Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्कायवॉक पेरणी
गेल्या ३१ मेपर्यंत शहरातील किमान तेरा स्कायवॉकचे काम पूर्ण करण्याची घोषणा एमएमआरडीएने केली होती. त्यापैकी एकही स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी खुला होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर उर्वरित स्कायवॉकचे कामही विलंबाने होण्याचे संकेत एमएमआरडीएने दिले आहे. पावसाळ्याच्या काळात महापालिकेने रस्ते खोदण्याची

 

परवानगी नाकारल्याने, हे त्यामागील कारण पालिकेने स्पष्ट केले आहे. ते किती खरे आणि किती खोटे हे पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक. मात्र नागरिकांच्या मनात स्कायवॉक योजनेबाबत संभ्रम वाढत आहे.
शहरात ६०० कोटी रुपये खर्चून ५० स्कायवॉक उभारण्याची योजना एमएमआरडीएने २००७ मध्ये हाती घेतली. त्यावेळी हे सर्व स्कायवॉक मार्च २००९ मध्ये बांधून पूर्ण होतील, असे स्पष्ट केले होते. मात्र ही मुदत उटलून अडीच महिने झाल्यानंतरही शहरात अवघे दोन स्कायवॉक उभे राहिले आहेत. काही स्कायवॉकची कामे अंतिम टप्प्यात असून, बहुतांश स्कायवॉकची कामे स्थानिकांच्या विरोधामुळे रखडली आहे. याखेरीज स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे सहा स्कायवॉक रद्द करण्याची नामुष्कीही एमएमआरडीएवर ओढावली आहे. तरीसुद्धा एमएमआरडीएकडून नवनवीन स्कायवॉकच्या उभारणीच्या घोषणांचा धडाका सुरू आहे. गेल्या बैठकीतही एमएमआरडीएने १० ठिकाणी स्कायवॉकच्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत स्कायवॉक उभारण्याची संकल्पना २००५ मध्ये समोर आली. त्यावेळी केवळ वांद्रे पश्चिम येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून प्रश्नयोगिक तत्त्वावर एक स्कायवॉक उभारण्याची योजना होती. एमएसआरडीसीने नेमलेल्या फ्रिशरमन-प्रभू या सल्लागार कंपनीने अवघ्या १० ठिकाणी ते उभारण्याची शिफारस केली होती. त्याबाबत एमएसआरडीसीकडून चाचपणी सुरू केली असतानाच, ही योजना अचानक एमएमआरडीएच्या खांद्यावर टाकण्यात आली. २००७ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ६०० कोटींची तरतूद करून, मुंबईत ५० स्कायवॉक उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर शहरात दोन स्कायवॉक उभे राहिले नाही, तोच ही आर्थिक तरतूद १४०० कोटींपर्यंत वाढविण्यात आली. आता नवनवीन ठिकाणी स्कायवॉक उभारण्याच्या घोषणांचा धडाका सुरू आहे. मात्र एमएमआरडीए व राज्य शासनाला इतक्या वेगाने ही स्कायवॉक पेरणी करण्याची इतकी घाई का लागली आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रेल्वे स्थानक परिसरातून नागरिकांना वेगाने मार्गाक्रमण करता येण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र स्कायवॉकमुळे हा उद्देश कितपत साध्य होतो, याबाबत अद्यापही नागरिकांमध्ये साशंकता आहे. याखेरीज त्यांच्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्याचे अतिक्रमण घटण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉक उभारताना ते नागरिकांसाठी कितपत उपयुक्त आहेत, या दृष्टीने कमी आणि गणेशोत्सव काळात त्याखालून गणेशमुर्ती जाऊ शकतील का, याबाबत जास्त विचार होतो. ही मोठी शोकांकिता आहे.
अनेक ठिकाणी गणरायाची मिरवणूक जाण्यासाठी स्कायवॉकची उंची १८ फूटांहून २३ फूटांपर्यंत वाढविण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शविली आहे. मात्र पादचारी पूल व भुयारी मार्गाच्या पायऱ्या चढण्याऐवजी जीव धोक्यात घालून रस्ते ओलांडणारे मुंबईकर स्कायवॉकच्या या वाढीव पायऱ्या चढतील का? तसेच आबालवृद्धांसाठी त्या गैरसोयीच्या ठरणार नाहीत का? याबाबतही विचार होण्याची तितकीच नितांत गरज आहे.
kkorde@gmail.com