Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसला स्थिती अनुकूल
विलासराव देशमुख यांचा दावा

नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसला अनुकूल स्थिती असल्याचा दावा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे. ‘मला पक्षाची नव्हे तर, कार्यकर्त्यांची चिंता आहे; त्यांनी आणखी किती दिवस आमचा प्रचार करायचा’ असा सवालही विलासरावांनी केला.

जुलैपर्यंत रेल्वे गाडय़ांचे ‘आरक्षण फुल्ल’
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

गेल्या एप्रीलपासून रेल्वे प्रवाशांची उसळलेली गर्दी अद्याप कमी झालेली नाही. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत नागपूर मार्गे धावणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ांचे ‘आरक्षण फुल्ल’ आहे. गीतांजली एक्स्प्रेस, हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, जी.टी. एक्स्प्रेसमध्ये १८ ते २९ जून या कालावधीत कोणत्याही श्रेणीचे आरक्षण उपलब्ध नाही.

जेट एअरवेज, किंगफिशरच्या प्रवासभाडय़ात वाढ
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

जूननंतरचा काळ विमान कंपन्यांसाठी ‘लीन सिझन’ समजल्या जात असल्याने विमान कंपन्यांनी या दिवसांचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी प्रवासभाडय़ाच्या विविध योजना सुरू केल्या असल्या, तरी जेट एअरवेजने आज प्रवासभाडय़ात ४०० रुपयांनी वाढ केल्याने विमानप्रवास पुन्हा महागला आहे. जेट पाठोपाठ किंगफिशरनेही प्रवासभाडय़ात वाढ केली असून त्यांचे नवे दर तातडीने लागू होतील. त्यामुळे नागपूर-मुंबई विमानसेवेच्या प्रवासभाडय़ात वाढ झाली आहे.

‘भाजपमध्ये चोरांना मानाचा मुकुट आणि सच्च्या कार्यकर्त्यांची उपेक्षा’ विहिंपचे माजी सचिव दिलीप जोशींचा घरचा अहेर!
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण करावे, अशी सूचना पक्षाच्या नेत्यांसह या पक्षाचे समर्थक असलेले संघ परिवारातील लोकही करू लागले आहेत. जसवंतसिंह आणि यशवंत सिन्हा यांच्यापासून सुरू झालेले हे लोण स्थानिक पातळीवर पोहोचले आहे. ‘चोरांना मानाचा मुकुट आणि सच्च्या कार्यकर्त्यांची उपेक्षा’ या धोरणामुळेच भाजपवर आजची परिस्थिती ओढवलेली असल्याची परखड टीका विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भाचे माजी सचिव, वाशीमचे दिलीप जोशी यांनी भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करताना केली आहे.

सिंदखेडराजाच्या सर्वागीण विकासाचा ध्यास
सोमनाथ सावळे

महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांचे आजोळ व राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणजे सिंदखेडराजा. ऐतिहासिक वसा आणि वारसा असलेल्या सिंदखेडराजा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे गेल्या पंधरा वर्षापासून करीत आहेत. या मतदारसंघाचा सर्वागीण विकास करण्याचा ध्यास डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला आहे. त्यांची जिद्द, चिकाटी, परिश्रमामुळे मतदारसंघाच्या विकासाला वेग आला आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवाडा परिसराचा संपूर्ण कायापालट डॉ. शिंगणे यांनी केला. सिंदखेडराजा व विदर्भातील प्रती तिरुपती बालाजीचे वास्तव्य असलेल्या देऊळगावराजाला त्यांच्या प्रयत्नाने पर्यटन स्थळ व तीर्थस्थळ विकास आराखडय़ात स्थान मिळाले.

पाठय़पुस्तक विक्री व्यवसाय ‘आऊट ऑफ डिमांड’!
नागपूर , १७ जून/ प्रतिनिधी

राज्यातील अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याने एरवी ‘आऊट ऑफ प्रिंट’ अशी पाटी लावून वारंवार खेटे घालण्यास लावणाऱ्या पाठय़पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय आता ‘आऊट ऑफ डिमांड’ झाला आहे!

महाराजबागेच्या संरक्षक भिंतीसाठी त्वरित ६० लाख देण्याचे निर्देश
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

महाराजबागेच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारतर्फे ६० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिल्यानंतर, ही रक्कम ताबडतोब देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये संगणक साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. शालेय अभ्यास संगणकाच्या मदतीने करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हाती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषदांच्या पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग असलेल्या उच्च प्रश्नथामिक शाळांमध्ये यंदापासूनच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

राजपत्रित अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

नागपूर जिल्हा परिषदेतील राजपत्रित अधिकाऱ्यांची दीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने विजयसिंह मोहिते पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बीएसएनएलमधील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

बीएसएनएलमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने महाव्यवस्थापकांना दिले आहे. अनुकंपा तत्त्वावरील भरतीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे केली होती. यावर मंत्रालयाने चौकशीसाठी महाव्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. पात्र आणि योग्य उमेदवारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करण्यात येत आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याने यू.बी. निकोसे, एन.डी. मेश्राम या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणीही संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत पाटील यांनी केली आहे.

कुरेशी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची मागणी
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

मुस्लिम कुरेशी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा बहाल करण्याची मागणी कुरेशी समाजाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांच्याकडे केली. अतिक कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा बहाल करून सोयी द्याव्या, तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. उत्तर प्रदेश व बिहार सरकारने केंद्राकडे केलेल्या शिफारसींप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही तशाच शिफारसी कराव्या, असेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात समाजाचे अध्यक्ष कमाल दलाल, रफिक कुरेशी, मोहम्मद अनवर, हाजी शकील, हाजी जब्बार, हाजी राजा कुरेशी, हाजी मुश्ताक, कलीम कुरेशी, मुख्तार कुरेशी, जावेद राजा आणि समद चौधरी आदींचा समावेश होता.

टँकरच्या धडकेने मोटारसायकल चालक गंभीर जखमी
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

वेगात आलेल्या टँकरच्या धडकेने मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. मानेवाडा मार्गावर बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. सूरज केशव पोतदार (रा. रामभाऊ म्हाळगीनगर) हे गंभीर जखमीचे नाव असून त्याला ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी तो हिरो होंडा स्प्लेंडरने (एमपी२८/एमबी/२२४०) लाडीकर लेआऊटकडून महालक्ष्मीनगरकडे जात होता. मागून आलेल्या टॅंकरने (एमएच३१/ सीबी/ ४९५९) मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे दिसताच कुणीतरी पोलिसांना कळवले. हुडकेश्वर पोलिसांनी जखमीला रुग्णालयात नेले. या प्रकरणी टॅंकर चालक आरोपी संतोष महादेव पुसनाकेला अटक केली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवासाची सोय अपुरी
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

शासकीय वसतिगृहात इतर जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने असंख्य मागासवर्गीय विद्यार्थी भाडय़ाने खोली घेऊन राहतात. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह निधीपासून ते वंचित असून अशा विद्यार्थ्यांनाही भत्ता देण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन व्हॉईस या संघटनेने केली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता १५० रुपयांवरून ३०० रुपये वाढवण्यात आला. यासाठी संघटनेने सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे अभिनंदन केले. मात्र, वसतिगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियम धाब्यावर बसवून नेत्यांनी शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहात २२ हजार ८२८ विद्यार्थ्यांच्या दुप्पट विद्यार्थी भाडय़ाने खोली घेऊन उच्च शिक्षण घेत असल्याकडे संघटनेचे अध्यक्ष असंघ रामटेके यांनी लक्ष वेधले आहे. यामुळे बाहेर राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे सोयी व भत्ता देण्यात यावा, असेही संघटनेने म्हटले आहे.

महिलांकरता शनिवारी व्यक्तिमत्व विकास शिबीर
नागपूर, १७ जून/प्रतिनिधी

जेसीआय नागपूर, लेडी लिजंडद्वारा शनिवार, २० जूनला दुपारी २.४५ ते ५ वाजतापर्यंत रामदास पेठेतील आशीर्वाद कॉम्प्लेक्स येथे महिलांकरता व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित केले आहे. यात राष्ट्रीय प्रशिक्षक कुमार झीलपीलवार प्रशिक्षण देतील. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरात जास्तीतजास्त संख्येने महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जेसीआय नागपूर लेडी लेजेंडद्वारा करण्यात आले आहे. अधिक माहितीकरता आशा पांडे ९८२३२२७१३७ यांच्याशी संपर्क साधावा.

दिघोरीत युवक काँग्रेसचा मेळावा
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

शहर युवक काँग्रेसचे ब्लॉक क्र. ४चे अध्यक्ष राहुल सरोदे यांनी दिघोरी येथील ताज पॅलेसमध्ये युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव प्रियव्रत सिंह, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. राजू सातव, उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, महासचिव विशाल मुत्तेमवार, उपाध्यक्ष अरविंदर वोरा, महासचिव सूमुख मिश्रा, नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण उपस्थित होते. सामान्य युवक कार्यकत्यार्ंना संधी दिली जाईल, असे प्रतिपादन प्रियव्रत सिंह यांनी केले. अ‍ॅड. राजू सातव यांनी ‘आम आदमी का सिपाही’ या राहुल गांधी यांच्या शब्दांची आठवण कार्यकर्त्यांना करून दिली. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक राहुल सरोदे यांनी केले. प्रितम शिंदेकर, सचिन लिहीतकर, संदीप सोनी, शेखर येरगुंटवार, जय काळे, डॉ. काटेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकरता सहकार्य केले.

वीज आयोगाची आज सुनावणी
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

वीज महावितरण कंपनीच्या दरवाढीच्या प्रस्तावावर उद्या वनामती सभागृहात वीज नियामक आयोगाची सुनावणी होणार आहे. महावितरणने ३६ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला असून त्यावर राज्य वीज नियामक आयोगाने तक्रारी-आक्षेप मागवले होते. सुनावणी सकाळी १०.३० वाजेपासून सुरू होणार आहे. यावेळी आयोगाचे अध्यक्ष व्ही.पी. राजा, सदस्य एम. वेलाईथन व अन्य सदस्य हजर राहणार आहेत.

बसपच्या शहर अध्यक्षपदी संजय कडू व प्रतिभा खापर्डे
नागपूर, १७ जून/प्रतिनिधी

बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने १५ जूनला संध्याकाळी ६ वाजता वैशालीनगर येथे सभा पार पडली. सभेत संजय कडू यांची नागपूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर, महिला अध्यक्षपदी प्रतिभा खापर्डे यांची निवड करण्यात आली. बैठकीत कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी संजय कडू, उपाध्यक्ष जगदीश थूल, कार्यकारी अध्यक्ष योगेंद्र लोखंडे, महासचिव उदय खापर्डे, सहसचिव संजय इंगळे, संघटक भीमराव पखिडे, सहसंघटक मनिष बनवारी, कोषाध्यक्ष एम.एस. मेश्राम, सहकोषाध्यक्ष जगन हेडावू यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सतीश रंगारी, राजू उके, करण माटे, मनिष बनवारी, जगन हेडाऊ, नीळकंठ निखारे, अनिल ठाकरे, मोतीराम येवले, राजेंद्र जगताप, अनिल दहिवले, चंदा लोखंडे, अरूणा मेश्राम, राधा येवले यांची निवड करण्यात आली.

सम्यक साहित्य मंचतर्फे २१ जूनला गझल लेखन कार्यशाळा
नवोदित इच्छुक कवींना व रसिकांना सम्यक साहित्य मंचतर्फे रविवार, २१ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता राष्ट्रभाषा भवन येथे गझल लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात गझल तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, निलकांत ढोले, ताराचंद चव्हाण, भोला सरवर, अमर रामटेके, हृदय चक्रधर, सूर्यकांत मुनघाटे, प्रसेनजित गायकवाड, प्रकाश दुलेवो, प्रकाश कांबळे, ज्ञानेश्वर वांढरे, प्रश्न. शुभांगी रथकंठीवार, हेमलता ढवळे, मधुकर कडू, मधुकर मुनघाटे, ललित माोहोड, भीमराव गणवीर, जीवन खोब्रागडे आदी गझलकार त्यांच्या रचना सादर करतील. याप्रसंगी गझल चळवळीवर चर्चा करण्यात येईल. या कार्यशाळेत नवोदित कवींनी, रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सम्यक साहित्य मंचाचे अध्यक्ष प्रश्न. हृदय चक्रधर आणि सचिव सूर्यकांत मुनघाटे यांनी केले आहे.

हमी भाव कमी दिल्याने जिल्ह्य़ात गव्हाची खरेदी ठप्प
नागपूर, १७ जून / प्रतिनिधी

बाजारात तेराशे रुपये भाव असलेल्या गव्हाला शासनाने फक्त १ हजार ८० रुपये प्रती क्विंटल हमी भाव दिल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. यामुळे जिल्ह्य़ात गव्हाची अद्याप खरेदी झालेली नाही. शासनाने गेल्या वर्षी १ हजार रुपये हमी भाव व १०० रुपये बोनस दिला होता. यंदा, अद्याप बोनस जाहीर झालेला नाही. उलट, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० रुपये कमी आहे. एकीकडे महागाई आणि कर्मचाऱ्यांना सहावे वेतन आयोग लागू करून त्यांच्या वेतनात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. मात्र, शेतमालाचे भाव कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्य़ात १५ खरेदी केंद्र आहेत पण, अद्याप एकाही केंद्रावर मुहूर्ताचीदेखील खरेदी झालेली नाही. बाजारात तेराशे रुपये भाव असल्याने शेतकरी खुल्या बाजाराकडे वळले असून शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणूनच खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे.