Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

..त्याने घेतलाय व्यसनमुक्तीचा वसा
प्रतिनिधी
धूम्रपान करणारी व्यक्ती धूम्रापानविरोधी पोस्टर किंवा माहितीपटांकडे फारसे लक्ष देत नाहीत.

 

त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवर धूम्रपानाच्या दुष्परिणामांची कल्पना देणारे फार कमी जण असतात. बदलापूर येथे राहणारा सचिन गायकवाड या तरूणाने मात्र व्यसनमुक्तीचा वसा घेतला आहे. गेली दोन वर्षे हा एकांडा शिलेदार आर्थिक पाठबळ नसतानाही रेल्वे, शाळा, महाविद्यालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये धूम्रपानविरोधी मोहीम राबवित आहे.
सचिन गायकवाड सांताक्रूझला एका ऑटो पार्ट्सच्या कंपनीत कामाला होता. त्याला महिन्याला साडेचार हजार रुपये वेतन मिळत होते. त्याला धूम्रपानाची सवय लागली होती. धूम्रपानापोटी दरमहिन्याला त्याचे ३०० रुपये खर्च होत होते. हा खर्च आपल्याला परवडत नसल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेऊन तो थांबला नाही, तर त्याने सिगारेटला कायमचा रामराम ठोकला. पण त्याचसोबत त्याने व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. व्यसनमुक्तीची सुरुवात त्याने स्वत:पासूनच केली. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना सिगारेट सोडण्यास सांगितले. मित्रांना नुसते तोंडी सांगून काही उपयोग नाही हे लक्षात येताच त्याने परळचा रस्ता धरला. केईएम रुग्णालयाच्या कंपाउंडवर धूम्रपानाच्या दुष्परिणामांची कल्पना देणारी पोस्टर त्याने अलगद काढली आणि त्यांचा वापर तो व्यसनमुक्तीची माहिती देण्यासाठी करू लागला. त्याने काही डॉक्टरांची भेट घेऊन याबद्दल अधिक माहिती मिळविली. तो सकाळी ८.१२ ची लोकल पकडायचा. रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांना तो धूम्रपानाच्या दुष्परिणामांची माहिती देऊ लागला. त्याचप्रमाणे सायंकाळी कार्यालयातून निघाल्यावर तो सांताक्रूझहून सीएसटीला जायचा. तोथून तो धूम्रपानविरोधी प्रचार करीत बदलापूपर्यंत जायचा. त्याच्या या मोहिमेमुळे अनेकांनी धूम्रपान सोडल्याचे त्याला दूरध्वनीवरून सांगितले.
याच प्रवाशांपैकी काहींनी त्याला शाळा, महाविद्यालयांमध्ये ही माहिती देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने कुर्ला येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, दादरची छबिलदास शाळा या ठिकाणी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम केले. हळूहळू त्याला विविध शाळा महाविद्यालयांमधून निमंत्रीत करण्यात येऊ लागले. एके दिवशी त्याने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना या मोहिमेविषयी कल्पना दिली. तेथील पोलिसांसाठी त्याने व्यसनमुक्ती शिबीर घेतले. त्यानंतर त्याने महाराष्ट्रातील इतर काही पोलीस ठाण्यांमध्येही हे कार्यक्रम केले.
दरम्यान, त्याने सांताक्रूझची नोकरी सोडून डोंबिवलीमधील मधूबन चित्रपटगृहासमोर सॅण्डविचचा स्टॉल सुरू केला. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत तो रेल्वे, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी धूम्रपानविरोधी मोहीम आणि संध्याकाळी सॅण्डविचचा स्टॉल अशी तारेवरची कसरत तो करू लागला. ‘युवाहितकारिणी’ या संस्थेचे विनय ठाकूर यांनी त्याची धडपड पाहिली आणि त्याला सहकार्याचा हात दिला. त्यांनी त्याला धूम्रपानाचे दुष्परिणाम दाखविणारे ‘प्लेकार्ड’ तयार करून दिले. केवळ रेल्वे प्रवाशांमध्ये नाही तर मशीद बंदर स्थानकानजीक रस्त्याच्या कडेला बसलेल्या गुर्दुल्ल्यांनाही त्याने या दुष्परिणामांची कल्पना दिली.
अनेक वेळा हे गर्दुल्ले मला धूम्रपानविरोधी मोहिमेच्या कार्यात मदत करतात. ते व्यसनमुक्त झालेले नाहीत, पण मी जेवढा वेळ त्यांच्यासोबत असतो त्या काळात ते व्यसनापासून लांब राहतात, असे सचिनने सांगितले. धूम्रपानविरोधी मोहिमेसाठी त्याला भरपूर काही करायची इच्छा आहे. पण आर्थिक स्थिती बळकट नसल्यामुळे त्याचे हात तोकडे पडत आहे. पण त्याने जीद्द सोडलेली नाही. जमेल तशी ही मोहीम पुढे रेटून नेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. त्याची जीद्द आणि प्रयत्नच त्याला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जातील.