Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मिठी नदीच्या दरुगधीवर ‘अमेरिकी ऑक्सिजन’चा उतारा
विकास महाडिक

मुंबईच्या कुशीतून कधीकाळी संथगतीने वाहणाऱ्या मिठी नदीचे पाणी पुन्हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न

 

एमएमआरडीए करणार असून या नदीतील पाणी शुध्द करताना परिसरातील दरुगधीही दूर होईल यासाठी पर्यावरणावर काम करणाऱ्या अमेरिकेतील एका प्रथितयश कंपनीला आमंत्रण देण्यात आले आहे. तसा प्रस्ताव या संस्थेकडे पाठविण्यात आला आहे, असे एमएमआरडीमधील सूत्रांनी सांगितले.
एकेकाळी मुंबईची शान असलेल्या मिठी नदीचे रुपांतर घाण वाहून नेणाऱ्या नाल्यात कधी झाले हे मुंबईकरांनाही कळले नाही. या नदीचे पात्र अरुंद झाल्याने चार वर्षंपूर्वी २६ जुलैची आपत्ती मुंबईकरांवर ओढवली होती. त्या नदीला गतवैभव प्रश्नप्त करुन देण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करीत आहे. २६ जुलैनंतर या नदीकडे मुंबईतील सर्वच स्वायत्त संस्थांनी गांभीर्याने पाहण्यास सुरवात केली आहे. एमएमआरडीएच्या अखात्यारित या नदीच्या एकूण १८ कि.मी लांबीपैकी सहा कि. मी लांबीचा भाग येत आहे. त्यामुळे या भागाचे उत्तरदायित्व एमएमआरडीएकडे आहे. या भागातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून काही ठिकाणी स्थापत्त्य कामे देखील करण्यात आली आहेत आता एमएमआरडीएला या भागातील घाण पाण्यामुळे येणारी दुर्गंधी घालवायची आहे. त्यासाठी अमेरिकेतील इन्व्हायरोन्मेन्टल कन्सल्टन्सी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (इ. एन. एस.) या कंपनीला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या कंपनीने यापूर्वी असे प्रयोग केलेले आहेत, असे एमएमआरडीएचे सहसंचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.
माहीम कॉजवे ते सीएसटी रोडपर्यत एमएमआरडीएची नदीजवळची हद्द येते. या परिसरात नदीच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन मिसळून येथील पाणी शुध्द करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पाण्यातील दुर्गंधी नष्ट होऊन या भागातील हवा शुध्द होईल असे एमएमआरडीएच्या पर्यावरण विभागाला वाटते. त्याचप्रमाणे या भागात चांगल्या प्रकारचे सुशोभिकरण करुन लोकांना फिरण्यास अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नदी परिसरात दुर्गंधी न राहिल्यास येथील जागांचा विकास करणे देखील एमएमआरडीएला शक्य होणार आहे.