Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

राज्य

गावच्या एकजुटीतून साध्य झाली २० लाखांची काजूबी विक्री
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, १७ जून

कोकणात सहकार रुजला नाही, अशी टीका नेहमीच केली जाते. मात्र या सहकाराला आवश्यक प्रोत्साहन दिले जाते का, अथवा असणाऱ्या सहकाराचा शोध घेणारी नजर संबंधितांकडे आहे का, या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. कोकणातील काजू विक्रीचा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात गेलेला असताना गुहागर तालुक्यातील पाभरे या गावाने मात्र यावर्षी ‘एकमेकां साह्य करू’ या तत्त्वाने २० लाख पाच हजार रुपयांची काजू विक्री करून कोकणवासीयांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

रायगडमध्ये परदेशी मोटारसायकलींची बेकायदेशीर नोंदणी
महाड, १७ जून/वार्ताहर

रायगड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ परदेशी मोटारसायकलींची बेकायदेशीर नोंदणी केली असल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या परदेशी मोटारसायकली पेण आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आल्या. आता हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी महाड तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे.

कर्जत रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत वयोवृद्धांचा सत्कार
कर्जत, १७ जून/वार्ताहर

कर्जत रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या, तसेच समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष द.द. तुळसूनकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतच्या अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या भव्य सभागृहामध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अमळनेरच्या नगराध्यक्षपदी नाना चौधरी बिनविरोध
अमळनेर, १७ जून / वार्ताहर

पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाना चौधरी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. विद्यमान नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्यातर्फेही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होणार होते. त्यामुळे नगरपालिकेच्या आवारात गरमागरमीचे वातावरण होते. नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर नगराध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. सकाळी ११ वाजता नाना चौधरी यांनी मुख्याधिकारी टी. बी. उगले यांच्याकडे तीन अर्ज सादर केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही. पीठासन अधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांनी तीनही अर्ज वैध ठरविले. त्यानंतर चौधरी यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. उमेदवारी दाखल करतांना चौधरी यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शांताराम ठाकूर, संचालक सुभाष पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख किसन पाटील, उपशहरप्रमुख प्रताप शिंपी आदी उपस्थित होते.

चाणक्य मंडळातर्फे स्पर्धा परीक्षेसाठी चाचणी
नाशिक, १७ जून / प्रतिनिधी
मे २०१० मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांसाठी येथे चाणक्य मंडळ परिवारातर्फे विशेष कोर्स सुरू करण्यात येत असून त्यासाठी रविवारी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. युपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा तसेच एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा कोर्स मंडळातर्फे २९ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत घेण्यात येत आहे. याशिवाय जुलै महिन्यात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी प्राथमिक व व्यक्तिमत्व विकासनाचा कोर्सही २० जुलैपासून सुरू होत आहे. इच्छुकांनी पंकज सोनवणे ९७६३८१०६७० किंवा किसन झाल्टे ९७६५४७९३७४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विद्यापीठातर्फे नव्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मंजुरी
नाशिक, १७ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विविध नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत चालविण्यास मान्यता देण्यात आली. कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या अभ्यासक्रमांपैकी मुंबई येथील सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय येथे २४ तर लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकारचे १३ अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरिता वैद्यकीय शाखेच्या विविध पदव्युत्तर विद्याशाखांचे तसेच पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र राहतील. या अभ्यासक्रमांबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या ६६६.े४ँ२ल्लं२ँ्र‘.ूे या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

छात्रभारतीतर्फे अवैध प्रवेश शुल्क विरोधात उद्या ‘हल्लाबोल’ आंदोलन
नाशिक, १७ जून / प्रतिनिधी
शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून महाविद्यालयांकडून विकास निधीच्या नावाखाली अवैधरित्या विविध शुल्क स्वीकारले जात असल्याने त्याविरोधात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे ‘हल्लाबोल’ आंदोलन केले जाणार आहे.याशिवाय बेकायदेशीररित्या वसूल करण्यात येणारे शुल्क व यासाठी दोषी असलेल्या प्राचार्याविरूध्द फौजदारी खटले भरावेत, शिष्यवृत्ती व फ्रिशीपमध्ये केल्या जाणाऱ्या कपातीबद्दलही सखोल चौकशी व्हावी यासाठी संघटनेतर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलनात पालक व विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्यवाह अ‍ॅड्. अरूण दोंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड्. शरद कोकाटे यांनी केले आहे.

पोलीस ठाण्यात हवालदाराची आत्महत्या
पालघर, १७ जून/वार्ताहर

पालघर पोलीस स्टेशनचे हवालदार रवींद्र चव्हाण यांनी येथील पोलिसांच्या विश्रांती खोलीत विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. आजारपणाला कंटाळून चव्हाणांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांमार्फत सांगितले जात असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी चव्हाण यांनी लिहून ठेवल्याचे समजते.५४ वर्षीय चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील मूळचे राहणारे असून, २ मार्च १९८१ रोजी नोकरीत आले. प्रारंभी डहाणू, नंतर सफाळे व १४ नोव्हेंबर २००६ पासून ते पालघर येथे कार्यरत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारपणाच्या रजेवर होते.

प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी
देवरुख, १७ जून/वार्ताहर

मान्सूनचा पाऊस अचानकपणे लांबल्यामुळे पावसाळा सुरळीत सुरू होईपर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या प्रहरात भरविण्याची मागणी शिक्षक समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बबन बांडागळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना रीतसर निवेदन सादर केले असून या मागणीला प्रशासनाची तत्त्वत: मान्यता मिळविली आहे.
प्रतिवर्षांप्रमाणे १५ जूनपासून प्राथमिक शाळा नियोजित वेळेत सुरू झाल्या. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून मान्सूनच्या पावसाला नेहमी सुरुवात होत असल्याने उन्हाळी हंगामात सकाळच्या सत्रात सुरू असणारी शाळा नव्या शैक्षणिक वर्षांंत पूर्ववत सायंकाळपर्यंत भरविली जाते. मात्र यावर्षी मान्सूनने दिलेली हुलकावणी, तीव्र पाणीटंचाई व लहान मुलांना उन्हाळ्याचा होणारा त्रास विचारात घेऊन सुरळीत पाऊस सुरू होईपर्यंत प्राथमिक शाळा सकाळी सात ते अकरा या वेळेत भरविण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.