Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रभावी व्यवस्थापन व वेळेचा पुरेपूर वापर हे यशाचे रहस्य
मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांचा कानमंत्र

मुंबई शहरात डबेवाल्याच्या व्यवसायाला १८९० पासून सुरुवात झाली असून आजवर पश्चिम

 

महाराष्ट्रातला मावळा मुंबईकरांचे पोट भरत आला आहे. यापुढे हा व्यवसाय असाच जोरात सुरू राहणार असून प्रभावी व्यवस्थापन व वेळेचा पुरेपूर वापर हे याच्या यशाचे रहस्य आहे. या व्यवसायात परप्रश्नंतीय नव्हता, नाही आणि भविष्यातही त्यांचा डबेवाल्यांच्या व्यवसायात शिरकाव होऊ देणार नाही, असे म्हणत मुंबई शहरात परप्रश्नंतीयांच्या वाढणाऱ्या लोंढय़ाला मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी जोरदार चपराक लगावली.
एससीएफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट आणि निर्माण ग्रुप ऑफ कंपनी यांच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘सिनर्जी ०९’ मॅनेजमेंट सेमिनारअंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतीत रघुनाथ मेदगे आणि संघटनेचे सचिव गंगाराम तळेकर यांना अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी बोलते केले. सेमिनारमध्ये अतुल राजोळी, विनायक वैद्य, स्नेहल कृष्णा यांनी उपस्थितांना मराठीत व्यवस्थापनाचे धडे दिले.
यावेळी मेदगे म्हणाले की, डबे व्यवसायामध्ये आमची आज तिसरी पिढी कार्यरत आहे. मुंबईतील ७० रेल्वे स्थानकांतून पाच हजार डबेवाले प्रत्येकी ६० किलोंचा बोजा घेऊन दोन लाख डबे पोहोचवत असतात. आमची स्वत:ची अशी ‘मिनी गव्हर्नमेंट’ असून शक्ती-भक्ती-युक्ती या तिहेरी तत्त्वावर आमचा व्यवसाय उभा आहे. आमच्या डोक्यावर असणारी टोपी ही खरी प्रेरणा असून या टोपीखाली आमच्या यशाचे रहस्य दडले आहे. १०० टक्के कस्टमर सेवा आम्ही देत असल्याने लोकांचा मुंबईच्या डबेवाल्यांवर विश्वास बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजची धावपळ करत असताना वेळेचे व्यवस्थापन, संवाद, डबेवाल्यांची साखळी आणि ग्राहकांचा डबेवाल्यांवर असणारा विश्वास यामुळे आम्ही यशस्वी झाल्याचा मंत्रदेखील मेदगे यांनी यावेळी उपस्थितांना दिला. शोभा बेंद्रे यांनी लिहिलेल्या ‘मुंबईचा डबेवाला’ पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्र्यांनासुद्धा चर्चगेट स्थानकावर वेळेवर उपस्थित राहावे लागल्याने त्यांनी सुद्धा आमचय वेळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले होते. एव्हाना, प्रिन्स चार्ल्सलासुद्धा डबेवाल्यांच्या भेटीकरिता आमच्या वेळेनुसार सवड काढावी लागली असल्याने आमच्या व्यवस्थापनाचा आम्हाला अभिमान असल्याचे मेदगे आणि तळेकर यांनी सांगितले.