Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

आता वीज गेली तरी नवी मुंबईकरांना भरपूर पाणी
नवी मुंबई /प्रतिनिधी

वीज नाही तर पाणीही नाही, हे समीकरण यापुढे नवी मुंबईकरांना तरी लागू होणार नाही. लोडशेडिंगमुळे शहरात वीजटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नवी मुंबईकरांना विजेपाठोपाठ पाणीटंचाईचा फटकाही सहन करावा लागतो. वीज पुरवठा खंडित होताच शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधील ४६ मोठय़ा जलकुंभांमधील पंपिंग बंद होते आणि टाकीत पाणी असूनही नागरिकांना देताना अडचणी उभ्या रहातात. यापुढे मात्र हे चित्र बदलणार आहे. नवी मुंबईत सर्वात उंचावरील पारसिक डोंगरावर महापालिकेने उभारलेल्या भल्या मोठय़ा टाकीमुळे आता ऐरोली-वाशी-बेलापूर या त्रिकोणातील उपनगरांमधील ४० मोठय़ा टाक्यांमध्ये थेट गुरुत्वाकर्षणाने पाणी पोहचणार आहे. यामुळे पंपिंग नाही, तर पाणीही नाही, या गणिताला रामराम करणे शक्य झाले आहे.

नवीन पनवेलमध्ये झोपडय़ांवर पुन्हा कारवाई
पनवेल/प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील अनधिकृत झोपडय़ांवर सिडकोने आठवडय़ाभरात दुसऱ्यांदा धडक कारवाई केली आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी नवीन पनवेलच्या सेक्टर १-एसमधील सुमारे ३०० झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. सिडकोच्या या पथकाने गेल्या बुधवारी याच ठिकाणच्या ३५० झोपडय़ा हटविल्या होत्या.

पनवेल नगराध्यक्षपद निवडणूक
बिघाडी टाळण्यासाठी सह्याद्रीवर फिल्डिंग!
पनवेल/प्रतिनिधी
पनवेलमधील काँग्रेस आघाडीमध्ये निर्माण झालेल्या बिघाडीवर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचे समजते. निवडणूकपूर्व आघाडी करून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर अडीच वर्षांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर १९ जून रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोहोड यांनी अर्ज भरल्याने खळबळ उडाली. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत हे दोन्ही उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांकडे न फिरकल्याने आता निवडणूक अटळ आहे.

उरण नगराध्यक्षपद निवडणूक
भाजपच्या अधिकृत उमेदवाराला सेनेच्या बंडखोर उमेदवाराचे आव्हान

उरण/वार्ताहर - उरण नगर परिषदेत सेना-भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा कलगीतुरा आता चांगलाच रंगला आहे. सामंजस्य कराराप्रमाणे पुढील अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा हक्क भाजपचा असतानाही सेनेच्या बंडखोर गटाच्या महिला उमेदवार वैशाली बंडा यांनी पक्षादेश धुडकावून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडखोर सेना विरुद्ध अधिकृत सेना-भाजप अशी लढत येत्या १९ जून रोजी रंगणार आहे. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्याच हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडांना ३.५ एफएसआय द्यावा - आमदार मंदा म्हात्रे
प्रतिनिधी - नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावयाचे असेल, तसेच त्यांना न्याय द्यावयाचा असेल, तर येथील मूळ भूखंडधारकांना ३.५ एफएसआय देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधान परिषदेत केली.

भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना हवालदारास अटक
बेलापूर/वार्ताहर- कोपरखैरणे येथे भंगार विक्रेत्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केल्याची घटना बुधवारी घडली. ज्ञानेश्वर गणपत पवार (३५) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पवार हा रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पवार याने कोपरखैरणे परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रमेश चौधरी याच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. बुधवारी कोपरखैरणे येथे ही लाच खाताना पवार याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

पनवेलमधून एमबीए होणे शक्य!
पनवेल - एकविसाव्या शतकात शिक्षणाचेही मोठय़ा प्रमाणावर विकेंद्रीकरण होत असून ज्ञानाची गंगा सर्वत्र पोहोचली आहे. एमबीएसारख्या पदवीसाठी मुंबई- पुण्याला जाण्याची आवश्यकता आता उरली नसून, पनवेल आणि परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना पनवेलमधूनच हा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे एमबीए (बँकिंग आणि इन्शुरन्स), एमबीए (फायनान्स/मार्केटिंग/ह्युमन रिसोर्सेस) हे अभ्यासक्रम येथील यशवंत मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेची पदवीधर व्यक्ती प्रवेश घेऊ शकते, तसेच इच्छुक नागरिक नोकरी- व्यवसाय सांभाळूनही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. हे अभ्यासक्रम यूजीसी मान्यताप्रश्नप्त असून विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. या विद्यापीठाची एमबीए सीईटी १९ जुलै २००९ रोजी होणार असून अधिकृत अभ्यासकेंद्रांवर प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. संपर्क- ९८१९२४८७७१, ९८१९५४०४४८.