Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

ढग.. पण, पाणीटंचाईचे!
प्रतिनिधी / नाशिक

जूनचा तिसरा आठवडा उलटण्याच्या मार्गावर असताना अद्याप पावसाचा मागमूसही नसल्याने अवघ्या उत्तर महाराष्ट्रावर यंदा सुद्धा गतवेळेप्रमाणेच पाणी टंचाईचे सावट आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास हे संकट अधिकच गहिरे बनण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पावसासाठी आणखी किमान चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला आहे.

विविध मागण्यांसाठी भटक्या-विमुक्तांचा मोर्चा
नाशिक / प्रतिनिधी

घरे, जमिनी, शीधापत्रिका, शिक्षण यासारख्या प्राथमिक सुविधांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र भटके-विमुक्त जाती संघातर्फे बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला सादर करण्यात आले. संघटनेचे नेते जी. जी. चव्हाण, मोतीराज राठोड, महिला आघाडीच्या कल्पना पांडे, रतन सांगळे, भीमा काळे, सुभाष चव्हाण आदिंनी मोर्चाचे नेतृत्व केले. बहुसंख्य भटक्या-विमुक्त समाज घटकांना आज देखील मूलभूत सुविधांपासून पारखे रहावे लागते, असा आरोप शिष्टमंडळात सहभागी नेत्यांनी केला.

प्रतिनिधी / नाशिक
शहरवासियांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्थगित करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाला घ्यावा लागला असला तरी आता पोलीस आयुक्त म्हणून काम करताना विष्णुदेव मिश्रा यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. अर्थात, ही बाब खुद्द मिश्रा यांनाही मान्य असली तरी त्यांना समर्थन देण्यासाठी जे-जे नाशिककर हिरीरिने रस्त्यावर उतरले त्यांच्या सुद्धा पोलीस आयुक्तांकडून काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. या अपेक्षा त्यांच्याच शब्दात मांडणारी मालिका..

ब्राह्मण महाअधिवेशनानिमित्त समाजहितैषी उपक्रमांचा संकल्प
सहावे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशन घेण्याचा मान नाशिकला मिळाला असून जानेवारी २०१० मध्ये होणाऱ्या या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विख्यात व्यवस्थापनतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ, डॉ. मो. स. गोसावी यांची निवड झाली आहे. या निमित्ताने काही उपक्रम हाती घेण्याचा या व्यासपीठाचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी १९ जूनला सायंकाळी ५ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात प्रकाश पाठक यांचे ‘ब्राह्मण समाज व उद्योजकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात करण्यात आले आहे.

एकीकडे प्रगती, तर दुसरीकडे नीतीमूल्ये पायदळी - अ‍ॅड. रावसाहेब शिंदे
‘प्रश्न आहे मूल्यांचा’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक / प्रतिनिधी

आजची विद्यार्थी पिढी ही केवळ पुस्तकी ज्ञानाचे संदर्भ ग्रंथ बनली आहे. त्यामुळे बेकारांचे कारखाने निर्माण होत असून एकीकडे प्रगती होत असतांना दुसरीकडे मानवी समाजाची नीतीमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. अशा स्थितीत महात्मा गांधींसारख्या नीतीमूल्ये जपणाऱ्या विचारवंताची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी केले. येथे अमेय प्रकाशनतर्फे शिंदे यांच्या ‘प्रश्न आहे मूल्यांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

मतदार छायाचित्र ओळखपत्र मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील नाशिक (पूर्व), नाशिक (मध्य), नाशिक (पश्चिम) या मतदार संघांतर्गत मतदार नोंदणीकरिता विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व मतदार यादीतील छायाचित्रांकरिता विशेष छायाचित्र मोहिमेच्या ३० जूनपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली आहे. विशेष मोहिमेतंर्गत शहरातील तीनही मतदारसंघांमध्ये एकूण २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून नागरिकांनी यापूर्वी छायाचित्र ओळखपत्राकरिता वाटप झालेल्या ००१ बी (फोटोसाठी) अर्ज कोणताही तसेच नवीन मतदार नोंदणीकरिता अर्ज नमुना ६ मध्ये संपूर्ण माहिती भरून आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्ज करावे.

थेट पोलीस अधीक्षकांना कळवा अवैध धंद्यांची माहिती
नाशिक / प्रतिनिधी
पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली असताना आता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता यांनीही ग्रामीण भागातील अवैध धंदे, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी थेट जनतेलाच सहकार्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील जनतेने तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी अवैध धंदे, काळाबाजार, गुन्हे, गुन्हेगारी तसेच गावातील अशांतता, अराजकता निर्माण करणाऱ्या घटकांची माहिती थेट आपणास ९९२३९३५३७५ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले आहे. याआधीही अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुप्ता यांनी अवैध धंद्यांविषयी कोणाला माहिती असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.

ग्रामरक्षक दलाची कामगिरी
नाशिक / प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथे ग्रामरक्षक दलाच्या कामगिरीमुळे बलात्कार प्रकरणातील संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. एका अल्पवयीन मुलीवर मौजे सुकेणे येथे राहणारा संशयित सुनील भोईने बलात्कार केला. या घटनेनंतर संशयित फरार होता. त्याची कोणतीच माहिती मिळत नसल्याने पिंपळगाव पोलिसांनी वृत्तपत्रांमध्येही संशयिताबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले होते. मौजे सुकेणे येथील ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माणिक देशमुख, नंदु काळे या पोलिसांनी पेठ तालुक्यातील बहिरावणा या अतिदुर्गम भागातून भोई यास अटक केली. ग्रामरक्षक दल सदस्यांच्या जागरूकतेमुळेच पोलिसांना संशयितास अटक करण्यात यश मिळाले आहे. सुकेणेच्या ग्रामरक्षक जवानांप्रमाणे जिल्हयातील अन्य ग्रामरक्षक दलांनी कामगिरी करावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.

गजानन काटकर यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

शहराच्या दिंडोरीरोड परिसरातील गजानन रघुनाथ काटकर (७२) यांचे रविवारी निधन झाले. जलसंपदा विभागाच्या मेरी कार्यालयात त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी असंख्य सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पत्नी, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.