Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

पंधरा वर्षे रेंगाळलेला ‘मार्ग’ अखेर मोकळा!
संगमनेर, १७ जून/वार्ताहर

नाशिक-पुणे महामार्गाला पर्यायी म्हणून होणाऱ्या बाह्य़वळण रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन याआधीच पूर्ण झाले असून, त्यापोटी सव्वासहा कोटी रुपयांचा मोबदला संबंधितांना देण्यात आला. बायपासमुळे या मार्गावरील नेहमी होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी फुटणार आहे. एकूण ९.०३७ किलोमीटर लांब व ६० मीटर रुंदीचा बाह्य़वळण मार्ग पुण्याच्या बाजूकडून रायतेवाडी, तर नाशिक बाजूच्या अमृतवाहिनी महाविद्यालयापर्यंत आहे.

सदस्यांच्या प्रश्नांना पदाधिकारी उत्तरे देणार का?
नगर, १७ जून/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पदाधिकाऱ्यांनीच उत्तरे द्यावीत, असे बंधन जि. प. अधिनियमानुसार असताना ही जबाबदारी विभागप्रमुखांवर ढकलण्याच्या प्रथेस उद्या (गुरुवारी) होणाऱ्या कार्यकाळातील अखेरच्या सर्वसाधारण सभेत तरी छेद दिला जाणार का, असा प्रश्न सदस्य उपस्थित करीत आहेत. जि. प. अंदाजपत्रकीय सभा उद्या होत आहे.

वाडिया पार्कसमोरील अनधिकृत भाजीबाजार उठवला
नगर, १७ जून/प्रतिनिधी
वाडिया पार्कसमोरील रस्त्यावर दर बुधवारी भरणाऱ्या भाजीमंडईवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अखेर आज कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. सकाळीच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना प्रामुख्याने या अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत असे. रस्त्याच्या मध्ये, तसेच दोन्ही बाजूंनाही भाजीची दुकाने मांडून हे विक्रेते संपूर्ण रस्ताच अडवून टाकत. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत असे.

भगवतीपूर ट्रस्टच्या नियुक्तयांना ‘बंद’ पाळून विरोध
सरपंचासह १२५जणांवर जमावबंदीचा गुन्हा

कोल्हार, १७ जून/वार्ताहर
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टवर नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळाच्या विरोधात गावकऱ्यांनी गावात आज उत्स्फूर्त ‘बंद’ व रास्ता रोको आंदोलन केले. नियुक्त प्रशासकीय मंडळ ग्रामसभेला मान्य नसून ग्रामसभेतून नवीन विश्वस्त मंडळ नेमावे, अशी प्रमुख मागणी आज आयोजित ग्रामसभेत एकमुखाने करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी सरपंच खर्डे यांच्यासह १२५जणांवर गुन्ह्य़ाची नोंद केली.

अंगठेबहाद्दरांनाही व्हायचंय ‘विशेष कार्यकारी अधिकारी’!
संजय काटे
श्रीगोंदे, १७ जून

तालुका दंडाधिकाऱ्यांखालोखाल अधिकार असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर आता चक्क अंगठेबहाद्दरही हक्क सांगू लागले आहेत! पदासाठी चारित्र्य पडताळणी होत असली, तरी कुठलीही शैक्षणिक पडताळणी मात्र होत नाही! बहुधा त्यामुळेच तालुक्यातील दोघा अंगठेबहाद्दरांना हा अधिकार देण्याची शिफारस करण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी हे अतिशय महत्त्वाचे व जबाबदारीचे पद आहे.

लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे कांदाफेक आंदोलन
कोपरगाव, १७ जून/वार्ताहर

कृषी उत्पन्न बाजार समितीने स्थानिक कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता येवले येथील व्यापाऱ्यास कांदा खरेदीची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ लिलाव बंद ठेवले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांदाफेक आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा खरेदीत कोणा एका व्यापाऱ्याची मक्तेदारी न ठेवता मागेल त्याला कांदा खरेदीची परवानगी देण्याचे मान्य केल्यावर व लिलाव सुरू करण्याचे आदेश दिल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

किल्ल्याच्या विकासासाठी सरकारी समिती
नगर, १७ जून/प्रतिनिधी

नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद केल्यानंतर राज्य सरकारने आता या सर्व कामाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठजणांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीबाबतचा शासन निर्णय आजच मंत्रालयातून जाहीर करण्यात आला.

वार्षिक योजनांच्या अभ्यासगटात जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांची निवड
नगर, १७ जून/प्रतिनिधी

राज्यातील जिल्ह्य़ांच्या जिल्हा वार्षिक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाचे सदस्य म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची निवड करण्यात आली. नियोजन विषयातील तज्ज्ञ म्हणून ही निवड करण्यात आली.

कर दर्शनम्!
इतर अवयवांसारखे हात, त्यांचे कामही इतर अवयवासारखं महत्त्वाचं. पण तरीही मानवी मनानं याच हातांचा इतका व्यापक आणि अद्भूतही वापर केला की कोणीही स्तिमीत व्हावे. या दोनाक्षरी रुपातील किमया जाणण्यासाठी हातच्या कांकणाला आरसा कशाला? म्हणून सरळ सरळ ‘हात’ या विषयालाच हात घालावा हे उत्तम. पण नाहीच चालणार हातघाईवर येऊन त्यासाठी नसता आफत मात्र यायची हातोहात फसवले जाण्याची! वास्तवात या ‘हाता’चा इतका विपुल आणि अनेक अंगांनी वापर होत असतो की त्या रुपाला जीवनाची हातगाडीच म्हणावं.

कष्टक ऱ्यांचा नेता - कॉम्रेड भास्करराव जाधव
कॉ म्रेड भास्करराव जाधव यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या आठवणींचा उमाळा मनात दाटला की, इतिहासाची पाने भराभरा उलटली जातात. कॉम्रेड जाधव हे मातीला धरून असलेले कम्युनिस्ट नेते होते. कम्युनिस्ट विचारसरणी व स्थानिक परिस्थिती यांची ते उत्तम प्रकारे सांगड घालत. कॉम्रेड जाधव यांचा परिचय १९६५ साली झाला. मी नगर कॉलेजमध्ये शिकत होतो. सकाळी अकरानंतर कॉलेज संपून घरी येत असे.

बाभळेश्वरला वादळी पाऊस; १० गावांचा वीजपुरवठा खंडित
राहाता, १७ जून/वार्ताहर

आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे घरे, हॉटेलांवरील पत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली. तसेच मुळा-प्रवरा वीज संस्थेचे खांब पडल्याने ३३ के. व्ही. व ११ के. व्ही.मध्ये बिघाड झाला. त्यामुळे आठ ते दहा गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. सायंकाळी अचानक जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. शेतातील चारापिके भुईसपाट झाली. या वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडून गेले. हॉटेलांचेही छप्पर उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. लोणी, कोल्हार आणि पिंप्री निर्मळ या भागात तुरळक पाऊस झाला. वाऱ्याने खांब पडल्याने ममदापूर, हसनापूर, राजुरी, तिसगाववाडी, सोनगाव, सात्रळ, श्रीरामपूर एमआयडीसी या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

कदम, शेळके, जाधव ‘श्रीगोंदे’चे कामगार संचालक
श्रीगोंदे, १७ जून/वार्ताहर
श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी बापूराव कदम, अप्पासाहेब शेळके व रमेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.कारखाना संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. हे तिघेही तालुक्यातील रहिवासी असून, गेल्या ३० वर्षांपासून कारखाना सेवेत कार्यरत आहेत. श्री. कदम व श्री. जाधव यांना यापूर्वीही संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या मागच्या कामाचा विचार करून त्यांना पुन्हा ही संधी देण्यात आली.या नियुक्तीबद्दल त्यांचे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष केशवराव मगर, कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले, कामगार नेते रंगनाथ पंधरकर यांनी अभिनंदन केले आहे.

सलग १२ तास विजेसाठी सोनई-राहुरी रस्त्यावर आंदोलन
सोनई, १७ जून/वार्ताहर

सलग बारा तास वीजपुरवठा व्हावा, या प्रमुख मागणीसाठी आज सायंकाळी तरुणांनी सोनई-राहुरी रस्त्यावर एक तास आंदोलन केले. सलग बारा तास वीजपुरवठा देण्याची घोषण ऊर्जामंत्र्यांनी केली. तथापि, तिची अंमलबजावणी सुरू न झाल्याने आज राजेंद्र लांडे व दिलीप बेल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. जळालेल्या डीपी तातडीने बदलाव्यात अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तारखेबाबत दि. २९ला बैठक
नगर, १७ जून/प्रतिनिधी
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून बेमुदत संपावर जाणार असून, संपाची तारीख व कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी मुंबईत दि. २९ला दुपारी मध्यवर्ती संघटनेची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी व आर्थिक लाभ तत्काळ लागू करावेत, केंद्राप्रमाणे कालबद्ध पदोन्नती, वाहतूक व घरभाडे भत्ता मिळावा, ३९ महिन्यांची थकबाकी रोखीने मिळावी आदी मागण्यांसाठी संप केला जाणार असल्याचे खोंडे यांनी सांगितले.

बेलिफ संघटनेच्या अध्यक्षपदी वाघमारे
नगर, १७ जून/प्रतिनिधी
जिल्हा न्यायालयातील बेलिफ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पी. आर. वाघमारे व उपाध्यक्षपदी चंद्रकांत भिंगारदिवे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष एम. एस. वामन यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. भानुदास िपपळे (खजिनदार), सुरेश कदम (सहखजिनदार), दिलीप आंबेकर (सचिव), सुरेश लगड (सल्लागार) असे नूतन पदाधिकारी आहेत. अध्यक्षपदासाठी वाघमारे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब काजवे यांनी केली. त्यास विजय पोंदे यांनी अनुमोदन दिले.पदाधिकाऱ्यांचे जिल्हा न्यायालयातील प्रबंधक सु. ज्ञा. धावटे, सहायक अधीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ लिपीक डी. बी. धामणे आदींनी अभिनंदन केले.

शिक्षणमंत्री विखे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार
नगर, १७ जून/प्रतिनिधी
शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी सत्कार केला.याप्रसंगी महासंघाचे राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे, रमेश बोरुडे, गंगाधर बोरुडे, दिलीप थोरात, रावसाहेब मरकड, सुनील चौधरी, राजेंद्र शेटे, दिनकर घोडके आदी उपस्थित होते.

वसंतदादा पाटील पुरस्कार शहर बँकेला प्रदान
नगर, १७ जून/प्रतिनिधी

शहर सहकारी बँकेला मुंबईतील कार्यक्रमात वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक संचालक मुकुंद घैसास, अध्यक्ष डॉ. रावसाहेब अनभुले, उपाध्यक्ष सुनील फळे, संचालक सतीश अडगटला, सुरेखा विद्ये, राजू विद्ये यांनी हा पुरस्कार स्वीकारला.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकस् असोसिएशनच्या वतीने बँकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात येते. सन २००७-०८ या वर्षांतील कामगिरीसाठी शहर बँकेला हा पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्र सामाजिक मंचातर्फे हजारेंच्या संरक्षणाची मागणी
नगर, १७ जून/प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र सामाजिक मंचाच्या वतीने निषेध करण्यात आला. ही सुपारी देण्याचा संशय असलेले राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मंचाच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना देण्यात आले. समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे, तसेच राजेंद्र पवार सिमोन गायकवाड, ब्रदर अ‍ॅलेक्स, दत्तात्रेय गायकवाड, डॉ. डी. एस. पट्टेकर, मायाताई जाधव आदींनी हे निवेदन दिले. हजारे यांनी संरक्षण नाकारले असले, तरी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सरकारने स्वतहून त्यांना संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

‘दम दमा दम’ स्पर्धेत नृत्य झंकारला विजेतेपद
नगर, १७ जून/प्रतिनिधी
सह्य़ाद्री वाहिनीवरील ‘दम दमा दम’ या नृत्याच्या लोकप्रिय कार्यक्रमात येथील नृत्य झंकारच्या संघाने विजेतेपद पटकाविले. संचालिका प्रिया ओगले यांच्या मार्गदर्शनाखालील नृत्य झंकारच्या संघाचे हे १५वे विजेतेपद आहे.यश बाळासाहेब बोठे, लाजरी राजेश परदेशी, साक्षी मयूर जामगावकर, मानसी संजय दळवी, सेजल प्रशांत गांधी, रिया मनोज मुनोत, निकिता नंद डहाणे, सिद्धी आदिनाथ कुल्हट, श्रद्धा गजानन रेखी, श्रेया सचिन जरे या बालकलाकारांचा विजेत्या संघात समावेश होता.मनपसंत, टॅलेंट व लोकनृत्य अशा ३ फेऱ्यांत ही स्पर्धा झाली. राज्यातील विविध संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते व नृत्यांगना नीता देवकर, दम दमा दमच्या संचालिका श्रीकला हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रसारण गुरुवारी (दि. १८) सायंकाळी सव्वासात वाजता होणार आहे.

रयत सेवक बँकेच्या संचालकपदी खंडागळे बिनविरोध
नगर, १७ जून/वार्ताहर
रयत सेवक बँक (सातारा)च्या संचालकपदी बँक सेवक प्रतिनिधी म्हणून राजेंद्रकुमार खंडागळे यांची एकमताने निवड झाली. खंडागळे हे रयत सेवक बँकेच्या नगर शाखेत सहायक लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.रयत सेवक बँकेच्या एम्प्लॉईज युनियनच्या सातारा येथे १५ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. या वेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष हिंदुराव बाबर होते.या वेळी झालेल्या सभेत संघटनेच्या सचिवपदी आर. बी. वाकचौरे यांचीही निवड करण्यात आली. वाकचौरे हे रयत सेवक बँकेच्या नगर शाखेत कार्यरत आहेत. या निवडीचे शाखा समितीचे अध्यक्ष व बँकेचे संचालक शिवाजी डहाळे, संचालक अंबादास शेलार, बोळीज, तांबे, पानमंद, निंबे, देवकर यांनी तसेच बँकेचे शाखाधिकारी गोरक्षनाथ थोरात व सेवकांनी स्वागत केले.