Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्पाँज’ दाखविणार धूम्रपानाचे दुष्परिणाम
प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालणारा कायदा झाला; तरी अजूनही धूम्रपान करणारे आपल्या अवतीभवती मोठय़ा प्रमाणावर आढळतात. कायद्याच्या निमित्ताने ‘पॅसिव्ह’ धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत काही प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली दिसून येते. आपल्या शेजारी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिसमोर आपण नापंसती दर्शविली; तर त्याची दखल घेतली जाते, हे त्याचेच चिन्ह म्हणता येईल. परंतु, तरीही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिंना त्याच्या दुष्परिणामांची तीव्रता ठाऊक नसावी, म्हणूनच ते दुष्परिणाम ठाऊक असतानाही ते धूम्रपान करतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने ‘वर्ल्ड लंग फाउण्डेशन’ (डब्ल्यूएलएफ)च्या सहयोगाने ‘स्पाँज’ ही राष्ट्रव्यापी धूम्रपान विरोधी मोहीम हाती घेतली आहे.
धूम्रपान करणाऱ्यांना त्याच्या दुष्परिणामांच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी भारतीय आरोग्य व कुटुंब स्वास्थ्य मंत्रालय आणि ‘डब्ल्यूएलएफ’ने हाती घेतलेल्या ‘स्पाँज’ या मोहिमेत जाहिरात या माध्यमाचा प्रचारासाठी वापर केला जाणार आहे. सर्वसाधारणपणे धूम्रपान करणाऱ्याला त्याच्या दुष्परिणामांची जाणीव असते. मात्र, ही नुसती जाणीव ते धोकादायक आहे, हे समजून घेण्यासाठी पुरेशी ठरत नाही; तर दुष्परिणामांच्या गांभीर्याची जाणीव झाल्यास धूम्रपान करणारे विशेषत: युवा वर्ग त्याबाबत सकारात्मक कृती करेल, अशी आशा ‘डब्ल्यूएलएफ’ने व्यक्त केली आहे. सर्वसामान्य; त्यामध्ये सरासरी किमान सिगारेट्स ओढणाऱ्यांच्या फुफ्फुसांवर धूम्रपानाचे दिसून येणारे दुष्परिणाम या जाहिरांतीमध्ये दाखविले जाणार आहेत. इंग्रजी व हिंदूीसह आणखी तीन भारतीय भाषांमध्ये या जाहिराती प्रसारित केल्या जाणार आहेत. देशभरातील ४० दूरचित्रवाणी वाहिन्या आणि २८ आकाशवाणी वाहिन्यांवरून त्या प्रसारित केल्या जातील. आरोग्य मंत्रालय धूम्रपान विरोधी अभियान राबविणार असून ही जाहिरात हा या अभियानाच्या मालिकेचा एक भाग
आहे.