या अनुपस्थितीत काही नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. दिल्लीचा आशीष नेहरा, मुंबईचा अभिषेक नायर, तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजय, एस. बद्रिनाथ यांची निवड या दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. भारतीय संघ या दौऱ्यात चार एकदिवसीय सामने खेळणार आहे. या नव्या चेहऱ्यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरीच्या आधारावर संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यात ३० वर्षीय आशीष नेहराचा समावेश आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या नेहराने आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप पाडली होती. २००५मध्ये तो एकदिवसीय लढत खेळला होता आणि त्यानंतर भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती. पण इरफान पठाण आणि दुखापतग्रस्त सुरेश रैनामुळे संघात जागा निर्माण झाली होती. त्यामुळे नेहराचा विचार होऊ शकला. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव एन. श्रीनिवासन यांनी आज या संघाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. श्रीनिवासन म्हणाले की, रैनाच्या अंगठय़ाला फ्रॅक्चर झालेले असल्यामुळे त्याला दोन आठवडय़ांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. झहीर आणि सचिनही विश्रांती घेत आहेत. सेहवागचा मात्र दुखापतीमुळे विचार केला गेला नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे सेहवाग ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नव्हता.

दहावीचा निकाल २५ जूनला
पुणे, १७ जून/खास प्रतिनिधी

दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली असून २५ जून रोजी राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य निश्चित होणार आहे! अकरावी प्रवेशाचे सूत्र, मुंबईतील ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया अशा अनेकविध वादांच्या पाश्र्वभूमीवर दहावीचा निकाल लांबणीवर पडल्याच्या वावडय़ा उठत होत्या. परंतु, प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षीपेक्षा एक दिवस अगोदरच निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्य सचिव तुकाराम सुपे यांनी दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली. गेली दोन वर्षे २६ जूनला निकाल जाहीर केला जात होता. यंदा मात्र तो २५ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. त्याच वेळी संकेतस्थळांवरूनही त्याचा तपशील उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचे पत्ते पुढील आठवडय़ात जाहीर केले जातील. शाळांमधून विद्यार्थ्यांना सकाळी अकरानंतर निकाल व गुणपत्रिका मिळतील. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक अशा आठ विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. १९ हजार २८७ शाळांमधील एकूण १६ लाख तीन हजार १४४ विद्यार्थी दहावीला बसले होते. त्यामध्ये आठ लाख ९६ हजार ७४८ मुले आणि सात लाख सहा हजार ३९६ मुलींचा समावेश होता. एकूण तीन हजार ६९३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ‘निकाल जाहीर करताना शासनाच्या धोरणानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाणार नसली, तरी मंडळाकडून देण्यात येणारे पुरस्कार व देणगीदारांचे पुरस्कार प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे मात्र जाहीर केली जाणार आहेत.’
‘गुणपडताळणीचे अर्ज करण्याची मुदत ६ जुलैपर्यंत असून विभागीय मंडळामध्ये त्यासाठीचा अर्ज व शुल्क आदींची माहिती मिळेल. ऑक्टोबरच्या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांमधून अर्ज करण्याची मुदत सहा जुलै असून विलंब शुल्कासह हे अर्ज १६ जुलैपर्यंत स्वीकारले जातील,’ असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.

२६/११ हल्ल्याची केद्रीय आयोगातर्फे चौकशीची मागणी
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

केंद्रीय आयोगाची स्थापना करून २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करावी आणि प्रधान समितीचा अहवाल जनतेसाठी सार्वजनिक करावा, अशी मागणी अवामी भारत या संघटनेने केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा देशावर झालेला मोठा आघात असून प्रधान समितीसारख्या एका समितीकडून याची संपूर्ण चौकशी होणे शक्य नाही. या हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानच नव्हे तर जगातील इतर शक्तींचाही हात आहे, अशी शंका या संघटनेचे फिरोज मिठीबोरवाला यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे, विशेषत: हेमंत करकरे यांचा मोबाईल कोठे आहे? त्यांना नियंत्रण कक्षाने मदत का नाही दिली ? असा सवाल मिठीबोरवाला यांनी विचारला आहे. अभिनव भारत या संघटनेची चौकशी करकरे यांनी केली होती. जगात फक्त मुस्लिमच नव्हे तर हिंदू संघटनाही दहशवादी कृत्य करीत आहेत, हे करकरे यांनी शोधून काढले. आता अभिनव भारत संघटनेच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी