Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पूरनियंत्रणावरील जनपंचायतीकडे लोकप्रतिनिधी व मुंबईकरांची पाठ
प्रतिनिधी

फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व विलासराव

 

साळुंखे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई परिसरातील पूरनियंत्रण सिद्धता’ या विषयावरील दोन दिवसांच्या जनपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही आपत्तीनंतर शासकीय संस्थांच्या आपत्कालीन व्यवस्थापन व सिद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात वाक्बगार असलेल्या लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांसह सर्वसामान्य मुंबईकरांनीही या जनपंचायतीकडे पाठ फिरवली आहे.
भाजप नेते व माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी आज दुपारी या जनपंचायतीचे उद्घाटन केले. प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याखेरीज नगरसेवक भालचंद्र शिरसाट, योगेश सागर, माजी उपमहापौर अरुण देव, पर्यावरण तज्ज्ञ नंदकुमार मोघे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी म्हणून केवळ मिठी नदीकडे लक्ष केंद्रित करण्यात येत असून, शहरातील दहिसर, पोयसर, ओशिवरा या नद्यांकडे पूर्णत: दूर्लक्ष केले जात असल्याची टीका राम नाईक यांनी केली.
सुमारे १२५ गैरसरकारी संस्था, अनेक लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या जनपंचायतीसाठी आमंत्रित केल्याचे सांगून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी शासकीय संस्था कितपत सज्ज आहेत, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, त्याबाबत मुंबईकरांच्या मनात कोणत्या शंका आहेत, याबाबत विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने तिचे आयोजन केल्याचे माधव भंडारी यांनी स्पष्ट केले. मात्र इतक्या महत्त्वपूर्ण विषयावरील या जनपंचायतीला अवघे ३०-४० लोक हजर होते. त्यामध्ये भाजपचे चार-पाच आजी-माजी नगरसेवक, गैरसरकारी संस्थांचे काही पदाधिकारी आणि १०-१२ सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता.
मुंबईचे भौगोलिक स्थान, ब्रिटिशकालीन नकाशे, खारफुटीची जंगले व त्यांचे महत्त्व, बेसुमार वृक्षतोड, हरित पट्टे, वाढते काँक्रीटीकरण आदी मुद्दय़ांआधारे मुंबईतील पर्यावरणाची स्थिती किती गंभीर आहे. सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास, किती मोठा धोका संभवतो आदी बाबींकडे नंदकुमार मोघे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए व मुंबई पोलिसांचे सादरीकरण आज जनपंचायतीमध्ये झाले. मात्र एमएमआरडीएचे अधिकारी अशोक भस्मे यांनी अवघ्या चार-पाच ओळींत एमएमआरडीएच्या आपत्कालीन सिद्धतेची माहिती दिली; तेव्हा सर्वजन अवाक् झाले.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न पोलीस निरीक्षक सुहास सातवडेकर आणि पोलीस उपनिरिक्षक अनिल परब यांनी पोलिसांच्या आपत्कालीन कृती आराखडय़ाची माहिती दिली. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस सज्ज असून, त्याबाबतचा कृती आराखडा पोलिसांना सादर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनपंचायतीमध्ये उद्या ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, बदलापूर नगरपालिका, विमानतळ प्रश्नधिकरण, अग्निशमन दल आणि विविध एफएम चॅनेल आपले सादरीकरण करणार असल्याची माहिती माधव भंडारी यांनी दिली.