Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

.. आणि टीव्ही चॅनल्सचे कॅमेरे फिरतच राहिले!
राघवेंद्र राव, अनुभूती विष्णोई आणि स्वाती खेर

शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी नरिमन हाऊसमधील कारवाई सुरू झाली. ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे

 

(एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त हे स्वत: जातीने मार्गदर्शन करीत होते. नरिमन हाऊसच्या गच्चीवर हेलिकॉप्टरमधून ‘एनएसजी’चे जवान उतरत असतानाच जे. के. दत्त यांचा ‘मोबाइल’ वाजला. पलिकडून त्यांची पत्नी बोलत होती. ‘‘ते खाली उतरत आहेत,’’ असे ती दत्ता यांना सांगू लागली. त्यावर दत्त यांनी तिला विचारले, ‘‘तुला हे कसे कळले, कसे दिसले?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘अहो, हे सर्व टीव्हीवर दिसते आहे ना!’’
दत्त यांनी तत्क्षणी ‘इंटेलिजन्स ब्युरो’चे प्रमुख पी. सी. हलदर आणि गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्याशी संपर्क साधला, आणि कारवाईचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपण ताबडतोब थांबविण्यास सांगितले. ‘एनएसजी’चे किती जवान गच्चीवर उतरत आहेत, त्याची माहिती विविध ‘चॅनल्स’वाले सांगत आहेत. असा तपशील जाहीरपणे टीव्हीवर सांगणे, दाखविणे अडचणीचे ठरेल, असेही दत्त यांनी त्यांना सांगितले.
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची कामगिरी सुरक्षा दलांनी केली होती. २६/११च्या हल्ल्यानंतर सुरू असलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण व्हायला नको होते. इमारतींमध्ये दडून बसलेले दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातील कर्तेधर्ते यांच्यात मोबाइल फोनवरून सतत संभाषण सुरू होते याची जाणीव सुरक्षा संस्थांना आणि गुप्तचर संस्थांना होतीच. टीव्हीवरील प्रक्षेपणामुळे दिसणाऱ्या सर्व गोष्टी, माहिती, दहशतवाद्यांना पुरविणे पाकिस्तानातील त्यांच्या कर्त्यांधर्त्यांनी सुरू ठेवले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे केंद्र सरकारला कळविण्यात आले आणि प्रक्षेपण थांबविण्याच्या सूचना चॅनल्सना देण्याचा निर्णय झाला. परंतु तोपर्यंत घटनेला २४ तास उलटून गेले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची पत्रे चॅनल्सकडे २७ नोव्हेंबरला सायंकाळनंतर रवाना झाली आणि टीव्ही चॅनल्सना ती दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला सकाळी मिळाली. नरिमन हाऊसमधील कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये; तर अध्र्या-एक तासानंतर त्याची दृष्ये टीव्हीवर दाखवावीत, असेही सांगण्यात आले; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
टीव्ही चॅनल्सनी दहशतवादी हल्ला आणि कमांडोंची कारवाई या दोन्ही गोष्टींचे प्रक्षेपण केल्याप्रकरणी नंतर खूप टीका झाली. वास्तविक केंद्रीय तसेच राज्यातील अधिकाऱ्यांना ही समस्या पहिल्या दिवसांपासूनच जाणवत होती; परंतु तिला तोंड कसे द्यावे हे त्यांना कळत नव्हते. २७ नोव्हेंबरला सकाळी ‘न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन’ने (एनबीए) ३० न्यूज चॅनल्स आणि त्यांच्या संपादकांना काही सल्लावजा सूचना पाठविल्या.
चॅनल्सच्या ‘कव्हरेज’मुळे सुरक्षा दलांच्या कारवाईत बाधा येता कामा नये याची काळजी मुख्यत्त्वे घेतली जावी, असे सांगण्यात आले, तथापि, ‘एनबीए’च्या, तसेच सरकारच्या सूचनांचे बहुतांश टीव्ही चॅनल्सनी उल्लंघन केल्याचेच दिसून आले.
दहशतवादी हल्ला आणि कमांडोंची कारवाई या संदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रवक्ता म्हणून आय.ए.एस. अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती केली होती.
कारवाईसंबंधी प्रसारमाध्यमांना वेळोवेळी माहिती देण्याचे त्यांचे काम होते. तथापि, अशा अधिकाऱ्याकडून माहिती घेण्याऐवजी बहुतांश टीव्ही चॅनल्सनी ‘ताज’, ‘ट्रायडण्ट’ आणि ‘नरिमन हाऊस’मधील कारवाई आपल्या स्वत:च्या कॅमेऱ्याने टिपणेच पसंत केले. (क्रमश: )