Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

आरोग्य सेविका निलंबित; चौकशी समिती नियुक्त
तीनखेडा येथे लशीकरणानंतर बालिकेचा मृत्यू, सात गंभीर
सेवकाला कारणे दाखवा नोटीस १वाघोळा घटनेच्या पुनरावृत्तीमुळे खळबळ
जालना, १७ जून/वार्ताहर

साथीचे आजार होऊ नयेत म्हणून दिलेल्या लशीनंतर मंठा तालुक्यातील तीनखेडा येथे एका मुलीचा मृत्यू झाला व सात मुले गंभीर आजारी पडली. या प्रकारानंतर आरोग्य प्रशासन आज खडबडून जागे झाले. कंत्राटी तत्त्वावर सेवेत असणाऱ्या आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात आले असून, एका सेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीने आज तीनखेडय़ात जाऊन चौकशी केली.

नांदेडच्या महापौरांचा राजीनामा
राजदंड पळविण्याचा युतीच्या सदस्यांचा प्रयत्न
नांदेड, १७ जून/वार्ताहर

पक्षश्रेष्ठांच्या आदेशानुसार महापौर बलवंतसिंग गाडीवाले यांनी आज पदाचा राजीनामा आयुक्तांकडे दिला. उपमहापौर सरजितसिंग गिल यांनी सोमवारीच पदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला होता. गुरू-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त गाडीवाले व गिल यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी संपल्यानंतर या पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला होता. मुख्यमंत्री आदेश देतील तेव्हा राजीनामा देण्याची तयारी या दोघांनीही दर्शविली होती. मुख्यमंत्र्यांचा गेल्या सोमवारी आदेश आल्यानंतर श्री. गिल यांनी राजीनामा दिला. सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर करणे आवश्यक असल्याने श्री. गाडीवाले यांनी आजचा मुहूर्त काढला.

बियाणे महामंडळाच्या जमिनीवरील
६१ कुटुंबांची अतिक्रमणे काढली

उस्मानाबाद, १७ जून/वार्ताहर

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील बियाणे महामंडळाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या ६१ कुटुंबांना पोलिसांनी आज हुसकावून लावले. सरकारची पडीक जमीन वहिवाटीत आणल्याचा दावा करत या कुटुंबांनी अतिक्रमण केले होते.येरमाळा गावाजवळ बीज प्रक्रिया केंद्राची १२५ एकर जमीन आहे. ती बऱ्याच दिवसांपासून पडीक होती. कळंब तालुक्यात पारधी समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पडीक जमीन विकास कार्यक्रम हाती घेतला होता. विशेषत: सरकारी गायरान, सरकारच्या पडीक जमिनीवर अतिक्रमण करून जमीन कसून घ्या असा सल्ला कार्यकर्ते देत होते.

क्षीरसागर सहाव्यांदा नगराध्यक्ष
बीड, १७ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची पुढील अडीच वर्षासाठी आज बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तब्बल वीस वर्षापासून या पदावर काम करीत असलेले ते मराठवाडय़ातील एकमेव अध्यक्ष ठरले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सकाळी पालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी शोभा राऊत यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.

माझा औदुंबर
केव्हा, कुठल्या निमित्ताने कशाची आठवण होईल आणि कशाचा संदर्भ कशाशी लागेल हे सांगता येत नाही. आमच्या उंबरपट्टी शेतात एकूण तीन-चार झाडं उंबराची होती. त्यातील काही बाहत्तरच्या दुष्काळात गेली. काही अजूनही जीव धरून रानाचं नाव सार्थकी ठरवीत आहेत. या उंबरपट्टीत गेलं की, हमखास या जाणत्या झाडाच्या आठवणी उचंबळून आल्याशिवाय राहत नाहीत. त्यात ‘औदुंबर’ नावाची कविता अनेक अंगानं मी या आमच्या उंबराशी बेतून बघत असे. त्यात विहिरीकाठचा मोठा उंबर बाहत्तरच्या दुष्काळात विहिरीतच गडप झाला.

पोलीस आयुक्तही हतबल! मानसी देशपांडे खूनप्रकरण
औरंगाबाद, १७ जून/प्रतिनिधी

‘‘मानसी देशपांडे खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्व काही केले. आठ पथके नेमण्यात आली. वरिष्ठ अधिकारीही तपासाला लागले. पण अजूनही आमच्या हाती काहीच लागले नाही. तपासाला दिशा मिळाली नाही,’’ अशा शब्दांमध्ये पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी आज पत्रकारांशी बोलताना हतबलता व्यक्त केली. ‘हे पोलिसांचे अपयश आहे असे मुळीच नाही. वेळ लागेल पण आम्ही आरोपीपर्यंत नक्की पोहोचू’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पेरणी वाया गेल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड, १७ जून/वार्ताहर
धूळ पेरणी करून मृगाच्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील मांडवी येथील उत्तम सखाराम अंबेकर (वय ५०) यांना बँकेचे कर्ज होते. मृगाच्या पावसाच्या भरवशावर त्यांनी उसनवारी करून पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे महागडे बियाणे वाया गेले या चिंतेने त्यांना ग्रासले होते. कर्जाच्या ओझ्याच्या चिंतेने त्यांनी आज पहाटे शेतात गळफास घेतला. किनवट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मारहाण केल्यामुळेच कोठडीत कैद्याचा मृत्यू
बीड, १७ जून/वार्ताहर

जिल्हा कारागृहातील कैदी नामदेव साबळे याचा मृत्यू मारहाणीने झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माजलगाव येथील अशोकनगर भागात राहणाऱ्या नामदेव वैजीनाथ साबळे (वय ४०) याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश माजलगावच्या न्यायाधीशांनी १५ मार्चला दिला. त्यानुसार त्याला बीड येथील जिल्हा कारागृहातील तिसऱ्या क्रमांकाच्या कोठडीत ठेवण्यात आले. त्याचा दि. २८ मार्चला सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी त्यावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे औरंगाबाद येथे गुप्ततेत साबळेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

धारूर नगराध्यक्षपदी गोदावरी शिरसाट
धारूर, १७ जून/वार्ताहर

धारूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोदावरी लक्ष्मण शिरसाट यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना १७ पैकी ११ मते मिळाली.
येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोदावरी लक्ष्मण सिरसाट व भाजपकडून धर्मराज वैरागे यांचे अध्यक्षपदासाठी अर्ज होते. आज सकाळी झालेल्या मतदानात गोदावरी शिरसाट यांना ११ मते मिळाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, काँग्रेस आय २, शिवसेनेच्या एका उमेदवाराने मतदान केले. धर्मराज वैरागे यांना फक्त सहा मते मिळाली. निवडणूक अधिकारी पी. जे. वागतकर यांनी गोदावरी शिरसाट विजयी झाल्याचे घोषित केले.

गवसिया बेगम यांचे निधन
बीड, १७ जून/वार्ताहर
गवसिया बेगम खलील अहेमद यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. पत्रकार शेख रिजवान त्यांचे चिरंजीव होत. गवसिया बेगम गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सायंकाळी तकीया मशीद परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय रत्नागिरे यांचे निधन
बिलोली, १७ जून/वार्ताहर
कुंडलवाडी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते संजय नागनाथराव रत्नागिरे यांचे अलीकडेच मेंदूज्वराने निधन झाले. ते ४१ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. संजय रत्नागिरे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, शांत व संयमी होता. अंत्यसंस्कारास विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते.

चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बीड, १७ जून/वार्ताहर

चारचाकी गाडय़ा चोरून त्यांचे टायर, बॅटऱ्या व इतर साहित्यांची चोरी करण्याची आठवडय़ात दुसरी घटना उघडकीस आली आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
बीड शहरात आठ दिवसांपूर्वीच शहरातील दुग्गड बंधू यांच्या मालकीचा ट्रकमधील टायर, बॅटरी व इतर साहित्य चोरण्यात आले होते. तर मंगळवारी सायंकाळी शेख सलाउद्दीन यांच्या मालकीचा वाळूवर चालणारा ट्रक (क्र. एमसीए-२४५७) रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी पळविला आणि तो इटकूर गावात नेला. सकाळी चाके काढून ठेवलेल्या अवस्थेतील ट्रक रस्त्यावर असल्याचे सरपंच दत्तात्रेय गुंजाळ यांनी सांगितले. त्यावरून शेख सलाउद्दील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीच्या वादातून एकाचा खून
हिंगोली, १७ जून/वार्ताहर

तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील पंडिता किसन मुटकुळे याचा शेतवाटणीच्या वादातून काल रात्री खून झाला. मृताची पत्नी शांताबाई पंडिता मुटकुळे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी बबन किसन मुटकळे (मयताचा भाऊ) महादा रामजी गाडे, सुमित्राबाई बबन मुटकुळे व पांडुरंग बबन मुटकुळे यांनी संगनमत करून आपल्या पतीचा खून केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न
जळकोट, १७ जून/वार्ताहर

भरवस्तीत जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या प्रश्नंगणात असलेले उप टपाल कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न मध्यरात्री झाला. पण चोरांना तिजोरी फोडता आली नाही. सब पोस्टमास्तर बी. एच. आलापुरे काम संपवून काल सायंकाळी कार्यालय बंद करून गेले. आज सकाळी कार्यालयात आल्यावर त्यांना दोन्ही दरवाजे तोडल्याचे आढळून आले. भिंतीमध्ये असलेली तिजोरीही बांधकाम फोडून जमिनीवर टाकल्याचे निदर्शनास आले. अनय एक बंद कपाटही चोरटय़ांनी फोडले आहे. पण त्यातील काय काय चोरीस गेले हे मात्र पंचनामा सुरू असल्याने कळू शकले नाही.उमरगा येथील डाकघर उपनिरीक्षक एम. एम. पाटील यांनी कार्यालयाला भेट देऊन पंचनामा केला.

भाजपचे धरणे आंदोलन
औरंगाबाद, १७ जून/खास प्रतिनिधी

विधी मंडळात राम प्रधान अहवाल सादर न केल्यामुळे विधान परिषदेतील भाजपचे आमदार विनोद तावडे, शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते व अरविंद सावंत यांना निलंबित करण्यात आले. हे निलंबन रद्द व्हावे आणि अहवाल जनतेसमोर यावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी गुलमंडी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. निलंबन रद्द करण्याच्या निषेधार्थ राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. महापौर विजया रहाटकर, सरचिटणीस बापू घडामोडे, अनिल मकरिये, दिलीप थोरात, भाऊसाहेब ताठे, समीर राजूरकर, राजू बागडे, रेखा पाटील आणि सखाराम पोळ, साधना सुरडकर, संतोष पाटील, अनिल खंडाळकर आदींसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते.

दुचाकीच्या डिकीतून कर्जाची रक्कम पळविली
औरंगाबाद, १७ जून /प्रतिनिधी
बँकेतून कर्ज काढल्यानंतर ती रक्कम घेऊन घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती पळविण्यात आल्याची घटना काल दुपारी जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ही रक्कम १ लाख ४३ हजार ४०० रुपये इतकी आहे. अख्तरखान हुसेनखान (वय ४७, रा. संजीवनी अपार्टमेंट, बेगमपुरा) या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी बॉम्बे मर्कंटाईल बँकेकडून कर्ज काढले होते. कालच त्यांना ही रक्कम मिळाली. ही रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. घरी परतत असताना कटकटगेट येथील अलमोमीन शाळेच्या मुख्याध्यापिका अजगरी बेगम यांना भेटण्यासाठी शाळेत गेले. दुचाकी शाळेसमोर उभी करण्यात आलेली होती. ते शाळेत अर्धा तास होते. बाहेर आले तेव्हा दुचाकीच्या डिक्कीतून रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

गाईने शिंग मारल्यामुळे मृत्यू
औरंगाबाद, १७ जून /प्रतिनिधी

चारा टाकत असताना गायीने शिंग मारल्यामुळे गाजगाव (ता. वैजापूर) येथील शेतकरी दत्तू आसाराम हिवाळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.

बाबासाहेब दिवेकर एमएच-सीईटीमध्ये राज्यात चौथा
औरंगाबाद, १७ जून/खास प्रतिनिधी

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवछत्रपती महाविद्यालयाचा बाबासाहेब दिवेकर याने एमएच-सीईटी परीक्षेत २०० पैकी १८७ गुण मिळवून मागासवर्गीयांतून औरंगाबाद विभागात दुसरा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविण्याचा मान प्रश्नप्त केला. या शिवछत्रपती महाविद्यालयातील एमएच-सीईटी परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रश्नचार्य डॉ. बलभीमराज गोरे, माजी प्रश्नचार्य एम. के. बागुल, उपप्रश्नचार्य अनिल अर्दड, उपप्रश्नचार्या डॉ. सुनीता शिनगारे आदी उपस्थित होते. देवेन दिनकर देशपाडे, ललित भिसे, सचिन देवगुडे, गजानन नव्हाट, हर्षद बजाज, शंतनु पवार, विजय थोरात, मयुर पाटील, धनश्री मोरे, वरदसिंह परदेशी, देवकी जोशी, निखिल दलाल, श्वेता नायर, राहुल वर्मा, अभिजीत पेशकर, गौरव सोळंके या गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

संगणकाची दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्य़ाने तरुणाचा मृत्यू
लातूर, १७ जून/वार्ताहर

संगणकाची दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून सचिन नागोराव कुंभार (वय २३) मृत्युमुखी पडला. काल ही दुर्घटना झाली. प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत प्रश्न. डॉ. नागोराव कुंभार यांचा तो मुलगा होय. औसा हनुमान चौक येथे सचिनचे संगणक दुरुस्तीचे दुकान आहे. काल, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज आल्याने विजेचा धक्का बसून तो जागीच कोसळला. त्याच्यावर आज सकाळी १० वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसमतमध्ये प्रथमच नगराध्यक्ष, उपनगराध्यपदी महिला विराजमान
वसमत, १७ जून /वार्ताहर

नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसच्या मनीषा कडतन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदिराबाई साखरे यांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्या दोघीही दुसऱ्यांदा नगरसेवकपद सांभाळत आहे. त्यांना नगरसेवकपदाचा अनुभव आहे. नवीन महिला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या कामाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सभापतिपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने शुक्रवारी
नांदेड, १७ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातील तालुका पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण, सोडत पद्धतीने करण्यासाठी शुक्रवारी (दि. १९) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वह्य़ांच्या दरात वाढ
लोहा, १७ जून/वार्ताहर

चांगल्या प्रतीच्या वह्य़ा खरेदी करण्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वह्य़ांचे दर १० ते १५ टक्क्य़ांनी वाढले आहेत. चांगल्या व दर्जेदार वह्य़ांना जास्त मागणी आहे. १० रुपयांपासून ५०-६० रुपयांपर्यंत एका वहीची किंमत आहे. नवनीत, क्लासमेट, गोल्ड आदी कंपन्यांच्या वह्य़ांना जास्तीची मागणी आहे. कंपास, पाण्याची बाटली, खाऊचे डबे यांना जास्तीची मागणी आहे, असे पंकज कलेक्शनचे मोटरवार यांनी सांगितले. पाठय़पुस्तके शाळेतून मिळत असल्याने केवळ पाच टक्के इतकीच पाठय़पुस्तकांना मागणी आहे; परंतु गाईडचा खप वाढत आहे. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतच्या पाण्याच्या बाटल्या, तर ९० रुपयांपर्यंत लहान मुलांच्या खाऊचे डबे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. वरील साहित्य असलेल्या दुकानांत पालकांची, विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

उसासाठी उधारीने रासायनिक खत पुरवठा योजना
लातूर, १७ जून/वार्ताहर
विकास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोंद असलेल्या नवीन लागवड व खोडवा ऊस क्षेत्राकरिता रासायनिक खताचा उधारीने पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अमित देशमुख यांनी केले आहे.
विकास सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांसाठी ऊस विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. गळीत हंगाम २००९-१० करिता कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उसासाठी डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) व म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) उधारीने पुरवठा करण्याची योजना आखली आहे. रासायनिक खताच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवण्यासाठी ही योजना आखली आहे. या योजनेतून हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंतची डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) सात पोते व म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) सात पोते उधारीने सभासदांना पुरवठा करण्यात येत आहे.

शिक्षकांनी विश्वासार्हता वाढवावी - डॉ. शोभना जोशी
अंबाजोगाई, १७ जून/वार्ताहर

‘सांप्रत परिस्थितीत शिक्षकांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे शिक्षकाने आपल्या विषयाचे मूलभूत व अद्ययावत ज्ञान प्रश्नप्त करून प्रभावी अध्यापनासोबतच नितीमूल्य जोपासावीत व समाजाची विश्वासार्हता वाढवावी,’ असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. शोभना जोशी यांनी केले. विद्यापीठाच्या सेवांतर्गत सुट्टीतील एम. एड.च्या द्वितीय सत्राच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय समारोपात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गणेश शेटकर, ‘माईर’च्या अंबाजोगाई शाखेचे संचालक बी. डी. मुंडे, डॉ. श्रीमती पी. पी. गिरगावकर, सरस्वती अध्यापक महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. राजेश यादव, राजर्षी शाहू अध्यापक महाविद्यालयाचे प्रश्नचार्य, अभ्यासकेंद्र प्रमुख आर. एस. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जोशी यांनी शिक्षकांनी सामान्य विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित कसे करावे, हे सांगून मूल्यशिक्षण व पर्यावरण शिक्षण कृतीतून व उपक्रमातून कसे द्यावे, याचे मार्गदर्शन केले.

नियमबाह्य़ वाळू उपसा बंद करण्याची मागणी
बिलोली, १७ जून /वार्ताहर

बोळेगाव येथे मांजरा नदीतून रात्रीच्या वेळी नियमबाह्य़ पद्धतीने वाळूचे उत्खनन करण्यात येते. ते बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोळेगाव रेती उपसा केंद्रातून अनेक दिवसांपासून नियमबाह्य़ रेती उत्खनन होत आहे. नियमबाह्य़ रेती उत्खननाबद्दल तहसीलदार बी. डी. आत्राम यांनी कंत्राटदारास आठ लाख रुपये दंड केला. त्यापैकी चार लाख कंत्राटदाराने भरले. उर्वरित रकमेबद्दल कंत्राटदारावर कुठलीच कारवाई केली नाही. प्रशासनाने तीन फुटापर्यंत वाळू काढण्याची सूचना देऊही नदीपात्रात दहा ते बारा फुटापर्यंत रेती उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावच्या पाणीटंचाईत वाढ होत आहे. भविष्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता येथील रेती उपसा बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वैभव खांडेकर, आनंद गुडमलवार, लक्ष्मण शेट्टीवार, सादिक पटेल, माधव चंचलवाड यांनी केली आहे.

हमाल, कष्टकरी १ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार
औरंगाबाद, १७ जून/खास प्रतिनिधी
मोंढा हमालांची १९ महिन्यांची पगारवाढीची थकबाकी, माथाडी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखानदार मालकांवर कठोर कारवाई करावी, कमी करण्यात आलेल्या माथाडी कामगारांना त्वरित कामावर घ्यावे, या मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल कष्टकऱ्यांनी निदर्शने केली. याची अंमलबजावणी झाली नाही तर येत्या १ जुलैपासून हमाल माथाडी कामगार बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ही निदर्शने राज्य हमाल माथाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे आणि संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रवीण वाघ यांच्या नेतृत्वाखाली झाली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार हेमा वांगीकर यांना देण्यात आले. या निदर्शनामध्ये देवीदास कीर्तीशाही, शंकरअण्णा गडपकर, कचराबाई कांबळे, शेख रफीक, प्रवीण सरकटे आदी सहभागी झाले होते.