Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
माध्यस्थभाव- तटस्थता

 

महावीरांच्या काळात भारतात बासष्ट विविध धर्म होते. असा ‘त्रिषिटक’ या बौद्ध ग्रंथात उल्लेख आहे. दुसऱ्या ग्रंथात ३६३ विविध मतमतांतरांचा उल्लेख आढळतो. लोक, परलोक, ईश्वराचे अस्तित्व, स्वर्ग, मोक्ष, पुनर्जन्म, ईश्वराचे कर्तृत्व इ. अनेक बाबतींत तीव्र मतभेद होते. अशा वेळी ‘स्थाद्वाद’ या तत्त्वाचा विचार मांडून महावीरांनी भांडणाचं मूळच उखडून टाकलं. स्थात म्हणजे एका अपेक्षेने- विविध धर्मातली तत्त्वे एका अपेक्षेने खरी आहेत म्हणाल्यामुळे वितंडवाद, हट्टाग्रह, दुराग्रह, अहंकार, द्वेष, संघर्ष, हिंसा नाहीशी होऊन तटस्थता, माध्यस्थभाव निर्माण होण्यास मदत झाली. मनामनांत सहिष्णू वृत्ती आपोआप बळावली. माध्यस्थभाव म्हणजे कुठल्याही विचारधारेचा आग्रह न धरणे. कुणाविषयीही द्वेष, अढी न ठेवता कुतर्क, कुविचारांपासून दूर राहणे तटस्थ वृत्ती मनात बाळगणे. तटस्थ पुरुष असत् तत्त्वापासून दूर आणि सत् तत्त्वावर श्रद्धा ठेवतो जो आपल्या मताचा आग्रह धरतो, मीच खरा म्हणतो, त्याला आपलं मत खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक युक्त्या-प्रयुक्त्या लढवाव्या लागतात. त्याच वेळी माध्यस्थभाव असणारे आपलं मत सत् असल्यामुळे लोकांच्या सहज पचनी पाडू शकतात. यशोविजयजी म्हणतात,
मनोवत्सो युक्तिगवों मध्यस्थानु धावति ।
तामकर्षति पुच्छने तुच्छाग्रहमन: कपि: ।।
मध्यस्थ पुरुषाचे मनरूपी वासरू युक्तिरूपी गाईच्या मागे धावत त्याच वेळी हीनदीन मनोवृत्तीच्या (दुराग्रही) माणसाचं मनरूपी माकड युक्तिरूपी गाईचं शेपूट मागे ओढत राहतं- आपल्याकडे ओढत राहतं. अनाग्रही, माध्यस्थ वृत्तीचा, तटस्थ माणूस युक्तीकडे, तर्काकडे ओढला जातो. त्याच वेळी दुराग्रही, हट्टी, अहंकारी माणूस युक्तीला, तर्काला आपल्याकडे ओढत राहतो. आग्रही माणूस आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या आकलनशक्तीप्रमाणे युक्तीला, तर्काला आपल्याकडे हट्टाने वळवतो आणि निपष्क्षपाती, माध्यस्थभाव असणारा स्थितप्रज्ञ आपली बुद्धी तर्काकडे, युक्तीकडे वळवतो. सूतर्क आणि कुतर्क कशाला म्हणायचे, ही सूक्ष्म बुद्धी माणसात असली की आपोआप माध्यस्थ वृत्ती प्राप्त होते.
लीला शहा

कु तू ह ल
लीप सेकंद
लीप सेकंद हा कशासाठी वापरतात?

तास, मिनिट आणि सेकंद ही आपल्या वापरातली कालमापनाची एककं सौरदिवसाच्या कालावधीशी निगडित केली गेली आहेत. ही एककं स्थिर राहाण्यासाठी, सौरदिवसाच्या ज्या कालावधीवर ती आधारित आहेत, तो कालावधीसुद्धा अचल असायला हवा. यासाठी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण आणि स्वत:भोवतीचं भ्रमण हेही अचल गतीने व्हायला हवं. पण पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीत किंचितशी अनियमित घट होऊन पृथ्वीचा स्वत:भोवतीचा प्रदक्षिणाकाळ आणि पर्यायाने सौरदिवसाचा कालावधीसुद्धा अनियमितपणे किंचितसा वाढत आहे. ही वाढ दिवसाला सुमारे ०.००२ सेकंद इतकी आहे. दिवसाचा कालावधी हा जरी पृथ्वीच्या भ्रमणाशी निगडित असला तरी, घडय़ाळात दर्शवला जाणारा कालावधी हा तांत्रिकरीत्या निर्माण केला गेला असल्यामुळे स्थिर राहातो. परिणामी, घडय़ाळाने दाखवलेली वेळ आणि सूर्याच्या रोजच्या भ्रमणाच्या निरीक्षणांवरून काढलेली वेळ यात फरक पडतो. हा फरक एकत्रितपणे वाढत वाढत एक सेकंदाच्या जवळ गेला की, आपल्या घडय़ाळाने दर्शवलेल्या वेळेत एका सेकंदाची मुद्दाम वाढ केली जाते. या वाढीव सेकंदाला लीप सेकंद म्हटलं जातं. लीप सेकंदांचा वापर इ.स. १९७२ साली सुरू झाला. खगोलशास्त्रीय निरीक्षणांद्वारे पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेचा कालावधी प्रत्यक्ष मोजून, लीप सेकंदाच्या वापराबद्दल निर्णय घेतला जातो. लीप सेकंदाचा समावेश हा साधारणपणे ३० जून वा ३१ डिसेंबर (आणि गरज पडल्यास ३१ मार्च आणि ३० सप्टेंबर) रोजी करण्यात येतो. इ.स. २००८ साली केल्या गेलेल्या लीप सेकंदाचा समावेश लक्षात घेता, गेल्या ३६ वर्षांत आतापर्यंत एकूण २४ वेळा लीप सेकंदाचा वापर केला गेला आहे. इ.स. १९७२ साली तर ३० जून आणि ३१ डिसेंबर अशा दोन दिवशी लीप सेकंदांचा वापर करण्यात आला.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
सेठ गोविंददास
साहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत यश संपादन करणारे ख्यातनाम हिंदी साहित्यिक, राजकारणी सेठ गोविंददास यांचा जन्म जबलपूर येथे १६ ऑक्टोबर १८९६ रोजी झाला. बालवयातच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि १९२०च्या सुमारास ते राजकारणात पडले. आठ वर्षे तुरुंगात घालवली. १९४७ साली संविधान समितीवर त्यांची नेमणूक झाली. १९५२च्या पहिल्या निवडणुकीतून ते लोकसभेवर निवडून गेले. हंगामी सभापती म्हणूनही काही काळ ते होते. आज हिंदीला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. संसदेत असताना देवनागरी ही राष्ट्रलिपी व्हावी तसेच इंग्रजीऐवजी प्रांतिक भाषा किंवा हिंदीचा वापर करा, असे ठणकावून सांगितले. हिंदीच्या प्रचारासाठी त्यांनी देशभर दौरे आखले. आपल्या लेखणीने हिंदी साहित्याचे दालन त्यांनी समृद्ध केले. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक विषयांवर त्यांनी लिखाण केले. ‘कर्ण’, ‘हर्ष’, ‘अशोक’, ही ऐतिहासिक नाटके, ‘प्रकाश’, ‘सेवामय’, ‘संतोष कहो’, ‘पाकिस्तान सिद्धान्त’, ‘स्वातंत्र्य’ यांसारखी सामाजिक नाटके त्यांनी लिहिली. हिंदी साहित्यात एकपात्री एकांकिका सुरू करून एक नवा अध्याय सुरू केला. ‘चतुष्पथ’, ‘षट्दर्शन’ या त्यांच्या एकांकिकांचे संग्रह चांगलेच गाजले. ‘इंदुमती’सारखी त्यांची कादंबरी तत्कालीन, सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश पाडते. ‘आत्मनिरीक्षण’ या नावाने आत्मचरित्र लिहिले. युरोप, अमेरिकेच्या प्रवासावर ‘पृथ्वी परिक्रमा’, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिजी, मलायाच्या प्रवासावर ‘सुदूर दक्षिण पूर्व’ ही प्रवासवर्णने लिहिली. ‘साहित्य वाचस्पती’ ही सन्माननीय पदवी जबलपूर विद्यापीठाने त्यांना दिली. १८ जून १९७४ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खारीचं छोटुकलं पिलू
एक छोटुकलं खारीचं पिलू मला बागेत मिळालं. बिचाऱ्याची आई त्याला सोडून गेली असावी. आईबाबांना विचारलं, ‘मी पाळू याला?’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे, पण ते काय खातं ठाऊक आहे का?’ मी नकारार्थी मान हलवली. बाबा म्हणाले, ‘कोवळी पानं, कोवळे दाणे, अळय़ा, किडे, लहान आहे ते पोर. तूच आई हो त्याची.’ ‘अहो बाबा, पण मी मुलगा आहे ना!’ ‘या छोटय़ा खारीला तुझा आधार वाटतोय, तोपर्यंत तुला त्याची आई व्हायला काय हरकत आहे?’ बाबा हसत म्हणाले. ‘ठीक! ठीक, मी खारुटीची आई’ मी आनंदानं ओरडलो. खारुटी दिवसभर माझ्याशी खेळे. मी तिला फळांचे तुकडे, मटाराचे कोवळे दाणे, बागेतले किडे खायला देऊ लागलो. दिवसा ती माझ्या पँटच्या खिशात झोपे, रात्री माझ्या पांघरुणात. सुटय़ा संपून शाळा सुरू झाली. मी शाळेत निघालो, तशी खारुटीही माझ्या मागे यायला लागली. मी खारुटीला खिशातून घेऊन गेलो. शाळेत गेल्यावर माझ्या बाकावर तिला ठेवले. वर्गातली मुलं गोळा झाली. इतक्यात बाई वर्गात आल्या. ‘रोहित, खार शाळेत आणता येत नाही. ठाऊक नाही तुला! ते पिलू घेऊन वर्गाबाहेर जा आधी.’ बाई ओरडल्या. ‘नाही बाई, ती घाबरेल एकटी. मी तिची आई आहे. मला सोडून कशी जाईल.’ मी म्हणालो. वर्गात हशा पिकला. बाई जास्तच चिडल्या. ‘ते पिलू माझ्याकडे दे. मी ड्रॉवरमध्ये ठेवते. शाळा सुटल्यावर तुला परत देते.’ खारुटीला बाईंचं बोलणं समजलं की काय कोण जाणे. ती पटकन माझ्या शर्टात लपली. बाई हसल्या. ‘ठीक आहे. आज राहू दे. उद्यापासून आणू नकोस हं शाळेत’. दुसऱ्या दिवसापासून मी खारुटीला घरी ठेवू लागलो. ती वाट बघत बसे. शाळेतून घरी आलो की मात्र मला अजिबात सोडत नसे. कुणी हात लावायला गेलं तर पटकन माझ्या शर्टाच्या किंवा पँटच्या खिशात लपून बसे. ती इतर खारीत मिसळत नसे. मला वाटतं, ती खार आहे ते तिला ठाऊकच नव्हतं. तिला वाटे, ती माझ्यासारखाच मुलगा आहे. हळूहळू तिला कळलं असावं की आपम काही रोहितसारखा मुलगा नाही. आपण खार आहोत. कारण एकदा मी आणि ती बागेत खेळत असताना एक नर खार किडा पकडायला झाडावरून खाली आली. माझी खारुटी त्याच्यामागे झाडावर गेली, पण काही वेळात परत आली. माझ्याजवळ न येता फुरंगटून बसली. बाबांना हा प्रसंग सांगितला तर ते म्हणाले, ‘खारुटी वयात आलीय. तिला जोडीदार हवाय.’ सुटय़ा लागल्या आणि आम्ही आजोबांकडे गेलो. महिन्याने परतलो. घरात प्रवेश करताच खारुटी माझ्याजवळ आली. थोडा वेळ थांबली आणि नंतर निघून गेली. माझ्याबरोबर खेळण्यात ती रमेना. इतर खारींशी खेळायला जाई. एके दिवशी मात्र रात्री माझ्या पांघरुणात शिरून झोपली. सकाळी पाहतो तो तिनं छोटुकल्या खारुटलीला जन्म दिला होता. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू असते. त्यात बदल होत नाही.
आजचा संकल्प : मी निसर्ग समजून घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com