Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

प्रादेशिक

म्हाडा उच्चपदस्थांच्या ‘गृहस्वप्ना’तील घोटाळ्यावर अग्रवाल समितीचेही शिक्कामोर्तब
मुख्य अधिकारी, सोसायटी सदस्यांवर ठपका
निशांत सरवणकर
मुंबई, १७ जून

म्हाडातील उच्चपदस्थांनी मोक्याच्या ठिकाणी मिळविलेल्या भूखंडावर ‘गृहस्वप्न’ ही सोसायटी उभारल्यानंतर २.४ इतका एफएसआय घेऊन घोटाळा केल्याच्या निष्कर्षांवर या प्रकरणी चौकशी करणाऱ्या बी. के. अग्रवाल समितीनेही शिक्कामोर्तब केले आहे. या समितीच्या अहवालात या सोसायटीसह आणखी १३ सोसायटय़ांनाही अशा रीतीने ज्यादा एफएसआय दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्रुटींबाबत प्रश्नचिन्ह कायम
वनाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणास पत्र
रेश्मा जठार
मुंबई, १७ जून

चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत राखीव वनक्षेत्रातील बहुचर्चित प्रस्तावित खाण प्रकल्पाला मान्यता देण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास व्हावा, अशी मागणी या प्रकल्पाशी संबंधित तत्कालीन प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकल्पाबाबत कंपनीने केलेल्या एन्व्हॉयरोन्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट अहवालातील त्रुटींबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच, प्रकल्पाशी संबंधित इतरही त्रोटक बाबी वनाधिकाऱ्यांच्या पत्राने उजेडात आल्या आहेत.

‘श्री स्वामी समर्थ’ व ‘ॐ’ लिहिणे अपात्रतेचा निकष नाही
रेल्वेच्या दोन कारकुनांना अखेर बढती !
मुंबई, १७ जून/प्रतिनिधी
कारकुनांमधून बढतीने कार्यालय अधीक्षकाची (वर्ग २) ६९ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर ‘श्री स्वामी समर्थ’ व ‘ॐ’ असे आध्यात्मिक शब्द लिहिलेल्या दोन महिला कारकुनांना निवडीसाठी विचारातही न घेण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) बेकायदा ठरवून रद्द केला असून या दोघींनाही कार्यालय अधीक्षकपदी बढती देण्याचा आदेश दिला आहे.

पुण्यातील जमीन बळकाव प्रकरणी प्रदेश काँग्रेसने मानकर यांच्याबाबत अहवाल मागविला
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

पुण्यातील प्रसिद्ध नातूवाडय़ाची जमीन मिळवून देण्यासाठी बिल्डरला मदत करणारे लँण्डमाफिया असलेले काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या विरोधात तक्रार आल्याने त्याबाबत प्रदेश काँग्रेसने स्थानिक नेत्यांकडून अहवाल मागविला आहे. मानकर यांनी धमकावून जबरदस्ती केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरोधात निश्चितच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सिंहगड एज्यु. सोसायटीची ३० एकर जमीन
वन आणि महसूल खात्यांच्या परस्परविरोधी भूमिका !
अजित गोगटे
मुंबई, १७ जून

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे साम्राज्य ज्या सुमारे १५ हेक्टर जमिनीवर उभे आहे ती डोंगरमाथ्यावरील ‘वनजमीन’ असल्याने कायद्यानुसार ३४ वर्षांपूर्वीच शासनजमा झाली आहे का आणि त्यावर सोसायटीने केलेली सुमारे ५२ कोटी रुपयांची बांधकामे ही ‘वनेतर’ कामे असल्याने ती पाडून टाकण्यास पात्र आहेत का याविषयी महाराष्ट्र शासनाच्या वन आणि महसूल या दोन खात्यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याचे मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणात उघड झाले असून यापैकी कोणाची भूमिका बरोबर हे तपासून पाहण्याचे न्यायालयाने ठरविले आहे.

पतसंस्थेवरील वर्चस्वासाठी कम्युनिस्टांविरोधात काँग्रेस, सेना युती
रेल्वे कर्मचारी सोसायटीचे आज मतदान

मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

आशियातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक उद्या गुरुवारी होणार आहे. या पतसंस्थेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी कम्युनिस्टप्रणित नॅशनल रेल्वे मजदूर युनियनची (एनआरएमयू) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ते मोडून ‘परिवर्तन’ आणण्यासाठी कॉँग्रेसप्रणित सेंट्रल रेल्वे मजदूर संघ व शिवसेनेची रेल कामगार सेनेने एकत्रित ‘आघाडी’ केली आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

पिंटू सिंगला २४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या वाहनचालकावर गोळ्या झाडणारा आरोपी पिंटू सिंग याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज पनवेल न्यायालयाने दिले.उत्तर प्रदेश पोलिसांकडून काल पिंटू सिंग याला सीबीआयने ताब्यात घेतले होते व त्याला आज पनवेल न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याला २४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

बेस्ट-रिक्षा अपघातात एक ठार २ जखमी
मुंबई १७ जून / प्रतिनिधी

मुलुंड येथील कामगार हॉस्पिटलच्या सिग्नल जवळ आज रात्री बेस्टने एका रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत जया करिया(४५) जागीच ठार झाली तर रुक्मिनी ठक्कर ही महिला जखमी असून तिच्यावर वोखार्ड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात रिक्षा चालकही जखमी असून त्यांना मुलुंडच्या जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘जेट’च्या भाडय़ात ४०० रुपयांची वाढ
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

जेट एअरवेज या विमान कंपनीने तिकिटांवरील इंधन अधिभारामध्ये ४०० रुपयांची वाढ केली आहे. परिणामी आजपासून जेट एअरवेजच्या विमानांतून प्रवास महागला असून, इतर विमान कंपन्यांकडूनही हेच पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापासून एअर टब्र्यूलन्स फ्युअलमध्ये (एटीएफ) झालेल्या ३३ टक्क्यांच्या वाढीमुळे ही वाढ करण्यात आली आहे. परिणामी प्रति तिकीट इंधन अधिभार ३४०० रुपये इतका झाला आहे. ही जेट लाईट आणि जेट एअरवेज कनेक्ट या उपकंपन्यांसाठीही लागू असेल, अशी माहिती जेटच्या प्रवक्त्याने दिली.

चिनॉय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी ‘अंधेरी बंद’चा इशारा
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

चिनॉय व एमव्हीएलयू महाविद्यालयात अकरावी तसेच तेरावीच्या प्रवेश प्रक्रियेत व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात आहे. सरकार व व्यवस्थापन यांच्या संगनमतानेच प्रवेश प्रक्रिया राबविली जात नसल्याचा आरोप करून विविध राजकिय पक्षांनी अंधेरी बंदचा इशारा दिला आहे. महाविद्यालयात आज ‘एमव्हीएलयू व चिनॉय महाविद्यालय बचाव कृती समिती’च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, भाजपा, मनसे, माकप या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह हजारो विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. या आंदोलनानंतरही राज्य सरकारने व्यवस्थापनाच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकाराची सरकारने दखल घेतली नाही, तर ‘अंधेरी बंद’चा इशारा संघटनेने दिला आहे.

एमयूटीपी लोकलच्या महिला डब्यांवर आता सुधारित स्टिकर्स
मुंबई, १७ जून / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेने महिला डब्यांवरील स्टिकर्स बदलण्यास सुरुवात केली आहे. महिला प्रवाशांनी एसएमएसमार्फत केलेल्या सूचनेआधारे प. रे.ने हे पाऊल उचलले आहे. सध्या केवळ एका लोकलंवर ही सुधारित स्टिकर्स लावण्यात आली आहेत. ही स्टिकर्स अधिक ठळक आणि उठावदार असतील. बराच काळ ती खराब होणार नाहीत. या स्टिकसची उपयुक्तता लक्षात घेऊन कालांतराने ते अन्य लोकलवरही लावण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.