Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

क्रीडा

भारताची पराभवाची हॅट्ट्रीक
दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी नमविले
नॉटिंगहॅम, १७ जून/ पीटीआय
‘सुपर एट’ फेरीतील शेवटचा सामना जिंकून ऊरली सुरलेली लाज वाचविण्यात भारतीय संघाला सपशेल अपयश आले आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. हा सामना गमाविल्याने गतविजेत्यांनी यंदाच्या विश्वचषकात पराभवाची हॅट्ट्रीक साधली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाला १५३ धावांचे आव्हान गाठता आले नव्हते, पण या सामन्यात तर त्यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या १३१ धावांचे माफक आव्हानही पेलता आले नाही.

दक्षिण आफ्रिकेपुढे पाकिस्तानचे आव्हान
आज रंगणार पहिला उपान्त्य सामना
नॉटिंगहॅम, १७ जून/ पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघापुढे उद्या होणाऱ्या पहिल्या उपान्त्य फेरीत आव्हान असेल ते गेल्यावेळी अंतिम फेरीत मजल मारलेल्या पाकिस्तानचे. दोन्हीही संघांचा विचार केल्यास दक्षिण आफ्रिकेचे पारडे पाकिस्तान पेक्षा जड आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यंदाच्या विश्वचषकातील एकही सामना गमावलेला नसून सलग पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय साकारलेला आहे.

फलंदाजी व सांघिक कामगिरीतील अपयशानेच पराभूत - धोनी
नॉटिंगहॅम, १७ जून/पीटीआय
ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची धक्कादायक हार होण्यामागे आय.पी.एल. स्पर्धा भारतीय खेळाडूंना आलेला थकवा कारणीभूत असल्याचे प्रशिक्षक कर्स्टन यांनी म्हटले असले तरी कर्णधार धोनी मात्र त्यांच्या या मताशी सहमत नाही. आपले काही खेळाडू १०० टक्के फिट नव्हते हे मात्र त्याने मान्य केले आहे. इंग्लंडमध्ये आम्ही पूर्ण जोशात नव्हतो हे खरे आहे. कारण जानेवारीपासून आम्ही सातत्याने बाहेरच आहोत.

क्रिकेटप्रेमींनी जबाबदारीने वागावे
सचिन तेंडुलकर नाराज

लंडन, १७ जून/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकातून गतविजेता भारतीय संघ झटपट बाहेर पडल्यानंतर भारतातील प्रेक्षकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर नाराज झाला आहे. भारतीय प्रेक्षकांनी जबाबदारीने आणि योग्य तो समतोल राखून प्रतिक्रीया द्यावी असे मत त्याने यावेळी व्यक्त केले आहे. भारताला विजेतेपद कायम राखता आले नसले तरी क्रिकेटप्रेमींनी जबादारींनी प्रतिक्रिया द्यायला हवी. अशा वेळी प्रेक्षकांनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी राहायला हवे, असे सचिनने यावेळी सांगितले.

अभिषेक नायरने दिले आयपीएलला श्रेय
मुंबई, १७ जून / क्री. प्र.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या मुंबईच्या अभिषेक नायरने आपल्याला ही संधी इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरीमुळे मिळाल्याचे म्हटले आहे.नायर म्हणाला की, ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी माझा भारतीय संघात समावेश होईल, अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने ती संधी मला मिळाली नाही. मी निराश झालो. पण आता मात्र माझी निवड झाल्याने आनंद झाला.आयपीएलमधील कामगिरीबाबत नायरने सांगितले की, जगातील अव्वल खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळाल्यामुळे अनुभवात मोलाची भर पडली. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूकडून वेळोवेळी बहुमूल्य सल्लाही मिळाला.

विम्बल्डनसाठी राफेल नदाल, दिनारा सफीना यांना अग्रमानांकन
विम्बल्डन, १७ जून/पीटीआय

गतविजेता रॅफेल नदाल व जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित दिनारा सफीना यांना विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे. ऑल इंग्लंड क्लबने आज येथे ही मानांकने जाहीर केली. ग्रासकोर्टवर होणाऱ्या या स्पर्धेस सोमवारपासून सुरुवात होत आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेची मानांकने ठरविताना जागतिक क्रमवारी आधारभूत घेतली जाते.

इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताला संमिश्र यश
सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांची आगेकूच तर अरविंद भट्ट व आनंद पवार पराभूत
नवी दिल्ली, १७ जून/पीटीआय
भारताच्या सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांनी इंडोनेशियन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत आगेकूच राखली, मात्र अरविंद भट्ट व आनंद पवार यांना पुरुष गटात पराभूत व्हावे लागले.सहाव्या मानांकित सायनाने बल्गेरियाच्या पेत्या नेदेलचेवा हिचा २१-१८, २१-१२ असा ३० मिनिटांच्या लढतीनंतर पराभव केला.

इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताला संमिश्र यश
सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांची आगेकूच तर अरविंद भट्ट व आनंद पवार पराभूत
नवी दिल्ली, १७ जून/पीटीआय

भारताच्या सायना नेहवाल व अदिती मुटाटकर यांनी इंडोनेशियन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत आगेकूच राखली, मात्र अरविंद भट्ट व आनंद पवार यांना पुरुष गटात पराभूत व्हावे लागले.सहाव्या मानांकित सायनाने बल्गेरियाच्या पेत्या नेदेलचेवा हिचा २१-१८, २१-१२ असा ३० मिनिटांच्या लढतीनंतर पराभव केला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला, तसेच तिने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते.

ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी डकवर्थ-लुईस नियमांचा पुनर्विचार करणार
लंडन, १७ जून / पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डकवर्थ लुईस पद्धतीवर टीका झाल्यानंतर या क्रिकेट प्रकारासाठी वापरात असलेल्या या पद्धतीवर पुनर्विचार करण्याचे सुतोवाच स्वत: डकवर्थ-लुईस यांनी केले आहे. इंग्लंड संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर एट सामन्यात पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात पावसामुळे वेस्ट इंडिजसमोरील आव्हान ९ षटकांत ८० असे करण्यात आले होते. त्यामुळे या सामन्याच्या निकालानंतर डकवर्थ नियमावलीबाबत साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. डकवर्थ यांनी सांगितले की, ट्वेन्टी-२० विश्वचषकातील या नियमावलीच्या वापराची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही नियमावलीत बदल करण्याचा विचार करू. ही स्पर्धा संपेपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. जेणेकरून आमच्या हाती पुरेशी माहिती असेल.

इंग्लंडवर मात; भारत नवव्या स्थानासाठी झुंजणार
सिंगापूर, १७ जून / पीटीआय

ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताच्या दिवाकर रामने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ९-० अशी मोठय़ा फरकाने मात केली. या विजयामुळे भारताला आता नवव्या स्थानासाठी पोलंडशी झुंजावे लागेल.इंग्लंडविरुद्धच्या या एकतर्फी सामन्यात भारताने मध्यंतरालाच सामन्याचा निकाल स्पष्ट करताना ५-० अशी आघाडी घेतली. रामने २३, ४८ व ६७व्या मिनिटाला गोल केले तर दानिश मुजतबाने पहिल्या व २०व्या मिनिटाला गोल केले. जय करण, व्हिक्टो सिंग, मनदीप अंतिमल व इनोसन्ट कुल्लू यांनीही हातभार लावला.भारताने याआधी पोलंडला गटसाखळीत ४-२ असे नमविले होते आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत.

चाहत्यांकडून हुर्यो; तरीही धोनी अविचल
नॉटिंगहॅम, १७ जून/पीटीआय

इंग्लंडविरुद्धच्या लढतीत अनाकलनीय डावपेचांमुळे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याविरुद्ध माजी क्रिकेटपटूंनी टीकेचा सूर आळवला होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे चाहत्यांच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागले. पराभवानंतर झालेल्या पारितोषिक वितरणात चाहत्यांनी धोनीची हुर्यो उडविली. कर्णधार धोनीने मात्र या हुर्योनंतरही आपला तोल ढळू दिला नाही. या गोष्टीचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही. कारण हे माझ्या बाबतीत काही पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वीही २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराजयानंतर लोकांनी माझी अंत्ययात्राच काढली होती. मात्र मला त्याचे वाईट वाटत नाही. लोकांच्या अशा कृतीमधून चाहत्यांच्या तुमच्याकडून किती उच्च कोटीच्या अपेक्षा आहेत तेच कळते असे या घटनेनंतरही अविचल असणाऱ्या धोनीने सांगितले.

विम्बल्डन मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अमृतराजला हवा एक विजय
विम्बल्डन, १७ जून/पीटीआय

भारताच्या प्रकाश अमृतराज याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत आगेकूच कायम राखली. मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याला आता एकच सामना जिंकावयाचा आहे.प्रकाशने इंग्लंडच्या डॅनियल कॉक्स याचा ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. त्याची आता अमेरिकेच्या मायकेल येईनी याच्याशी गाठ पडणार आहे. प्रकाशने २००२ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले होते. त्या वेळी त्याला पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.प्रकाशने आज परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, येथे मला अनुकूल वातावरण आहे. मी येथे खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते, त्यामुळेच मला सहज विजय मिळविता आला.

गोल्फ स्पर्धेत वासुदेव आघाडीवर
बंगळुरु, १७ जून/पीटीआय
करण वासुदेव याने दुसऱ्या फेरीत अप्रतिम कौशल्य दाखवित एलजी चषक दक्षिण भारत मानांकन गोल्फ स्पर्धेत आज आघाडी घेतली आहे. त्याचे १४४ पेनल्टी गुण झाले आहेत.या स्पर्धेतील पहिल्या फेरीत आघाडीवर असलेला मोईन मलाक हा सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. त्याने रशीद खान, राहुल बक्षी यांच्या समवेत प्रत्येकी १५३ पेनल्टी गुण घेतले आहेत. अंगद चीमा याने १४८ पेनल्टी गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. पवनकुमार व अर्शदीप तिवाना यांनी संयुक्तपणे तिसरे स्थान घेतले असून त्यांचे प्रत्येकी १५० पेनल्टी गुण आहेत. अभिजितसिंग चढ्ढा, सिमरजितसिंग, गगन वर्मा यांनी प्रत्येकी १५१ पेनल्टी गुणांसह चौथे स्थान घेतले आहे. राहुल बजाज हा पाचव्या क्रमांकावर असून त्याचे १५२ पेनल्टी गुण आहेत.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेला सुवर्ण
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
गोंडा येथे नुकत्याच झालेल्या कुमारांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या राहुल आवारे याने ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. राहुल याने पहिल्या फेरीत गुजरातच्या अमितकुमार याच्यावर निर्णायक विजय मिळविला. पाठोपाठ त्याने दुसऱ्या फेरीत हरयाणाच्या संदीपकुमारला हरविले. तिसऱ्या फेरीत त्याने दिल्लीच्या जयदीपवर निर्णायक विजय नोंदविला. अंतिम फेरीत त्याने सेनादलाच्या नरेंद्रकुमार याला सहज पराभूत केले व विजेतेपद मिळविले. राहुल हा गोकुळ वस्ताद तालमीत रुस्तुम-ए-हिंदू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

महेश भूपती, पेस यांचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली, १७ जून/पीटीआय
भारताच्या महेश भूपती, पेस यांचे एगॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. भूपती व मार्क नोवेल्स यांना दुसऱ्या फेरीत ट्रॅव्हीस पॅरोट (अमेरिका) व फिलीप पोलासेक (स्लोवाकिया)यांच्याविरुध्द पराभव स्वीकारावा लागला. पॅरोट व पोलासेक यांनी हा सामना ७-६(७-४), ६-४ असा जिंकला. हा सामना एक तास १७ मिनिटे चालला होता. पेस व लुकास ड्लोही यांना पोलंडच्या मारिझु फिस्र्टेनबर्ग व मार्सिन मॅटकोवस्की यांनी ६-१, ७-६ (७-३) असे हरविले.

प्रेमनाथ कदम स्ट्राँग मॅन ऑफ मुंबई
मुबंई, १७ जून/ क्री. प्र.

ग्रेटर बॉम्बे पॉवरलिफ्टींग असोसिएशन आणि गिरणी कामगार क्रीडा भवन, परळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मुबंई पॉवरलिफ्टींग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून या स्पर्धेतील सिनिअर स्ट्रॉंग मॅन ऑफ मुंबईचा पुरस्कार प्रेमनाथ कदम याने पटकाविला. तसेच ५३ वर्षांचे जयनंद काकडे यांनी स्पर्धेत सहभाग घेतल्याने सर्वानाच एक सुखद धक्का बसला.
स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे-: सतीश पाताडे (५६ किलो), प्रसाद राऊत (६० किलो), जितेंद्र यादव (६७.५ किलो), नितिन चाळके (७५ किलो), तपन वरळीकर (८२.५ किलो), सचिन वंजारे (१०० किलो), जीवन जगदाळे (११० किलो), स्वप्निल मोरे (१२५ किलो).