Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सून अजूनही दूरच
पुणे, १७ जून / खास प्रतिनिधी

 

मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे पावसाने तर दडी मारलेली आहेच, शिवाय त्याचाच परिणाम म्हणून राज्यभर उकाडय़ात प्रचंड वाढ झाली आहे. नागपूर येथे तर ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात तो ३७ अंशांवर स्थिर आहे. या आठवडय़ाच्या अखेपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नसल्याने उकाडा आणखी दोन-तीन दिवस तरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे उकाडा वाढला आहे, त्याचबरोबर निरभ्र असणारे आकाश, उत्तरेकडून येणारे उष्ण व कोरडे वारे आणि हवेतील आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे उकाडय़ात मोठी वाढ झाली आहे, असे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. राज्यात बहुतांश ठिकाणी नोंदवले जाणारे तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते सात अंशांनी अधिक आहे. नागपूर येथे आज दुपारी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा आकडा सरासरीच्या तुलनेत तब्बल सहा अंशांनी जास्त आहे. थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथेसुद्धा तापमान सरासरीपेक्षा सात अंशांनी जास्त आहे. राज्यात इतरत्र नोंदवले गेलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात त्याची सरासरीशी तुलना दिली आहे)- मुंबई ३५.९ (४), अलिबाग ३६.३ (५), रत्नागिरी ३३.५ (३), महाबळेश्वर २९.३ (७), पुणे ३७ (५), सांगली ३४.५ (४), सातारा ३६, कोल्हापूर ३२.४ (२), सोलापूर ३९ (४), नाशिक ३७.१ (४), जळगाव ४१ (३), औरंगाबाद ३९.२ (४), परभणी ४२ (५), अकोला ४२.३ (५).
या वाढलेल्या उकाडय़ामुळे सध्या उन्हाळा सुरू आहे की काय अशीच शंका येत आहे. मुंबईपासून ते नागपूपर्यंत सर्वच हीच स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील उकाडा कायम राहणार आहेच. शिवाय विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्वेकडील भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग तसेच ओरिसा, बिहार व झारखंडमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लवकर तरी उकाडय़ापासून दिलासा मिळणार नसल्याचीच चिन्हे आहेत.
आता लक्ष बंगालच्या उपसागराकडे
बंगालच्या उपसागरात येत्या २० तारखेनंतर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता असल्याने आता सर्व हवामानअभ्यासकांचे लक्ष बंगालच्या उपसागराकडेच लागले आहे. तिथे होणाऱ्या हवामानाच्या बदलांच्या सखोल नोंदी ठेवल्या जात आहेत. मात्र, या कमी दाबाच्या क्षेत्राबाबत अजूनही नेमकेपणाने काही सांगता येत नाही. त्याची तीव्रता किती असेल व त्यामुळे पाऊस किती पडेल, याचे नेमके चित्र एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.