Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कापसाच्या संशोधित स्वदेशी बियाण्याने शेतकऱ्यांना दिलासा !
समर खडस
मुंबई, १७ जून

 

भारतीय कृषी वैज्ञानिकांच्या संशोधनातून विकसित झालेले कापसाचे बिकानेरी नेर्मा बीटी आणि हायब्रिड एनएचएच- ४४ बीटी हे दोन अत्यंत स्वस्त बियाणे यंदाच्या खरीप हंगामासाठी तयार ठेवण्यात आली आहेत. पाच ते सात वर्षांपूर्वी मोन्सॅन्टो आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बीटी कापसाचे बियाणे बाजारात आणल्यावर ते देशातील कापूस उत्पादन क्षेत्रांतील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या कंपन्यांच्या बियाण्यांपेक्षा अवघ्या एक पंचमांश किंमतीला मिळणार असलेल्या अस्सल देशी बियाण्यांमुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना या बियाण्याच्या प्रसाराविषयी व त्याच्या विक्रीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, एखादे नवे बियाणे किंवा कृषी क्षेत्रातील कुठल्याही नव्या शोधाचे सार्वत्रिकरण करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीची परवानगी घ्यावी लागते. एकदा परवानगी घेतली की, कृषी खात्याचे काम फारसे उरत नाही. कृषी मंत्रालय फक्त कुठल्या भागात कुठले पीक घ्यावे व त्याचे किती बियाणे उपलब्ध आहे, याची माहिती राज्य सरकारांना देते. त्यामुळे या बियाण्याबाबतही केंद्रीय बियाणे महामंडळच निर्णय घेईल. अनेकदा मार्केटिंगसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीसंदर्भात खाजगी कंपन्यांचीही मदत घेतली जाते.
कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, या नवीन बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा याकरिता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना या स्वस्त बियाण्यांमुळे दिलासा मिळू शकेल.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक सौरभ विजय यांनी सांगितले की, बीटी कापसाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे यंदा सार्वजनिक उपक्रमाद्वारे बीटी कापसाची जात तयार करून विक्री व प्रसारासाठी ठेवण्यात आली आहे. सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर कॉटन रिसर्च या नागपूर व युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्स, धारवाड, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी, नवी दिल्ली या संस्थांनी संयुक्तपणे बिकानेरी नेर्मा ही जात विकसित केली आहे. क्राय- १एसी या गुणसूत्राचा वापर करून ही जात विकसित करण्यात आली असून सार्वजनिक उपक्रमाने गुणसूत्रात फेरबदल करून (जेनेटिकली मॉडिफाईड)विकसित केलेली ही पहिलीच जात आहे. या नव्या कापसाच्या जातीवरही बोंड अळीचा परिणाम होत नाही. बोंड अळी या रोगामुळे त्रस्त शेतकऱ्यांनीच सुरुवातील बीटी कापसाला आपली पसंती दर्शविली होती. मात्र कालांतराने या कापसाच्या विविधस्तरीय दुष्परिणामांवर देशभरातील अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी झोड उठवली होती. तसेच हे बियाणे बहुराष्ट्रीय कंपनीच्या ताब्यात असल्याने दरवर्षी या बियाण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच बहुराष्ट्रीय कंपनीवरच अवलंबून राहावे लागते. पण सीआयसीआरने विकसित केलेल्या जातीत शेतकऱ्यांचे परावलंबित्व संपेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दोन किलोच्या १० हजार पिशव्या सीआयसीआर, नागपूरकडून पुरविण्यात आल्या आहेत. या एका पिशवीची किंमत २०० रुपये आहे. तसेच हायब्रीड एनएचएच-४४ बीटीच्या प्रत्येकी ७५० ग्रॅमच्या १६०० पिशव्या पुरविण्यात आल्या असून त्याची किंमत ४०० रुपये आहे. तसेच एमएसएससीतर्फे या बीटी कापसाच्या पिशवीबरोबर तुरीची २०० ग्रॅमची पिशवी मोफत देण्यात येणार आहे.
बीटी कापसाच्या या भारतीय बियाण्याचा प्रसार हा आता सर्वात महत्त्वाचा भाग ठरणार आहे. कारण मोन्सॅन्टोसारख्या कंपन्याच या क्षेत्रात असून प्रचंड श्रीमंत असणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपन्याशी स्पर्धा करत या नव्या बियाण्यांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करावा लागणार आहे.