Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून
प्रतिनिधी

राज्यातील सरकारी तसेच खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र

 

अभ्यासक्रमांच्या ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये’ची (कॅप) अधिसूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी १८ ते २९ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या प्रवेशप्रक्रियेत सहा स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश असणार नाही. स्वायत्त महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. परंतु, या महाविद्यालयांसाठी १८ ते २८ जून या कालावधीत अर्ज विक्री व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया चालणार आहे. अभियांत्रिकीसाठी यंदा दोन लाख १६ हजार ७२५ विद्यार्थी इच्छुक आहेत.
यापूर्वी स्वायत्त महाविद्यालयांचे प्रवेश अगोदर व्हायचे. परंतु, यंदा स्वायत्त अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच ‘कॅप’चीही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अभियांत्रिकीसाठी राज्यातील सुमारे ७० हजारपेक्षाही अधिक जागांसाठी ‘कॅप’च्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. यात सरकारी व विनाअनुदानित १३ महाविद्यालयांतील दोन हजार ९३१ जागांचा समावेश आहे. फार्मसी अभ्यासक्रमांसाठी सहा हजार ९३५ जागांसाठी ‘कॅप’च्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठी www.dte.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्याचा प्रिंट आऊट काढून ‘अर्ज स्वीकृती केंद्रां’वर (एआरसी) सादर करावयाचा आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावयाची आहे. २० ते २९ जून या कालावधीत एआरसी केंद्रांवर कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया होणार आहे. अभियांत्रिकीची हंगामी यादी २ जुलै रोजी जाहीर होईल. या यादीबाबतच्या तक्रारी ३ व ४ जुलै रोजी ऐकून घेण्यात येतील व ७ जुलै रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होईल.
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची हंगामी यादी ३ जुलै रोजी जाहीर होईल. त्याबाबतच्या तक्रारी ४ व ५ जुलै रोजी ऐकून घेतल्या जातील. त्यानंतर ८ जुलै रोजी पहिली प्रवेशयादी जाहीर होईल.
अ‍ॅड‘मिशन’
संचालक नॉट रिचेबल

अभियांत्रिकी व औषधनिर्माशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने जवळपास तीन लाख विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. मात्र, या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी संचालनालयाचे प्रभारी संचालक सु. का. महाजन उपलब्ध होत नाहीत. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला तरी ते मोबाइल उचलत नाहीत. १४ जून रोजी संचालनालयाने अभियांत्रिकी सीईटीचा निकाल जाहीर केला तेव्हाही महाजन कार्यालयात उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे तर, निकालाबाबत दूरध्वनीवरूनही माहिती देण्यास ते उपलब्ध झाले नाहीत.