Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मस्ती आणि गुर्मी सोडा
पदाधिकाऱ्यांना पवारांच्या कानपिचक्या
मुंबई, १७ जून / खास प्रतिनिधी

 

सहकार चळवळीतील नेत्यांची मस्ती आणि गुर्मी कमी झाली आणि पदाधिकाऱ्यांनी पुढील दोन-तीन महिन्यांत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला तरच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना आज दिल्या. ‘भाकरी फिरविली नाही करपते’, असे सूचक उद्गार काढत आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच काँग्रेसची इच्छा नसल्यास सर्व २८८ जागा लढविण्याची पक्षाची तयारी असल्याचेही पवार यांनी आज जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर पवारांनी पक्षाचे मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्षांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजिली होती. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास आधी वागणूक सुधारा, अशी कानउघाडणी पवारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाचे विश्लेषण करताना पवारांनी, पक्षाच्या नेत्यांचा शेवटच्या माणसापर्यंत संपर्कच राहिलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शेवटच्या माणसापर्यंत पोहचलात व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तरच त्यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. सहकार चळवळ, बँका, कारखाने आपल्या ताब्यात असल्याने तेथील मतदार आपल्याच पाठीशी राहतील, या भ्रमात नेतेमंडळी राहिली, असे पक्षाच्या लोकसभेतील अपयशाचे विश्लेषण करताना पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवले. सहकारी चळवळीतील संचालक आणि सभासदांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. सभासदांचे मोर्चे निघू लागले आहेत. कारखान्यांवर सभासदांकडून दगडफेक का होते, याचा विचार सहकार चळवळीतील धुरीणांनी करावा, असा टोला लगावत सहकार चळवळीचे जाळे आपल्याकडे असले तरी या जाळ्यात आपणच अडकायचे का, असा खडा सवाल पवारांनी केला.
काँग्रेसमध्ये सर्व निर्णय नवी दिल्लीतून होतात, याउलट राष्ट्रवादीत जिल्हा किंवा तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जास्तच अधिकार दिल्याने त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. ठराविक लोकांनाच उमेदवारी, पदे दिली जाऊ लागली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाच्या आमदारांना बदनाम करून त्यांचा पत्ता कापण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. हे सर्व थांबले पाहिजे, असेही पवारांनी बजावले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा काँग्रेसला फायदा झाला, पण कृषी खाते आपल्याकडे असतानाही राज्यात त्याचा पक्षाला फायदा करून घेता न आल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. शेतीचा चेहरा बदलला, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रचारात सांगितले होते. त्याचा पंजाबसह अन्य राज्यांमध्ये काँग्रेसला फायदा झाला. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीचा मुद्दा पक्षाला व्यवस्थितपणे मांडता आला नाही. लाखोंचे मेळावे घेऊन सात बारा कोरा केल्याचे दावे आपल्याकडून केले गेले. पण थोडय़ाच दिवसांमध्ये वसुलीसाठी नोटीसा आल्या. यामुळे लोकांमध्ये राष्ट्रवादीबद्दल चीड निर्माण झाली व त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले, असे पवार म्हणाले. यापासून धडा घेऊन दलित, इतर मागासवर्गीयांच्या थकबाकी माफ करण्यात आलेल्या निर्णयाचा परिणामकारक प्रचार करा, असे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

‘डान्स बार आणि मटके बंद केल्याने पक्षाचे नुकसान’ !
राष्ट्रवादी काँगेसच्या या बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार, मटके बंद केल्याने मटकेवाले व दोन नंबरवाले राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याचे सांगताच उपस्थितांनी जोरदार ओरड करून ढोबळे यांना गप्प बसविले.