Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

‘टॉप स्टायलिश मॅन’ ओबामा!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता अजून चांगली असल्याचे दिसत असतानाच त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. फॅशनच्या क्षेत्रात किंवा उत्तम वेशभूषा करण्यामध्येही अमेरिकेच्या या अध्यक्षाने भल्याभल्यांवर मात केल्याने एका पाहणीत आढळून आले आहे. सवरेत्कृष्ट वेशभूषा कोणा पुरुषाची चांगली आहे. याबाबत एक पाहणी करण्यात आली होती. त्या पाहणीत सर्वात वरचा क्रमांक होता बराक ओबामा यांचा! आपली वेशभूषा आणि ‘ड्रेस सेन्स’ यामुळे सर्वात जास्त प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींत ओबामा प्रथम क्रमांकावर होते. अभिनेता ब्रॅड पिट याचा नंबरही ओबामा यांच्यापुढे लागला नाही.

‘लॅण्डमाफिया’ आणि ‘गँगवॉर’ने पुणे हादरले
‘लॅण्ड माफिया’ आणि ‘गँगवॉर’ हे दोन शब्द ऐकले की अशा घटना मुंबई सारख्या शहरातच घडतात, असा सर्वसामान्य पुणेकरांचा समज आजपर्यंत होता. मात्र, दहशत माजवून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी बळकावल्याची दोन प्रकरणे नुकतीच उघडकीस आल्यानंतर तसेच महिन्याभरातच टोळीयुद्घातून दोन गोळीबाराच्या घटना कोथरूडसारख्या उपनगरामध्ये घडल्याने आता पुण्यातही ‘गँगवॉर’ आणि ‘लॅण्डमाफिया’ सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांच्या या ‘लॅण्डमाफिया’शी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे आणि राजकीय व्यक्तीही या प्रकरणांमध्ये सामील असल्याने, भीतीपोटी सामान्य नागरिकाला अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे धाडस होत नव्हते.

‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ची रंगावृत्ती!
भारतीय प्राचीन साहित्य परंपरेत कालिदासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, अभिज्ञानशाकुन्तल ही तीन नाटके, ऋतुसंहार हे लघुकाव्य, मेघदूत हे खंडकाव्य आणि रघुवंश व कुमारसम्भव ही दोन महाकाव्ये एवढी त्याची साहित्यसंपदा. त्यातील ‘शाकुन्तल' या नाटकाची जगभरातील अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. एवढी अफाट साहित्यसंपदा लिहिणाऱ्या कालिदासाने स्वतविषयी नावापलिकडे काहीही लिहून ठेवलेले नाही. त्यामुळे त्याच्याविषयीचे गूढ कायम आहे. आषाढातला पहिला दिवस आणि कालिदास यांचे नेमके नाते काय हेही अद्याप नीटपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरीही दरवर्षी पहिल्या पावसापाठोपाठ येणाऱ्या आषाढातल्या पहिल्या दिवशी कालिदासाचे स्मरण भारतीय मनाला होतेच. यंदा अद्याप पावसाने हजेरी लावली नसली तरी मंगळवार २३ जून रोजी आषाढस्य प्रथम दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘सुलोना संस्कृत-स्थानम्' ही संस्था आताच्या काळाला साजेशी ‘अभिज्ञानशाकुन्तल'ची मराठी रंगावृत्ती गडकरी रंगायतनमध्ये सादर करणार आहे. मूळ संस्कृत नाटक सात अंकी असून आता पूणार्ंशाने त्याचा आस्वाद घेणे शक्य नाही. तरीही नव्या पिढीला या अभिजात नाटकाची ओळख व्हावी म्हणून डॉक्युड्रामा पद्धतीने कालिदासाची ही अजोड कलाकृती सादर केली जाणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा अदिती जमखंडीकर यांनी ‘शाकुन्तल'मधील निवडक प्रवेशांचे सुटसुटीत आणि सोप्या मराठीत भाषांतर केले असून संस्कृत भाषेचे अध्यापक प्रसाद भिडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. ‘शाकुन्तल'च्या या नव्या संचात महाविद्यालयीन तरुणांचा भरणा आहे. सुप्रसिद्ध गायक नट चंद्रकांत कोळी व ज्येष्ठ नट रमेश भिडे यांचाही या नाटकात विशेष सहभाग असेल. जुन्या बुजुर्गाचे मार्गदर्शन आणि नव्यांचा उत्साही सहभाग अशा पद्धतीने शाकुन्तलचा हा प्रयोग आकारास आला आहे. संस्कृत भाषा आणि त्यातील साहित्यसंपदेविषयी नव्या पिढीने रुची दाखवावी म्हणून ‘सुलोना-संस्कृत स्थानम्' ही संस्था सातत्याने निरनिराळे उपक्रम राबवीत असते. इतर शहरातील संस्थांनी पुढाकार घेतला तर या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्याची ‘सुलोना'ची तयारी आहे. संपर्क-०२२-२५४००८११.
प्रशांत मोरे
moreprashant2000@gmail.com